rajkiyalive

विशाल पाटलांच्या माघारीसाठी काँग्रेसचे मुंबई, दिल्लीहून दबावतंत्र

जनप्रवास । सांगली
विशाल पाटलांच्या माघारीसाठी काँग्रेसचे मुंबई, दिल्लीहून दबावतंत्र : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या माघारीसाठी मुंबई, दिल्लीहून काँग्रेस नेत्यांचे दूरध्वनी विशाल पाटील यांना येऊ लागले आहेत. मात्र विशाल पाटील यांनी निवडणूक कार्यकर्त्यांसाठी लढण्याचा ठाम निर्धार केला असल्याने त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. तरी देखील अंतिम क्षणी ते माघार घेतील, असा विश्वास शिवसेना (उबाठा) कडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अर्ज माघारीसाठी सोमवारची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विशाल पाटलांच्या माघारीसाठी काँग्रेसचे मुंबई, दिल्लीहून दबावतंत्र

निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटामध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती. शिवसेनेने कोल्हापुरची जागा काँग्रेससाठी सोडली होती. त्या बदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा मागितली होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी याला होकार दिला नव्हता. तरी देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व नेते खा. संजय राऊत यांनी सांगलीत येऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यावरून काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. त्यांनी दिल्ली व मुंबईच्या पक्ष श्रेष्ठींना सांगलीची जागा सोडू नये, अशी विनंती केली होती. तरी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत सांगलीची जागा शिवसेनेने घेतली.

यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले.

विशाल पाटील यांच्यावर अपक्ष अर्ज दाखल करण्यासाठी दबाव आणला. अखेर पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस पक्षाकडून एक आणि एक अपक्ष अर्ज दाखल केले. दि. 19 पर्यंत पक्षाने विचार करावा व एबी फॉर्म द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. त्यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला आहे. आता महाविकास आघाडीने एकास-एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने विशाल पाटील यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांच्याकडे केली होती.

अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आम्ही विशाल पाटील यांची समजूत काढू, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले होते.

अर्ज माघार घेण्यासाठी सोमवार दि. 22 पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची मनधरणी करण्यासाठी रविवार व सोमवारचे दोनच दिवस आहेत. त्यांना दिल्ली व मुंबईतील नेत्यांचे दूरध्वनी येऊ लागले आहेत. दबावतंत्राचा वापर सुरू केला जात आहे. शनिवारी सकाळी विशाल पाटील यांच्याशी संपर्क झाला नव्हता. पण सायंकाळी पुन्हा पक्षाकडून त्यांच्यावर दबावतंत्र टाकले जात आहे. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची स्पष्ट नकार दिला आहे. सांगलीत काँग्रेसवर अन्याय झाला आहे. या अन्यायाच्या चिडीतून माझी उमेदवारी दाखल झाली आहे. आता कार्यकर्त्यांसाठी लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले असल्याचे वृत्त आहे.

विशाल पाटील यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली आहे.

त्यामुळे माघार घेण्याची शक्यता कमी आहे. सोमवार दि. 22 अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीत त्यांच्या उमेदवारीचा निर्णय होणार आहे. त्यानंतरच ही निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील नेत्यांच्या नजरा विशाल पाटील यांच्या उमेदवारीकडे लागल्या आहेत.

आ. विश्वजीत कदमांशी काँग्रेसकडून संपर्क…

विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आ. विश्वजीत कदम यांनी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 19 होती. या मुदतीपर्यंत काँग्रेस एबी फॉर्म देईल, अशी अपेक्षा आ. विश्वजीत कदम यांनी यांना होती. मात्र पक्ष एबी फॉर्म दिला नाही. विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज कायम आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज माघार घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून संपर्क केला जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज