जनप्रवास/विटा
vita crime news : जोंधळखिंडीत शेततळ्यात बुडून लेंगरेतील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू : जोंधळखिंडी येथे शेततळ्यात बुडून सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. कैलास उर्फ रामचंद्र विठोबा शिंदे (62 वर्षे, रा. लेंगरे, ता. खानापुर, जि. सांगली) असे मयत शिक्षकांचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जोंधळखिंडीचे पोलिस पाटील चंद्रकांत मधुकर घाडगे यांनी फोनवरून वर्दी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
vita crime news : जोंधळखिंडीत शेततळ्यात बुडून लेंगरेतील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील कैलास उर्फ रामचंद्र विठोबा शिंदे यांचे जोंधळखिंडी गावात शेत आहे. या शेतात त्यांनी मोठे शेततळे काढले आहे. शेततळ्यातील पाण्यात त्यांनी मत्स्यपालन देखील केले होते. मंगळवारी दुपारी ते लेंगरे येथून घरातून शेतात जातो, असे सांगून दुचाकी गाडीने निघाले. मात्र रात्री उशीर झाला तरी ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. बुधवारी सकाळी त्यांची दुचाकी शेततळ्याच्या नजीक आढळून आल्याने ग्रामस्थांना संशय आला.
त्यानंतर शेततळ्यात शोधाशोध सुरू केली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला. शेततळ्यात पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथकाने जोंधळखिंडी येथे घटनास्थळी भेट दिली.
मयत कैलास शिंदे हे मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. अत्यंत कष्टातून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. जोंधळेखिंडी येथे शेती विकत घेऊन त्यांनी विविध प्रयोग केले. त्यांना शेतीची विशेष आवड होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीमध्ये अधिक लक्ष दिले होते. मात्र बुधवारी अचानक त्यांचा मृतदेह त्याच शेतातील शेततळ्यात आढळून आल्यामुळे लेंगरे आणि परिसरात एकच खळबळ माजली.
अत्यंत शांत, हुशार, निगर्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा पंचक्रोशीत लौकिक होता. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी यासह परिवार आहे. दुपारी शोकाकुल वातावरणात लेंगरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



