padalkar news : खानापूरमधील दोनवेळचा पराभव पडळकरांच्या जिव्हारी! : राजकारणात विजयाचा गुलाल अंगावर पडला की कौतुकाचा वर्षाव होतो आणि पराभव पदरी पडला की त्याच्या जखमा मनाच्या कोपर्यात कायमच्या घर करून बसतात. काही पराभव काळाच्या ओघात विसरले जातात, तर काही पराभव नेत्यांच्या मनाला बोचत राहतात. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीतही खानापूर विधानसभा मतदारसंघातील दोन पराभवांची सल अद्याप कायम असल्याचे त्यांच्या ताज्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
padalkar news : खानापूरमधील दोनवेळचा पराभव पडळकरांच्या जिव्हारी!
‘2028 नंतर काय करायचे ते मी ठरवेन’; आटपाडीतून दिला राजकीय इशारा!
आटपाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी आपल्या मनातील खंत अगदी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. मला तुम्ही दोन वेळा पाडले. निवडून दिले नाही, त्याबद्दल वाईट वाटते. जतकरांनी मला निवडून दिले. परंतु मी खचणारा नाही. 2028 नंतर मी काय करायचे ते करीन, असे म्हणत त्यांनी खानापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले. त्यांच्या या विधानातून केवळ पराभवाची खंतच नव्हे, तर भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षेची चाहूलही दिसून आली.
पडळकरांच्या राजकीय प्रवासात खानापूर-आटपाडी हा परिसर महत्त्वाचा राहिला आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, या पहिल्याच विधानसभा लढतीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मतदारांनी त्यांना तिसर्या क्रमांकावर ढकलले.
या निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना 77 हजार 965 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार अनिल बाबर यांना 74 हजार 976 मते मिळाली. सदाशिवराव पाटील यांनी अवघ्या 2 हजार 989 मतांच्या फरकाने विजय मिळवला. दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांना केवळ 19 हजार 24 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला हा कौल पडळकरांसाठी मोठा धक्का होता.
मात्र, पहिल्या पराभवाने ते थांबले नाहीत. पराभवातून धडा घेत त्यांनी पुन्हा एकदा खानापूरच्या रणांगणात उतरण्याची तयारी केली. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवली. यावेळी पक्ष बदलला, राजकीय ताकद वाढली आणि मतांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली. मात्र, विजयाचे स्वप्न पुन्हा अपुरेच राहिले.
2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनिल बाबर यांना 72 हजार 849 मते मिळाली, तर काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना 53 हजार 52 मते मिळाली. पडळकरांनी मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत मोठी झेप घेत 44 हजार 419 मते मिळवली. मतांचा आकडा वाढला, जनाधार विस्तारला; पण विजयाची सीमा त्यांना ओलांडता आली नाही. पुन्हा एकदा तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दोन निवडणुका, दोन पराभव आणि दोनदा तिसरा क्रमांक! विशेष म्हणजे, हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील केवळ आकड्यांचा विषय नव्हता. ज्या खानापूर-आटपाडीच्या भूमीतून राजकीय वाटचाल उभी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले, त्याच भूमीने दोनदा त्यांना नाकारले. त्यामुळे या पराभवांची सल त्यांच्या मनात खोलवर रुतून बसली असावी, असे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवते.
त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.
मात्र, या निवडणुकीतही त्यांना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अखेर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठे यश मिळाले. जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर भरभरून विश्वास टाकला आणि त्यांना विधानसभेत पाठवले. खानापूरमध्ये दोनदा नाकारले गेलेले पडळकर जतच्या जनतेच्या पाठिंब्याने आमदार झाले. एका मतदारसंघाने नाकारले, तर दुसर्या मतदारसंघाने त्यांना स्वीकारले.
मात्र, जतकरांनी दिलेल्या विजयाच्या आनंदातही खानापूरच्या पराभवाची सल कायम असल्याचे आटपाडीतील त्यांच्या वक्तव्याने अधोरेखित केले आहे. राजकीय कारकिर्दीतील मोठे यश मिळाल्यानंतरही होम ग्राउंडवरील दोन पराभव त्यांना विसरता आलेले नाहीत.
त्यामुळेच 2028 नंतर काय करायचे, याबाबत त्यांनी दिलेले संकेत महत्त्वाचे ठरत आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच कामाला लागण्याचे आदेश देत त्यांनी भविष्यातील राजकीय तयारीचे संकेत दिले. मात्र, 2028 नंतर पडळकर नेमकी कोणती भूमिका घेणार? खानापूर-आटपाडीत पुन्हा राजकीय ताकद उभी करणार? की नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणार? याची उत्तरे आगामी काळातच मिळतील.
आता 2028 नंतर पडळकर कोणते राजकीय पाऊल उचलणार, याकडे खानापूर-आटपाडीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण पडळकरांच्या या वक्तव्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, खानापूरमधील दोन पराभवांचा हिशोब त्यांच्या मनातून अजून पुसला गेलेला नाही!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.









