प्रताप मेटकरी / विटा
संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्ही शरद पवार गटासोबत असे जाहीर केले होते. मात्र त्यांचे पुत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे अजित पवार गटासोबत राहिले. यावरुन सदाभाऊंच्या भूमिकेबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क वर्तवले जात होते. मात्र त्यांनी काहीकाळ याबाबत आपली भूमिका अधिकृतरित्या कुठेही मांडलेली नव्हती. मात्र आता माजी आमदार सदाशिवराव पाटील हेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटासोबतच दिसत आहेत.
ATPADI :. अखेर सदाभाऊंच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
विट्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सदाभाऊंनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेशच केला असल्याचे दिसून आले. त्यांचे पुत्र ड. वैभव पाटील यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षांची भूमिका दिल्यानंतर त्यांनी अख्खा जिल्हा पिंजून काढला आहे. पक्षवाढीसोबत पक्षाची ध्येयधोरणे ते तळागाळात पोहचवित आहेत. हे काम करत असतानाच ते खानापूर विधानसभा मतदारसंघावरही लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मतदारसंघातील भेटीगाठींवरही भर दिला आहे. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्याने मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत मिळत आहेत.
मतदारसंघात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान
निवडणूक आयोगाने तशी माहितीही मागविली आहे. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याही शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका होत आहेत. वैभव पाटील हेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर उठबस करताना दिसत आहेत. तर तिसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विधानसभा मतदारसंघाचा केंद्रबिंदू असणार्या विट्याच्या होमग्राऊंडवर राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्याही हालचाली वाढल्या आहेत. त्यांच्या गटाकडून अभ्यासू, अनुभवी, प्रामाणिक व नेहमी जनमाणसांत असणारा नेता म्हणून सुशांत देवकर यांचेही नाव चर्चेत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा नेत्यांतच फाईट
त्यामुळे या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा नेत्यांतच फाईट होण्याचे संकेत आहेत. सदाभाऊ पाटील हेही आता ग्राऊंडवर उतरत आपल्या पुत्राला ताकद देत आहेत. तेही वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून अजितदादा पवारांची भेट घेत आहेत. या भेटीचे फोटो झपाझप सोशल मिडियावर झळकत आहेत. एका गटाकडून कामाच्या प्रयत्नाची बातमी आली की दुसरा गटही नेत्यांबरोबरचे कामाचे पत्र घेवून प्रसिद्धीस देत आहे. त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई आपसुकच जनतेच्या लक्षात येत आहे.
जो तो आपआपल्या परीने विकासकामाचा धडाका लावण्यात मग्न
खानापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावरुन ते दिसूनही आले आहे. एकंदरीतच जो तो आपआपल्या परीने विकासकामाचा धडाका लावण्यात मग्न आहे. कारण पुढील निवडणुका हेच त्याचे द्योतक आहे. एकंदरीतच ड. सदाशिवराव पाटील यांच्या भूमिकेबाबत असणारे संभ्रम आता दुर होवून ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटासोबत असल्याच्या निर्णयावर मात्र आता खर्या अर्थाने शिक्कामोर्तबच झाले आहे. त्यामुळे ऐन फेब्रुवारीच्या कडक वाढत्या उन्हाळ्याबरोबर खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय गटांकडून जय्यत मोर्चेबांधणी सुरू आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



