भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनपुर्तीकडे महाडीक सर्मथकांच्या नजरा
सिध्दार्थ कांबळे
shirala political news : शिराळ्याचे किंगमेकर सम्राट महाडीक विधीमंडळात केव्हा ? : दोन महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी विजय प्राप्त केला. या निवडणूकीत भाजपाचे युवा नेते सम्राट महाडीक यांनी किंगमेकरची भुमिका बजावली. महाडीक यांच्या ताकदीमुळे अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा झाला. निवडणूका होवून दोन महिने उलटले आहेत. सम्राट महाडिक यांना विधिमंडळात घेऊन आश्वासनपूर्ती करण्याचा शब्द भाजपाचे वरिष्ठ नेते केव्हा अंमलात आणणार ? याकडे शिराळा मतदारसंघातील महाडीक समर्थकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
shirala political news : शिराळ्याचे किंगमेकर सम्राट महाडीक विधीमंडळात केव्हा ?
वाळवा व शिराळा तालुक्यात सर्वपक्षीय विरोधकांना ताकद देण्याचे काम नेहमीच स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी केले. प्रत्येक विधानसभा निवडणूकीत विरोधी गटाला बळ देवून आमदार करण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका त्यांनी बजावली. महाडिक कुटुंबियातील आमदार असावा अशी त्यांची इच्छा होती. स्व.नानासाहेब महाडिक यांची इच्छा पुर्ण करण्यासाठी पुत्र सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा लढवण्याचा निर्धार केला.
भाजपकडे उमेदवारी न दिल्याने अखेर बंडखोरीचा निर्णय झाला.
2019 साली प्रस्थापितांविरोधात विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात सम्राट महाडीक यांनी घेतलेली 50 हजार मते लक्षवेधी ठरली. विधानसभा निवडणूकीत महाडिक गटाची ताकद दाखविणार्या महाडिक बंधूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिले. राज्यात भाजपाची सत्ता नसतानाही भाजप प्रवेश करण्याचे धाडस महाडीक बंधूंनी दाखवले.
सम्राट महाडीक यांना भाजपाच्या शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड करत भाजपाने त्यांचा सन्मान केला आहे.
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी सम्राट महाडीक व त्यांच्या टीमने जीवाचे रान केले. सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून दिला. सर्वसामान्य मतदार भाजपाशी जोडला गेला. विधानसभा निवडणूकीत त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले होते.
अखेर सत्यजित देशमुख यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सम्राट महाडिक यांनी उमेदवारी दाखल केली. सम्राट महाडीक यांच्याशिवाय शिराळा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार विजयी होणे अशक्य होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल महाडीक व सम्राट महाडिक यांना बैठकीसाठी आमंत्रित केले. त्यांच्या शिष्ठाईनंतर सम्राट यांनी उमेदवारी मागे घेतली.
भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून महाडीक बंधूंनी प्रचार यंत्रणा राबवली.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणूक काळात सम्राट महाडिक यांना विधिमंडळात घेऊन आश्वासनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्यजित देशमुख यांची उमेदवारी माझीच आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले. कार्यकर्त्यांनीही जंग जंग पछाडून सत्यजित देशमुख यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. सत्यजित देशमुख यांचा चांगल्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यांच्या विजयात किंगमेकर ठरलेले सम्राट महाडीक विधिमंडळात केव्हा दिसणार अशी राजकीय वर्तुळातून चर्चा होत आहे. सम्राट महाडीक यांनी विधानसभा निवडणूकीत केलेल्या कामाची फलश्रृती लवकरच व्हावी अशा भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.