rajkiyalive

शेतकर्‍यांसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात लढणारे शेतकरी नेते

दिनेशकुमार ऐतवडे

शेतकर्‍यांसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात लढणारे शेतकरी नेते : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लक्ष्यवेधी ठरणारा मतदार संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघ. कारण या मतदार संघात उमेदवारांची गर्दी झाली आहे. प्रमुख चार पक्षाचे चार उमेदवार रिंगणात असले तरी तीन शेतकरी नेते या मतदार संघात एकमेकांच्या विरोधात रणांगणात उतरले आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकर्‍यांसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात लढणारे शेतकरी नेते

राज्याच्या राजकारणात कोणत्याच शेतकरी नेत्याला यशस्वी होता आले नव्हते. शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली. परंतु त्यांना राजकारणात म्हणावे तसे यश आले नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात भाजपच्या मदतीने राज्यसभेवर जाणे त्यांनी पसंत केले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि शिवराज माने हे आता एकमेकांच्या विरोधात लोकसभेसाठी उभे ठाकले आहेत. दुसरे एक शेतकरी नेते सदाभाउ खोत यांनी मात्र धैर्यशील माने यांच्यासाठी माघार घेतली आहे.

शेतकर्‍यांसाठी लढता लढता आपणही राजकारणात यशस्वी होवू शकतो हे पहिल्यांदा दाखवून दिले ते माजी खासदार राजू शेट्टी यांनी.

सुरूवातीला जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 2004 मध्ये शिरोळ मतदार संघातून विधानसभेवर. आमदारकी संपायच्या अगोदर 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातून थेट लोकसभेवर आणि पाठोपाठ 2014 मध्येही लोकसभेवर असा त्यांचा प्रवास राहिला आहे. शिवार ते संसद असा प्रवास राहिलेल्या शेट्टी यांचा वारू 2019 मध्ये रोखला गेला. राज्यातील इतर नेत्यांपेक्षा शरद जोंशी पाठोपाठ राजू शेट्टी यांना शेतकर्‍यांचे भरपूर प्रेम मिळाले. परंतु चळवळीत राजकारण आल्यामुळे त्यांना थोडे बॅकफूटवर जावे लागले.

शरद जोशी यांचे खंदे समर्थक असलेल्या इस्लामपूरच्या रघुनाथ पाटील यांनीही राज्यभर आपले नाव केले.

अनेक पक्षांमध्ये त्यांनी जाहिर प्रवेश केला. परंतु दीर्घकाळ ते कोणत्याच पक्षात राहू शकले नाहीत. कोणतीही निवडणूक असो त्यांचा अर्ज हा असणारच. त्यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढविल्या परंतु त्यांना कोठेच यश आले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरला होता. परंतु त्यांना केवळ 2820 मते मिळाली. कारखाना सुरू झाल्यावर दराची मागणी करणे किरकोळ कोठेतरी आंदोलन करणे आणि सत्ताधार्‍यांविरोधात वक्तवे करणे यापुढे त्यांची गाडी पुढे गेली नाही. म्हणावा तसा गटही त्यांच्या मागे रहिले नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील बी. आर. एस. पक्षात प्रवेश केला परंतु एक महिन्यातच त्यातून बाहेर पडले. आता रघुनाथदादांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून त्यांनी आपल्पा पक्षाकडून अर्ज भरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे एक नेते जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने हेही आपले नशिब आजमावत आहेत.

हातकणंगले मतदार संघांत त्यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या शिवाजी माने यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत सवतासुभा मांडला. राजू शेट्टी यांच्यावर त्यांनी भरपूर टिका केली. गेल्यावेळीच ते निवडणुकीत उभे राहणार होते. यंदा त्यांनी अर्ज भरला आहे. अर्ज माघारी 22 तारखेला असून, ते काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शेतकर्‍यांचे दुसरे नेते माजी मंत्री सदाभाउ खोत यांनीही राजकरणात नशीब आजमावले.

राजू शेटटी यांचे मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिध्द असलेल्या खोत यांनी मंत्रीपद मिळाल्यावर शेट्टींची साथ सोडली आणि भाजपच्या वळचणीला गेले. स्वत:ची रयत क्रांती संघटना काढली. परंतु त्या संघटनेतून कोणतीच निवडण्ाूक लढवली नाही. वेळोवेळी भाजपवर दबाव आणून पदरात काय पडते हेच ते पाहत असतात. यंदाही तेच झाले. कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात निवडण्ाूक लढविणारच अशी त्यांनी सिंहगर्जना केली. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि धैर्यशील माने यांच्या पाठिशी राहण्याचे ठरविले. माढा लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु त्यांचा पराभव झाला.

एकंदरीत शेतकर्‍यांसाठीसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात शेतकरी नेते लढण्याच्या तयारीत आहेत. एकमेकांविरोधात लढता लढता सरकार विरोधी धार कमी होत आहे हे मात्र नक्की.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज