rajkiyalive

vidhansabha election 2024 : सांगलीत अजितदादा, शिंदे गटाला जागा कुठे?

जनप्रवास । सांगली

vidhansabha election 2024 : सांगलीत अजितदादा, शिंदे गटाला जागा कुठे? : राज्यात विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार असली तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमध्ये अद्यापही काही हालचाली दिसत नाहीत. जिल्ह्यातील आठ विधानसभेच्या जागांमध्ये सहा ठिकाणी भाजपच प्रबळ दावेदार आहे. खानापूर-आटपाडी आणि इस्लामपुरच्या जागेवर शिंदे सेवा इच्छुक आहे, मग अजितदादा गटाला जागा कुठं? असा विषय चर्चेला आला आहे. याशिवाय जनसुराज्य शक्तीनेही दोन जागांवर दावा केला आहे, त्यामुळे महायुतीत सारे काही अलबेल नसल्याचे दिसते. महायुतीतील घटक पक्ष नामधारीच असल्याने निवडणुकीत एकदिलाने काम होणार की लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, अशी चर्चा रंगली आहे.

vidhansabha election 2024 : सांगलीत अजितदादा, शिंदे गटाला जागा कुठे?

विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम होणार की लोकसभेची पुनरावृत्ती

लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली. लोकसभेच्या यशाने महाविकास आघाडी सुसाट आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उर्जितावस्था निर्माण झाली आहे. आता विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होत आहेत. या निवडणुकींना अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेस लोकसभेला अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. आता हेच वारे विधानसभेला कायम रहावे, असा प्रयत्न इच्छुकांनी सुरु केला आहे. परंतु वातावरण तापू लागताच महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीवरून चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती आणि आरपीआय आठवले गटाचा समावेश आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. सांगली आणि मिरज मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. सांगलीत सुधीर गाडगीळ आणि मिरजेतून राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर गाडगीळ प्रतिनिधीत्व करतात. या दोन जागा भाजपच्या निश्चित झाल्या आहेत. जत मतदारसंघ भाजपकडे आहे. गत निवडणुकीत भाजपचे विलासराव जगताप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. जगताप हे लोकसभा निवडणुकीत भाजपपासून दूर राहिले. परंतु गेल्या महिन्याभरापासून पुन्हा सक्रिय झाले आहेत. भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याचे सांगण्यात येत आहे, जगताप विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

शिराळा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. तेथे माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक जोरदार तयारी करीत आहेत.

जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्याकडूनही विधानसभेची चाचपणी करण्यात येत आहे, त्यामुळे शिराळ्यात भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट झाले. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवलेली नाही, मात्र लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते पुत्र प्रभाकर यांच्यासाठी प्रयत्नशिल आहेत. महायुतीमध्ये पलूस-कडेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे प्राबल्य नगण्य आहे. भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पलूस-कडेगावकडे भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

खानापूर-आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे.

स्वर्गीय आमदार अनिल बाबर हे सलगदोन वेळा निवडून आले होते. या जागेवरुन खानापूर-आटपाडी मतदारसंघावरुन पेच निर्माण होणार आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे, मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे. तेथून बाबर यांचे पुत्र सुहास यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. विद्यमान आमदार शिंदे गटाचा असल्याने शिंदे गटाला जागा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. अशातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा लढण्याचा चंग बांधल्याने महायुतीत वादाची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत सांगली, मिरज, जत, शिराळा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत.

याशिवाय पलूस-कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांशी जागांवर भाजपच प्रबळ दावेदार असल्याचे चित्र दिसून येते. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला मिळाल्यास शिंदे गट, अजितदादा गटासह जनसुराज्य पक्षाला कोणती जागा मिळणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतही महायुतीमध्ये फाटाफुट झाली होती.

घटक पक्षांत एकमत नसल्याने त्याचा फटका सांगली लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. विधानसभा निवडणुकीतही घटक पक्षांना समाधानकारक जागा मिळणार नसल्याने महायुती एकदिलाने लढणार का? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ट नेते सांगली जिल्ह्यातील जागांवर कशा पद्धतीने तोडगा काढणार हे पहावे लागेल.

जनसुराज्यच्या दावेदारीने भाजपची कोंडी
महायुतीतील घटक पक्ष विधानसभेसाठी दावेदारी करु लागले आहेत. शिंदे गट आणि अजितदादा गट अद्याप शांत असला तरी जनसुराज्य शक्ती पक्षाने मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघ देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात जनसुराज्यची ताकद कमी असली तरी दोन्ही मतदारसंघावर दावा करुन भाजपची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते. मिरज मतदारसंघ भाजपकडे राहिला आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे सलग तीन वेळा निवडून आले आहे. जत मतदारसंघ 2019 वगळता 2004, 2009 आणि 2014 या कालावधीत भाजपकडे राहिला, त्यामुळे भाजप जतची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज