जनप्रवास । प्रतिनिधी
विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष, सोमवारी शेवटची मुदत : सांगली ः सांगली लोकसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीची आज (सोमवारी) शेवटची मुदत आहे. दुपारी तीननंतर लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीसाठी 20 उमेदवारांचे 25 अर्ज वैध ठरले आहेत. भाजपचे खा. संजयकाका पाटील, ठाकरे गट शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यासह काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून शिवसेनेची कोंडी झाली. अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ट पातळीवरुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात कोणाविरुद्ध कोण दंड थोपटणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष, सोमवारी शेवटची मुदत
सांगली लोकसभेसाठी तिसर्या टप्प्यात 7 मे रोेजी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. अर्ज भरण्याच्या मुदतीत 30 उमेदवारांचे 39 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज छाननी शनिवारी पार पडली असून त्यामध्ये 14 अर्ज अवैध ठरले. आता 20 उमेदवारांचे 25 वैध ठरले आहेत. काही उमेदवारांचे डमी अर्ज आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या अधिक दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा अर्ज आहे.
काँग्रेसच्या विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी मिळेल, असा प्रयत्न शेवटपर्यंत राहिला. परंतु पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला आहे. याशिवाय स्वाभिमानी पक्षाचे महेश खराडे, बहुजन समाज पार्टीचे सिकंदर पटवेगार, ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे, भारतीय किसान पार्टीचे पांडुरंग भोसले, बळीराजा पार्टीचे आनंद नलगे, हिंदुस्थान पार्टीचे सतिश कदम यांच्यासह अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत. भाजपकडून आ. सुधीर गाडगीळ यांचा डमी अर्ज भरण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी दिग्गजांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
काँगे्रेसचे विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ट पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत यांनीही माघारीसाठी काँगे्रेसवर दबाव टाकला आहे. काँग्रेसचे नेते विशाल यांना आघाडी धर्म पाळावा, अशा सूचना करीत आहे. त्यामुळे पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीनंतर सांगलीचा निवडणुकीचा आखाडा दुरंगी की तिरंगी हे स्पष्ट होईल. अनेक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मत विभागणीचा धोका टाळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अपक्षांना माघार घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



