जनप्रवास । सांगली ः
SANGLI LOKSABHA : ठाकरे गटाच्या प्रचाराला काँग्रेस, राष्ट्रवादी जाईना : सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली मात्र विरोधी महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मतभेद सुरुच आहेत. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर करुन काँग्रेसला खिंडित गाठले. अशातच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या विशाल पाटलांना ‘मैदानात या, पळ काढू नका’ असा पुन्हा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेसला इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाल्याचे दिसते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिकीट वाटप निश्चित नसल्याने ठाकरे गटाच्या प्रचाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने टाळले असल्याचे चित्र दिसत आहे.
SANGLI LOKSABHA : ठाकरे गटाच्या प्रचाराला काँग्रेस, राष्ट्रवादी जाईना
‘खासदारांचे इशार्यावर इशारे, काँग्रेसचे काय?
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सांगलीमध्ये जोरदार राजकारण रंगले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असे चित्र निर्माण झाले. भाजपने जाहीर केलेल्या दुसर्या यादीतच विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार कामाला लागले आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोध असला तरी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
एकीकडे भाजप प्रचाराला लागली असताना विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीबाबतचा पेच सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले नसताना शिवसेनेचे उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत पक्षपवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. यावेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. महाविकास आघाडीच्या बैठकीतही सांगलीचा विषय चांगलाच गाजला. मात्र सेना जागेवरील हट्ट सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीवरुन वाद सुरुच आहे.
निवडणुकीपूर्वी खा. संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मैदानात यावे, पळ काढू नये, असे ललकारले होते. त्यानंतर विशाल यांनीही खासदारांना प्रत्त्युत्तर देत कामाला सुरुवात केली. लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठकांचा धडाका लावला. विशाल हे मतदारांपर्यंत पोहोचले असल्याने काँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले होते. या परिस्थिीतीत ठाकरे गटाने सांगलीवर डाव टाकल्याने विशाल यांची कोंडी झाली आहे.
मिरजेत प्रचार करताना संजयकाकांनी पुन्हा काँगे्रस नेते विशाल पाटील यांना डिवचले आहे. निवडणुकीचा आखाडा सुरु झाला आहे. मी तयार आहे, विरोधकांचा मेळ लागता लागेना. मी मैदानातून पळ काढणार नाही, म्हणणार्यांना तिकीटासाठी पायपीठ सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पळ काढला असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र मैदानात या पळ काढू नका, असे सांगत विशाल पाटलांना पुन्हा आव्हान दिले आहे. भाजपकडून आव्हान देत असताना महाविकास आघाडीतील तिढा सुटला नसल्याने जिल्ह्यातील काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे विशाल पाटील हे संजयकाकांना कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ठाकरे गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे, परंतु महाविकास आघाडीकडून अधिकृतरित्या सांगलीच्या जागेचा तिढा सुटला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते शिवसेनेच्या प्रचाराकडे फिरकत नसल्याचे दिसत आहे.
बळीराजा पार्टी लोकसभेच्या सात जागा लढविणार
सांगलीत आनंद नलगे-पाटील, हातकणंगलेत शिवाजी माने रिंगणात
सांगली ः सत्ताधारी केंद्र सरकारला शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल आहे. देशात सर्वाधिक शेतकर्यांची संख्या असताना त्यांचे प्रश्न कायम असल्याने बळीराजी पार्टीने लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सात जागा लढविण्यात येणार असून सांगलीतून आनंद नलगे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजकीय पक्षांना केवळ सत्ता टिकवण्यात रस आहे. पक्ष आणि वारसा टिकविण्याच्या नादात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. व्यापार्यांची मक्तेदारी वाढली असून केंद्र सरकारही चुकीची भूमिका घेत आहे. शेतकर्यांनी दिल्लीच्या वेशीवर धडक मारली तरीही सरकार दखल घ्यायला तयार नाही. दिवसेंदिवस शेतकर्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. याविरोधात काही शेतकरी संघटनांनी आवाज उठविला मात्र त्या ही राजकीय पक्षांशी बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मूळ प्रश्न कायम राहिले आहेत. त्यामुळे बळीराजा पार्टीने शेतकर्यांचे प्रश्न संसदेत जावून मांडण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बळीराजा पक्षाच्या राज्यातील सात उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष रास्ते यांनी जाहीर केली. सांगलीतून आनंद नलगे-पाटील यांना, हातकणंगलेतून शिवाजी माने, भंडारातून प्रदिप ढोबळे, ह.भ.प.संभाजी गुणाट महाराज मावळ, संविधान लोखंडे रामटेक, कैलास पवार परभणी तर लातुरमधून शंकर तडाखे निवडणूक लढवणार आहेत.
शेती, शेतकरी, तरुण, बेरोजगारी, कामगार महिलांचे शोषण या मुद्यावर समविचारी संघटनांच्यावतीने ऐतिहासिक लोकसभेची निवडणूक लढवली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रास्ते यांनी सांगितले. यावेळी उदय पाटील, सदाशिव कुलकर्णी, राहुल पाटील, प्रकाश शिंगाडे, शांता बागडे, आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



