rajkiyalive

vyafale murdar news : वायफळे येथील खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके जेरबंद

’एलसीबी’ची पुणे येथे कारवाई : 24 तासात आवळल्या मुसक्या

vyafale murdar news : वायफळे येथील खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके जेरबंद : तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले आहे.

vyafale murdar news : वायफळे येथील खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके जेरबंद

वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत. गेल्या काही वर्षात हा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातूनच दोन्ही कुटुंबातील अनेकांवर यापूर्वी गुन्हेही दाखल झाले आहेत.

गेल्या काही वर्षात या कुटुंबांमधील वाद वारंवार उफाळून येत होता. गावपातळीवर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील वाद तेवतच होता. दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके हा आपल्या साथीदारांसह वायफळे येथील बसस्थानक चौकात आला. त्या ठिकाणी त्याने रोहित फाळके व त्याच्या मामांची मुले आदित्य साठे व आशिष साठे (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर तलवार व कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी रोहित हा घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र आदित्य व आशिष यांच्यावर वर्मी घाव बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते.

याचवेळी त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर अस्लम शिकलगार (रा. वायफळे) याच्यावर या टोळक्याने विनाकारण हल्ला केला. तेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, रोहित हा आपल्या घराकडे पळून गेला. विशाल फाळके व त्याच्या टोळीने त्याचा पाठलाग केला. घराजवळ त्याला कोयता व तलवारीने मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय, आई जयश्री हे धावून आले. मात्र त्यांच्यावरही विशालसह त्याच्या टोळीने हल्ला केला.

यावेळी विशाल फाळके म्हणाला, ’तुम्हाला किती वेळा सांगितले आहे, माझ्या नादाला लागू नका. आमच्यावरील केस मागे घ्या. तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही ऐकत नाही. आता मरा, असे म्हणत रोहित, त्याचे वडील संजय, आई जयश्री यांच्यावर धारधार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर या टोळीने धूम ठोकली. यानंतर जखमी अवस्थेत सर्वांना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित फाळके याचा मृत्यू झाला. तर जयश्री फाळके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. इतर तिघांवर भिवघाट येथील रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विशाल फाळके याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींचीही विचारपूस केली.

त्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली. ठिकठिकाणी युद्ध पातळीवर विशाल फाळके व त्याच्या टोळीचा शोध सुरू झाला. अखेर अवघ्या 24 तासाच्या आत पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात विशाल फाळके यांच्या मुसक्या आवळण्यात आले. तो त्या ठिकाणी एक जणाकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले.

विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे (पुणे शहर), वारजे – माळवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), बिबवेवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो मोक्कामधील आरोपी आहे. त्यामुळे त्याच्यासह टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी ’फिल्डिंग’ लावली होती. अखेर त्याला ताब्यात घेण्यात ’एलसीबी’च्या पथकाला यश आले.

तासगाव पोलीस ठाण्यासमारे नातेवाईकांचा ठिय्या

वायफळे येथील रोहित फाळके खून प्रकरणात आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. रोहितच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे खून होऊन 24 तास उलटले तरी रोहितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज