जनप्रवास तासगाव
TASGAON VIDHANSABHA : विधानसभेसाठी रोहित पाटील सज्ज ” राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. इच्छुकांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी 2024 चा विधानसभेचा गड सर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी विधानसभेची ’तुतारी’ फुंकल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
TASGAON VIDHANSABHA : विधानसभेसाठी रोहित पाटील सज्ज
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ हा राज्यातील संवेदनशिल मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ, या मतदारसंघातील स्व. आर. आर. पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. हा संघर्ष आता दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. स्व. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे त्यांचा गट नैराश्येत गेला आहे. या निवडणुकीत आमदार सुमन पाटील गटाने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम केले. त्यामुळे संजय पाटील चिडून आहेत. येत्या विधानसभेला पराभवाचे उट्टे काढत बदला घेण्याच्या तयारीत संजय पाटील आहेत. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत संजय पाटील स्वतः उभे राहणार की आपल्या मुलाचे नशिब आजमवाणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
दुसरीकडे रोहित पाटील यांनी मात्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
त्यांच्या उमेदवारीलाही शरद पवार यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून रोहित पाटील मतदारसंघातील गाव न् गाव पिंजून काढत आहेत. सत्ता असताना व नसतानाही मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तळमळीने झटत आहेत. युवकांना सोबत तर जेष्ठांचे आशिर्वाद घेत रोहित पाटील यांनी आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. मतदारसंघातील कोट्यवधी
रुपयांची विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. विरोधी पक्षातील मंत्र्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. स्व. आर. आर. पाटील यांची पुण्याई व सहानभुतीही त्यांच्या कामी येत आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न घेऊन ते प्रत्येक आठवड्यात मुंबईला जातात. संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटतात. प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात.
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही रोहित पाटील यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. गडकरी यांच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्त्यांसह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटील यांची धडपड सुरू असते. मतदारसंघातील
सामान्य जनतेच्या मनामनात त्यांनी ’घर’ करण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार यांनी रोहित पाटील यांच्या रुपाने आश्वासक व युवा चेहरा निवडला आहे.
त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. राज्यातील जबाबदारीबरोबरच ते मतदारसंघातही पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. मतदारसंघातील सामान्य लोक त्यांच्या रुपाने भावी आमदार पाहत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर नेमके कोणाचे आव्हान असणार, याकडे मतदासंघाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र समोर कोणीही असले तरी त्यांना धूळ चारण्यासाठी रोहित पाटील यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.