हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट,. आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार?

SHARE:

एबीपी माझा, मुंबई :

हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट,. आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार? : महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर केली, पण त्यावरून आता वाद होताना दिसत आहे. हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असूनही त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली आहे. त्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील मानेंचं काय होणार याची चर्चा सुरू आहे.

हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट,. आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 मार्च रोजी त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामधील हेमंत पाटील आणि भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंना विरोध

जाहीर करण्यात आलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यामध्ये रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे. तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातीलधैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता.

निवेदिता माने आणि राजश्री पाटलांना संधी

धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्यात आलं आहे. भावना गवळी या यवतमाळमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

कृपाल तुमाने यांचे तिकीट कापलं

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आले होते. त्यामधीलच भावना गवळी, हेमंत पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. तर धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी या आधीच कापण्यात आली आहे.

गजानन किर्तीकरांना तिकीट नाही

वायव्य मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांनी वयाचं कारण देत निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या ठिकाणी अभिनेता गोविंदाला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वायव्य मुंबईतून ठाकरे गटाकडून गजानन किर्तीकर याचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेमंत गोडसेंना संधी नाहीच?

भावना गवळींचं तिकीट कापल्यानतंर आता नाशिकच्या हेमंत गोडसेंचंही तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल अशी माहिती आहे. अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून आपण तुमच्यासोबत आलो, पण आता उमेदवारीसाठीही झगडावं लागतंय अशी भावना सध्या या खासदारांची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर भाजपकडून फुली मारण्यात आली आहे ते विद्यमान खासदार एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं चित्र आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *