rajkiyalive

vidhansabha election 2024 : विधानसभेला जिल्ह्यात जरांगे-पाटलांचा पर्याय खुला

जनप्रवास । सांगली
vidhansabha election 2024 : विधानसभेला जिल्ह्यात जरांगे-पाटलांचा पर्याय खुला : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू हो असताना मराठा समजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही राज्याच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. जरांगे-पाटील शांतता रॅलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. येत्या 29 ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत घोषणा करु, असे जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही टेन्शनमध्ये आहेत. जरांगे-पाटील यांच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांसाठी नवा पर्याय खुला झाला आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांच्या संपर्कात कोण-कोण राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आगामी काळातील आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. मनोज जरांगे यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय असेल, याबाबत मात्र सुतोवाच या आधीच केले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमका कुणाला फायदा होईल, अशा प्रकारचे राजकारण तर मनोज जरांगे यांचे सुरु नाही ना? अशी चर्चा आहे.

जिल्ह्यात आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

त्यामुळे जरांगे यांच्या संपर्कात कोण जाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. 2019 मध्ये पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली होती, त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशातच जयश्रीताईंनी जोरदार तयारी सुरू केल्याने एकाचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट आहे.

दुसरीकडे भाजपमध्ये विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचे तिकीट मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे डावलले जाणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक वाढले आहेत. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी आमदार दिनकर पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनीही मराठा कार्डचा आधार घेत दावेदारी सांगितले आहे. या तिघांपैकी एक जरांगे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

खानापूर=आटपाडी मतदारसंघात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटाला तिकीट मिळणार आहे.

दिवंगत आ. अनिल बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे लढणार असल्याचे स्पष्ट आहे. याशिवाय महायुतीमधून अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीही मतदारसंघातून ठोकण्याची तयारी दर्शवली आहे. शिंदे गटाला तिकीट मिळाल्यास अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्यासाठी जरांगे-पाटील यांचा पर्याय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते कोणती भूमिका घेणार हे येत्या काही कालावधीत स्पष्ट होईल.

जत मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांनी जतमधून तयारी सुरू केली आहे.

जत मतदारसंघात माजी आमदार विलासराव जगताप हे निवडणूक लढविणार नसल्याने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमधून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जतमध्ये पडळकर यांनाच पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता गृहीत धरले जात आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनीही माजी आमदार जगताप यांना सोबत घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याकडूनही विधानसभेची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ज्यादा असल्याने तिकिटावरून नाराजी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित यांना यंदाची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडी तिकिटाचा प्रश्न निर्माण होणार नसला तरी महायुतीमध्ये इच्छुक वाढले आहेत. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेची रणनीती आखायला सुरुवात केली होती, याशिवाय जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रतापराव पाटील यांनीही लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या पाठिंब्याची चर्चा आहे. भाजपचे तिकीट प्रभाकर पाटील यांना मिळाल्यास प्रताप पाटील यांच्यासाठी जरांगे-पाटील यांचा पर्याय खुला आहे.

मोहन व्हनखंडे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या मिरज मतदारसंघ हा राखीव आहे. यंदा भाजपकडून इच्छुक वाढले असल्याने पक्षाचे तिकीट मंत्री खाडेंनाच मिळणार आहे. खाडे यांचे तत्कालीन स्वीय सहायक मोहन व्हनखंडे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांच्यासोबत जनसुराज्य पक्ष आहे. महाविकास आघाडीचे तिकीट शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. तेथून जिल्हा बँकेच्या संचालक बाळासाहेब होनमोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. शिवसेनेचे प्रा. सिद्धार्थ जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे जरांगे-पाटील नवा पर्याय मिळू शकतो.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या विरोधात यापूर्वी शिवसेना होती. आता शिवसेना महाविकास आघाडीत सामील असल्याने काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला. विरोधात भाजप लढणार असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

इस्लामपूरच्या जागेवरून रस्सीखेच होणार असून महायुतीतील एक नेता नाराज होण्याची शक्यता आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा मार्ग क्लिअर आहे. मात्र महायुतीकडून ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत गौरव नायकवडी यांनी सेनेकडून निवडणूक लढवली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भोसले यांनी निवडणुकीची तयारी करीत आहेत. गतवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पद नसल्याने पाटील-भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मात्र यश आले नाही. त्यामुळे इस्लामपूरच्या जागेवरून रस्सीखेच होणार असून महायुतीतील एक नेता नाराज होण्याची शक्यता आहे.

शिराळा मतदारसंघात  दोघांपैकी एकाला भाजपचे तिकीट मिळणार असले तरी एकाची संधी हुकणार आहे,

शिराळा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत. तिथं त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनीही विधानसभेची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. दोघांपैकी एकाला भाजपचे तिकीट मिळणार असले तरी एकाची संधी हुकणार आहे, त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या नाराजांना यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे-पाटील यांचा पर्याय खुला होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मराठासोबत दलित, मुस्लिम, धनगर समाजालाही हाक

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा इशाराही यापूर्वीच दिला आहे. सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबतच दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी असदुद्दिन ओवेसी, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांना आधीच आवाहन देखील केले आहे. एकंदरीतच आगामी काळात नेमका कुणाला फायदा-कुणाला तोटा होईल, अशा प्रकारचे राजकारण तर जरांगे यांचे सुरु असल्याचे दिसून येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज