special news : चिंचणीत वडिलांच्या खंबीर साथीच्या जोरावर तीनही भावंडे झाले डॉक्टर : वडिलांचे एम बी बी एस डॉक्टर होण्याचे स्वप्न परिस्थितीमुळे अधुरे राहिले; मात्र त्याच स्वप्नाची ज्योत त्यांनी आपल्या मुलांच्या मनात पेटवली. जिद्द, शिस्त, मेहनत आणि आई-वडिलांच्या खंबीर साथीच्या जोरावर तीनही मुलांनी वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे, एकाच घरातील तीनही भावंडे एम बी बी एस डॉक्टर होण्याच्या मार्गावर असून चिंचणी गावातील जाधव कुटुंबाने तासगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचा नवा अध्याय लिहिला आहे.
special news : चिंचणीत वडिलांच्या खंबीर साथीच्या जोरावर तीनही भावंडे झाले डॉक्टर
मूळचे सावर्डे गावचे व चिंचणी येथे गेल्या अनेक वर्षांपासून जनरल क्लिनिक चालविणारे डॉ. अच्युत जाधव हे बी ए एम एस डॉक्टर आहेत. त्यांच्या काळात काही गुणांनी एम बी बी एस ची संधी हुकली होती. मनात राहिलेली ही खंत त्यांनी मुलांवर कधी लादली नाही; मात्र तिन्ही मुलांनी डॉक्टर व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. अखेर मोठी मुलगी मानसी, दुसरी मुलगी श्रुती आणि धाकटा मुलगा आदित्य यांनी वडिलांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणले.
मोठी मुलगी मानसी जाधव हिने नीट 2024 मध्ये 626 गुण मिळवत पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट कोट्यातून एम बी बी एस ला प्रवेश मिळवला.
दुसरी मुलगी श्रुती जाधव हिनेही नीट 2024 मध्ये 622 गुण मिळवत एम आय एम ई आर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे येथे एम बी बी एस साठी प्रवेश मिळवला.
तर धाकटा मुलगा आदित्य जाधव याने नीट 2026 मध्ये 493 गुण मिळवत कर्नाटकातील एस. नजलिंगप्पा मेडिकल कॉलेजमध्ये सेमी गव्हर्नमेंट कोट्यातून एम बी बी एस ला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिन्ही भावंडांनी वैद्यकीय शिक्षणाची वाट धरली असून, जाधव कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला आहे.
या यशामागे केवळ अभ्यास नव्हे, तर कुटुंबाने जपलेली शिस्तही महत्त्वाची ठरली. डॉ. अच्युत जाधव सांगतात, आम्ही मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी सांगलीत ठेवले. बारावी आणि नीट ची परीक्षा होईपर्यंत तिन्ही मुलांनी इंस्टाग्राम , फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा वापर केला नाही. ही शिस्त आम्ही त्यांच्यावर लादली नव्हती; त्यांनी स्वतःहून ती पाळली. या दिवसासाठी कुटुंबाने अनेक रात्री जागून काढल्या. आज माझं राहिलेलं स्वप्न मुलांनी पूर्ण केलं, यापेक्षा मोठा आनंद कोणता?
मुलांची आई रुपाली जाधव या बँकेत नोकरी करतात. मुलांच्या यशाबद्दल त्या म्हणाल्या, घरातील वातावरण कायम आनंदी आणि हलकं-फुलकं ठेवले. अभ्यासाचा ताण कधी दिला नाही. मुलांच्या अभ्यासाच्या वेळेनुसार आम्ही आमच्या कामाच्या वेळाही जुळवून घेतल्या. मुलांनी आमच्या कष्टाचे चीज केले.
छोट्या गावात राहून, कोणत्याही दिखाव्यापेक्षा शिस्त, सातत्य, मेहनत आणि पालकांची साथ यांना महत्त्व देत जाधव कुटुंबाने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही साधी असली तरी योग्य ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कुटुंबाचा विश्वास असेल तर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे जाधव कुटुंबाने दाखवून दिले आहे.
चिंचणीतील या कुटुंबाचे तासगाव तालुक्यातून कौतुक होत असून, तीनही भावंडांच्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










