खा. विशाल पाटील यांना एकेरी भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांचा गदारोळ
जनप्रवास प्रतिनिधी
तासगाव : tasgaon news : खा.विशाल पाटील-संजयकाकांमध्ये जोरदार राडा : तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार संजय पाटील आणि खासदार विशाल पाटील एकमेकांना चांगलेच भिडले. समोरासमोर येत दोघात जोरदार खडाजंगी झाली. तासगावमधील रिंग रोडच्या श्रेयवादावरून आजी, माजी खासदारांच्यात वादावादी झाली. खासदार पाटील यांनी भाषणात रिंग रोडचे श्रेय आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना दिले. त्यांच्या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत माजी खासदार पाटील यांनी भाषणात विशाल पाटलांवर टीका केली. त्यावरून दोघात जोरदार वादावादी सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी गदारोळ घातल्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
tasgaon news : खा.विशाल पाटील-संजयकाकांमध्ये जोरदार राडा
सोमवारी तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होत्या. उद्घाटन पार पडल्यानंतर विशाल पाटील यांनी भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचे श्रेय रोहित पाटील आणि आमदार सुमन पाटील यांना दिले. ’तासगावात विकास व्हायला लागला आहे.
ठिकठिकाणी पोस्टर लागले आहेत. हे सुरेश भाऊ तुमच्यामुळे झाले आहे. परवा विटा येथे मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत होतो. त्यावेळी गडकरी म्हणाले तुझ्या रोहितला सांग, तुझं काम मी मंजूर केलं आहे. यावर मी म्हणालो की भाजपचे मंत्री तुम्ही मात्र राष्ट्रवादीच्या एका युवक नेत्यांना आपल्याकडे रिंग रोड संदर्भात निधीसाठी मागणी केली. आपण ती तात्काळ मंजूर केली व आपण निधी दिला. विकासाच्या दृष्टीने आपल्याकडे जी दानत आहे ती त्याची परतफेड आम्ही नक्की करू’, असे विशाल पाटील भाषणात म्हणाले.
विशाल पाटील यांच्या भाषणानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी भाषण केले. या भाषणावेळी विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर खडे बोल सुनावले. ’विशाल पाटील तुम्ही काल खासदार झाला आहात’, असे म्हणत टीकास्त्र सोडले. ’राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची इच्छा आहे. मात्र ते कुठल्या पातळीवर जाऊन कराव याचाही दर्जा ठरलेला आहे. मला जुन्या गोष्टीत जायचं नाही. आज ती वेळ आली आहे. या ठिकाणी आपल्या सहकार्यांना आपल्या भावना व्यक्त करताना पुन्हा त्या गोष्टीची छेडछाड करायचा प्रयत्न केलाय.
त्यामुळेच मला त्या गोष्टी परत स्पष्टपणाने सांगाव्या लागतील. अलीकडच्या काळात जो बाजारबुणगेपणा राजकारणात आलाय. ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून विशाल आपण कोणाच्या कार्यक्रमाला येतो, त्यात कोणाचे योगदान काय आहे व काय नौटंकी करावी, याचं भान ठेवा. मला मला भाजपचा कार्यक्रम घेता आला असता, पण आम्ही एवढे कमकुवत नाही. आमदार, खासदार दोघांनाही बोलवा, असे मी मुख्याधिकार्यांना सांगितले होते. मात्र सन्मान करत असतील तर त्यास आपण पात्र रहा, हा बाजारबुणगेपणा कमी करा, एवढीच माझी तुम्हाला सूचना आहे. मंत्री गडकरी साहेब आणि माझे काय संबंध आहेत,
हे दुनियेला माहित आहे. मी त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहाराचा खुलासा लवकरच करणार आहे. पण आपण हा धंदा बंद करा. विकासाची काम होत आहेत. कोण करत असेल तर त्याच्या आडवे जाण्याचा प्रयत्न करू नका’, असा इशारा माजी खासदार पाटील यांनी भाषणात दिला.
संजय पाटील यांचे भाषण सुरू असतानाच खासदार पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. ’मी भाषणात तुमचे नाव घेतले नाही, तुम्ही माझे नाव काढायचे कारण काय? असे खासदार पाटील यांनी म्हटल्यानंतर, संजय काकांनी ’ये बस खाली’ असे सुनावले. त्यानंतर दोन्ही आजी-माजी खासदारात जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली.
ही खडाजंगी सुरू झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. भाजपचे काही कार्यकर्ते व्यासपीठावर धावून गेले. व्यासपीठावर मोठा गदारोळ माजला होता. नंतर भाजपच्याच माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह काही पदाधिकार्यांनी खासदार पाटील यांची समजूत घातली. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र आजी, माजी खासदारांच्यात झालेल्या खडाजंगीने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.
तर जशास तसे वागणार : संजय पाटील
राजकारणात काही चमकोगिरी करणारी माणसं बेतालपणाने वागत आहेत. त्यांनी नौटंकी सुरू केली आहे. मी खा. विशाल पाटील यांच्या त्यांच्या भाषणावेळी गप्प होतो. मात्र माझ्या भाषणाच्या वेळी त्यांनी गोंधळ घालून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. यापुढे जशास तसे वागण्याची भूमिका आम्ही पुन्हा घेतली आहे. असे माजी खासदार संजय पाटील यांनी सांगितले.तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटील
तासगाव : या वादानंतर युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले की, तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही. वैफल्यग्रस्त लोक असे वागतात. संजय पाटील यांचे कार्यकर्ते व्यासपीठाकडे शिव्या देत आले. श्रेयवादासाठी गोंधळ घातला गेला. त्यांनी सांगितले की, आमदार सुमनताई पाटील, खासदार विशाल पाटील बसलेल्या व्यासपीठाकडे संजय पाटील यांचे कार्यकर्ते धावून गेले. श्रेयवादासाठी काही मंडळींनी गोंधळ घातला. वैफल्यग्रस्त लोकांकडून असे प्रकार होत असतात. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, हे येत्या काळात आम्ही दाखवून देऊ, असे रोहित पाटील म्हणाले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



