rajkiyalive

ISLAMPUR VIDHANSABHA : वाळव्याच्या नायकवडींचा पुन्हा यु टर्न

 

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

ISLAMPUR VIDHANSABHA : वाळव्याच्या नायकवडींचा पुन्हा यु टर्न जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी राजकीय दबदबा असणार्‍या वाळव्याच्या नायकवडी घराण्यातील तिसरी पिढी गौरव नायकवडींनी गेल्या विधानसभेत थेट जयंत पाटील यांच्या विरोधात लढून हवा निर्माण केली होती. नुकतेच त्यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोल्हापूर ते पेठ दादांच्या गाडीत बसून त्यांनी प्रवास केला. त्यांची वाटचाल अजितदादा गटाकडे आहे, हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची गरज आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीत जयंत पाटील हेच आपले विरोधक समजून नागनाथअण्णांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रकार त्यांच्या पुढील पिढीकडून होताना दिसत आहे. नायकवडी घराण्याचा यु टर्न लोकांना काही आता नवीन राहिला नाही.

 

ISLAMPUR VIDHANSABHA : वाळव्याच्या नायकवडींचा पुन्हा यु टर्न

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत, तसे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षप्रवेशाला जोर चढला आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनी कामाला सुरूवात केली आहे. ज्या त्या लोकसभा मतदार संघात काही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. दुसर्‍या फळीतील नेत्यांची मात्र कसोटी लागली आहे.

वाळव्याचे थोर क्रांतीकारक स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी मोठे योगदान दिले.

भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 मध्ये पहिल्यांना विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दुसरी निवडणूक 1957 मध्ये झाली या निवडणुकीत मात्र त्यांचा विजय झाला. त्यावेळी त्यांनी विद्यमान आमदार एस. डी. पाटील यांचा पराभव करून निवडून झाले. नागनाथअण्णांनी आयुष्यभर आपली भूमिका कायम ठेवली. काँग्रेसला त्यांचा कायमच विरोध होता. त्यानंतर त्यांनी भाजप आणि शिवसेनेला अंगाला शिवूनही घेतले नाही. नागनाथअण्णांच्या हयातीपर्यंत त्यांचे वारसदार वैभव नायकवडी यांनीही आपली भूमिका तीच ठेवली. आता गौरव नायकवडींच्या रूपाने तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. गौरव नायकवडींनी वाळव्याचे सरपंच असताना अनेक विकासकामे केली. परंतु राजकारणात अजूनही त्यांना आपली भूमिका कायम ठेवता आली आही. समाजवादी काँग्रेस, शिवसेना ते आता अजितदादा पवार गट राष्ट्रवादी अशी त्यांची वाटचाल होताना दिसत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत गौरव नायकवडींना शिवसेनेची उमेदवारी मिळाली.

जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. परंतु त्यांना अपयश आले. लोकसभा निवडणुकीत ते धैर्यशील मानेंच्या बाजूने उभे राहिले. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. अनेक नेत्यांनी आपले पक्ष आणि गट बदलले. गौरव नायकवडींची वाटचालही आता अजितदादा पवार गटाकडे सुरू आहे. अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चाही झाली आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. शिवसेनेत ते जास्त काळ रमले नाहीत. जयंत पाटील यांना या घराण्याचा कायमच विरोध राहिला आहे. परंतु डॉ. पतंगराव कदम, स्व. आर. आर. पाटील यांच्याशी मात्र त्यांचे चांगले जमत होते.

अजित पवारांनाही जयंत पाटील यांच्या विरोधात मोठा विरोधक हवा आहेच.

परंतु इस्लामपूर ही जागा कायमच शिवसेनेच्या वाटणीला आली आहे. सध्या आनंदराव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे खंदे समर्थक आहेत. आणि उमेदवारीसाठी तेही प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये आता गौरव नायकवडींंचीही भर पडली आहे. नायकवडी घराण्याचा विरोध हा जयंत पाटलांना नवीन नाही. गेल्या पाच वर्षात त्यांना विरोधाची चांगली संधी होती. परंतु गेल्या पाच वर्षात त्यांचे दर्शनच कोणाला झाले नाही. आता निवडणुका जवळ आल्यानंतर पुन्हा एकता ते चर्चेत आले आहेत. निवडणुकीला रहायचे झाल्यास पहिल्यांदा त्यांना विरोधकांनापेक्षा स्वकियांना एकत्र आणावे लागेल.

जयंत पाटील यांना विरोध हेच नायकवडी घराण्याचे धोरण

1957 नंतर 1985 मध्ये नागनाथअण्णा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर नायकवडी घराण्याला पुन्हा कधी संधी मिळाली नाही. वैभव नायकवडी आणि गौरव नायकवडी यांनी विधानसभेला जयंत पाटलांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. आता पुन्हा एकदा अजितदादा यांच्याबरोबर चर्चेने नायकवडी घराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या यु टर्नने त्यांना किती फायदा मिळणार हे मात्र येणारा काळच ठरेल..

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज