vasantdada karkhana news : वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात खा. विशाल पाटील यांना अखेरच्या क्षणी यश आले. खा. विशाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, विद्यमान संचालक अमित पाटील यांच्यासह 21 संचालकांची बिनविरोध निवड झाली. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांची कारखान्याच्या संचालकपदी एन्ट्री झाल्याने दादा घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात सक्रीय झाली आहे.
vasantdada karkhana news : वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध
हर्षवर्धन पाटलांची कारखान्यात एन्ट्री: दादा घराण्याची चौथी पिढी राजकारणात
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे 36 हजार सभासद आहेत. कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटातून प्रत्येकी तीन प्रमाणे पंधरा तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदासंघातून दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीचा एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून एक तर महिला गटातून दोन असे 21 संचालक निवडणूक द्यायचे होते. त्यासाठी 144 अर्ज दाखल झाले होते.
यामध्ये विद्यमान अध्यक्ष खा. विशाल पाटील यांच्यासह विद्यमान संचालक अमित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, आदिनाथ मगदूम, निवास पाटील, बजरंग पाटील, तानाजी पाटील, दौलतराव शिंदे, शिवाजी कदम, सुनील आवटी, मीनाक्षी पाटील, प्रकाश कांबळे, कमल पाटील, संभाजी मेंढे आदींनी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये 33 अर्ज अपात्र झाले होते. त्यानंतर अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवारची होती. या मुदतीत खा. विशाल पाटील यांना सहकार्य करत 21 जागांसाठी 21च अर्ज राहिले. इतरांनी अर्ज माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
प्रतिक पाटील यांचे मोठे सुपूत्र हर्षवर्धन पाटील यांची सांगली उत्पादक गटातून बिनविरोध निवड झाली आहे.
त्यामुळे वसंतदादा पाटील यांची राजकारणात चौथी पिढी सक्रीय झाली आहे. याबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांना कारखान्यावर संधी देण्यात आली. तर विद्यमान संचालक व वसंतदादा शेतकरी शिक्षण मंडळाचे अमित पाटील यांना देखील पुन्हा संधी देण्यात आली. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खा. विशाल पाटील व कारखान्याचे संचालक अमित पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. यासाठी आ. विश्वजीत कदम व आ. रोहित पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले.
बिनविरोध झालेले संचालक पुढीलप्रमाणे:
उत्पादक सह.संस्था:- खा. विशाल पाटील (सांगली). उत्पादक गट सांगली:- बाळासो पाटील (कळंबी), दिनकर साळुंखे (माधवनगर), हर्षवर्धन पाटील (सांगली). मिरज गट:- दौलतराव शिंदे (म्हैसाळ), शिवाजी कदम (शिरढोण), तानाजी पाटील (खंडेराजुरी). आष्टा गट- संजय पाटील (कवठेपिरान), ऋतुराज सूर्यवंशी (अंकलखोप), विशाल चौगुले (कसबेडिग्रज). भिलवडी गट:- यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत-पाटील (सावंतपूर), अमित पाटील (येळावी). तासगाव गट:- अंकुश पाटील (बोरगाव), उमेश मोहिते (मांजर्डे), गजानन खुजट (तासगाव). अनुसूचित जाती, जमाती:- विशाल चंदूरकर (कवठेएकंद). महिला गट:- सुमित्रा खोत (हरिपूर) व शोभा पाटील (म्हैसाळ). इतर मागासवर्गीय:- अंजूम महात (सांगली). भटक्या विमुक्त जाती व जमाती:- प्रल्हाद गडदे (ब्रम्हनाळ).
संचालक मंडळात 19 नवे चेहरे…
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावर्षी विद्यमान अध्यक्ष खा. विशाल पाटील यांनी नव्या चेहर्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 21 संचालकांपैकी 19 हे नवे चेहरे आहेत. सर्वात तरूण चेहरा म्हणून प्रतिक पाटील यांचे सुपूत्र हर्षवर्धन पाटील असणार आहेत. खा. विशाल पाटील स्वत: तर त्यांचे मावस बंधू अमित पाटील हे केवळ जुने चेहरे आहेत. तर कारखान्याचे कर्मचारी बी. डी. पाटील देखील आता संचालक असणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



