rajkiyalive

शिराळा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोणाला ?

हातकणंगले लोकसभा निवडणुक ……….

जनप्रवास : ( हिंदुराव पाटील )

शिराळा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोणाला ?: सध्या देशात व राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीकडुन शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडुन (उबाठा ) शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील- सरुडकर व वंचित आघाडीकडुन कोल्हापुर जि.प. चे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील असे चार प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शिराळा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोणाला ?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील 2019 लोकसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघात 67.52 टक्के मतदान झाले होते. तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मा. खा राजु शेट्टी यांनी खा. धैर्यशील मानें पेक्षा जास्त मतदान घेत मताधिक्य घेतले होते. मात्र इतर विधानसभा मतदारसंघात मतदान कमी झाल्याने त्यांचा पराभव झाला होता.

मात्र आता शिराळा तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे आहे.

मागील निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्यासाठी माजी आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक तर महाविकास आघाडीच्या राजु शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या मा.आ मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी प्रचार केला होता. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. 2019 च्या विधानसभेवेळी सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणुकीनंतर शिवाजीराव नाईक यांनी भाजपातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

सध्या आ. मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे काम करत आहेत

सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक भाजपा पक्षाचे काम करत आहेत. शिवाय सत्यजित देशमुख यांच्यावर हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रमुख व सम्राट महाडिक यांच्यावर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून मागील लोकसभेला राजु शेट्टीना मदत करणारे सत्यजित देशमुख आता महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांचा प्रचार करताना तर धैर्यशील मानेंना विरोध करणारे आ. मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजीत पाटील- सरुडकर यांचा प्रचार करताना दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांच्या पाठीमागे शिराळा तालुक्यातील भाजप, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद उभी आहे.

 महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) व काँग्रेसची ताकद उभी आहे.

मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजु शेट्टी हे स्वबळावर लढत असल्याने त्यांच्या पाठीशी यावेळी मात्र शिराळा तालुक्यातुन कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद नाही. तरीही प्रचार सभांतुन त्यांना शेतकर्‍यांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र हा पाठिंबा मतात रूपांतर करण्यात राजु शेट्टी किती यशस्वी होतात हे पहावे लागेल. कारण लोकसभा निवडणुकी नंतर होणार्‍या विधानसभेची तयारी म्हणून भाजप व राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार हे नक्की. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघातून यावेळी मतदार कोणाच्या बाजुने कौल देतात हे पहावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज