ऊस दर प्रश्नासाठी पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरकोगनोळी सोबतच हत्तरगी, कराड, सातारा, इंदापूर आणि कर्नाटकातील हुबळी, गदग परिसरातही महामार्ग रोखण्यात आले आहे..पोलिस प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
raju shetti news :ऊस दर प्रश्नासाठी पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू
केंद्र सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर ऊस उत्पादक शेतकर्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 25 व्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे साखरेचा किमान विक्री हमी भाव प्रतिकिलो 50 रुपये करावा, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणार्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर 70 रुपये करावा आणि लवकर गळीत हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्यांना प्रतिटन 500 रुपये अनुदानसह प्रतिटन 5 हजार रुपये दर मिळावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
काल नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या तीन तासांच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होता केवळ एका आठवड्यात समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज कोगनोळी टोल नाक्यावर हजारो शेतकरी दाखल झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार लेखी निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही, 15 नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही. तातडीने तोडगा न काढल्यास कारखान्यातून बाहेर पडणारी साखरही अडवण्याचा, आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्यावरच पंगती
आंदोलन बेमुदत चालणार असल्याने महामार्गावरच अन्नछत्र आणि जेवणाच्या पंगतींची तयारी करण्यात आली आहे. कागल, निपाणी तालुक्यातील गावांमधून भाकरी-पिठलं गोळा करून तिथेच मुक्काम ठोकण्याची तयारी करण्यात आली आहे. आंदोलक शेतकर्यांनी महामार्गावरच पंगत टाकून जेवण केले.
आंदोलन पसरले
कोगनोळी सोबतच हत्तरगी, कराड, सातारा, इंदापूर आणि कर्नाटकातील हुबळी, गदग परिसरातही महामार्ग रोखण्यात आले आहे..पोलिस प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. पलूस तालुक्यात शंभरावर उसाची वाहने अडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भर उन्हातील आंदोलनात शेतकर्यांचा मोठा सहभाग असल्याने मोठ्या छावणीचे स्वरूप आले आहे.
ऊस, काका अन् बाप!
राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी साखर कारखाने अडचणीत असल्याचा संदर्भ देत राजू शेट्टीं यांना उद्देशून पहिली उचल 5 हजार रुपये द्यायला तुमच्या काकाने ठेवलेत का, अशा शब्दांत फटकारले. त्यावर राजू शेट्टी यांनी, उसाचा दर जाहीर न करता ऊस तोडायला ती काय तुमच्या बापाची पेंड आहे का, असा संतप्त पलटवार केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










