rajkiyalive

SHIRALA MURDAR : शिराळ्यातील आव्हानात्मक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश

सांगली :

SHIRALA MURDAR : शिराळ्यातील आव्हानात्मक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश : शिराळा येथील बायपास मार्गावर प्रवाशी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेला तसेच त्याच्या त्रासाला कंटाळून भाच्याला हाताशी धरून पत्नी आणि मुलीने ३१ फेब्रुवारी रोजी पलूस येथील घरी खून करून सदरच्या बॅगेत मृतदेह घालून शिराळ्यात टाकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

SHIRALA MURDAR : शिराळ्यातील आव्हानात्मक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश

: व्यसनाधीनतेला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी खून केल्याचे उघड : भाचा, पत्नी आणि मुलीला केली अटक.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण, शिराळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना अटक केली आहे. सदरचा मृतदेह हा राजेश वसंतराव जाधव (वय ५३ रा. पलूस) यांचा असल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित भाचा देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४ रा. कराड), मुलगी साक्षी राजेश जाधव ( साक्षी विनायक काळूगडे रा. पलूस) आणि पत्नी शोभा राजेश जाधव (रा. पलूस) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून असा गुन्हा परत कोणी करणार नाही यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे घुगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना संदीप घुगे म्हणाले, सोमवार दि. २० मे रोजी शिराळ्यातील आयटीआय कॉलेज ते नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर एका प्रवाशी सुटकेस मध्ये नायलॉनच्या दोरीने बांधलेला आणि सडलेला मृतदेह सापडला होता. याठिकाणी दोरी, सुट्केस आणि मृतदेहावरील टीशर्ट याशिवाय कोणतेही पुरावे नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते. घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी भेट दिली होती. घटनास्थळी मिळालेली सुटकेस, कपडे आणि मिसिंग यावरून तपास सुरु करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, शिराळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सातारा याठिकाणी बॅग बनविणाऱ्या कंपन्यांची माहिती घेण्यास सुरवात केली असता एक बॅग पलूस येथे विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. सदरची बॅग कोणी विकत घेतली

याबाबत दुकानदाराकडून चौकशी केली आणि त्याचे रेखाचित्र तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता पलूस पोलीस ठाण्यात मृत राजेश जाधव हे मिसिंग असल्याची नोंद मिळाली. यावेळी पोलिसांनी जाधव यांच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी केली असता त्यांनीच खून करून टाकल्याचे सांगितले. याबाबत संशयित तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, मृत राजेश जाधव यांना दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. या व्यसनातूनच पत्नी शोभा यांच्यावर संशय घेऊन वारंवार ते मारहाण करत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पत्नी आणि मुलीने मुख्यसंशयित भाचा देवराज शेवाळे याला हाताशी धरून दि. ३१ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी त्यांना मारून खून केला आणि त्यांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने बांधून मोठ्या प्रवाशी बॅगेत भरून शिराळा येथे टाकला.

तब्बल तीन महिने हा मृतदेह बॅगेत त्याठिकाणी पडून होता. एक अनोळखी व्यक्ती बॅग उघडली आणि परिसरात दुर्गंधी पसरल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेनकर, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक जायनाथ चव्हाण, गणेश खराडे, कुमार पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकास पोलीस अधीक्षकांनी बक्षीस जाहीर केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज