vita drugs news : विट्यातील एमडी ड्रग्जचे सूत्रधार जेरबंद ” सांगली : खानापूर तालुक्यातील कर्वे येथे एमडी ड्रग्ज बनवणार्या कारखान्यावर छापा टाकून सदरचा कारखाना काही दिवसांपूर्वी उध्वस्त करण्यात आला. सदरचा कारखाना चालविणार्यांची पाळेमुळे खाणण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले आणि या कारखान्यास आर्थिक मदत, ड्रग्ज बनवण्यासाठी मार्गदर्शन करणार्या तिघांना अटक केली आहे.
vita drugs news : विट्यातील एमडी ड्रग्जचे सूत्रधार जेरबंद
संशयित जितेंद्र शरद परमार (वय 41, रा. नागडोंगरी, ता. अलिबाग, सध्या रा. माहिम, मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय 53, रा. फिल्डरवाडा, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय 34, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मशीनरी आणि केमिकल्सच्या तपासासाठी सांगली पोलिसांची पथके मुंबई, दिल्ली आणि गुजरात येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विटा जवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवणार्या रहुदिप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत) सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (वय 24, रा. विटा) या तिघांना दि. 27 रोजी अटक करण्यात आली. त्यांनी बनवलेले 29 कोटी रूपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी तिघांची कसून चौकशी केली. तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. सहाजणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार रहुदिप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली.
सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली. मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली. सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले. तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुलरज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले.
अधीक्षक घुगे म्हणाले, आतापर्यंत सहाजणांना अटक केली असून आणखी कोणाचा सहभाग आहे काय? त्यांना आर्थिक मदत कोणी केली? कच्चा माल कोण पुरवत होते? त्यांनी कार्वे येथून कोणाला ड्रग्ज विकले आहे काय? याचा तपास केला जाणार आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आर्थररोड कारागृहाबाहेर येताच ठरला प्लॅन….
टोळीतील सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाख शेख आणि सरदार पाटील यांच्यावर 2019 मध्ये एमडी ड्रग्जचे उत्पादन केल्याबद्दल मुंबईत काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईवेळी 200 किलो एमडी ड्रग्ज पकडले होते. चौघेजण पाच वर्षे कारागृहात होते. तेथे रहुदिप बोरिचा, बलराज कातारी यांची ओळख झाली. या गुन्ह्यात पाच वर्षांनी जामिनावर बाहेर येताच सहा जणांनी एमडी ड्रग्ज कारखान्याची उभारणी करण्याचे ठरवले. ग्रामीण भागात कोणाला संशय येणार नाही त्यामुळे त्यांनी कारखाना उभारण्यासाठी कार्वे एमआयडीसीची जागा निवडल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वाळव्यातील सरदार पाटीलला ड्रग्ज बनवण्याची माहिती…
सरदार पाटील हा रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला माहिती होती. तसेच रहुदिप हा देखील रसायनशास्त्राचा पदवीधर आहे. कार्वे येथे तिघांनी ड्रग्जचा कारखाना उभारल्यानंतर सरदार पाटील यांने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले होते. ड्रग्ज उत्पादनाचा दोन वेळा प्रयत्न फसला होता. मात्र, तिसर्यांदा त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. पहिलीच बॅच कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर आमच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



