विरोधात 47 ते 54 टक्के मते, बहुरंगी लढतीमुळे मतामध्ये घट होण्याची शक्यता

दिनेशकुमार ऐतवडे
हातकणंगलेत 40 टक्के मते मिळाल्यास विजय शक्य : मतांच्या आकडेवारीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात 2009 पासून काँग्रेस आघाडीकडे 39 टक्के मते सातत्याने राहिले आहेत. तर विरोधात 47 ते 54 टक्के मते मिळवून विरोधी उमेदवार निवडून आला आहे. याचा दोन वेळा फायदा राजू शेट्टी्ंना झाला तर एकदा फायदा धैर्यशील मानेंना झाला आहे. त्यामुळे यंदा 40 टक्के मते घेणारा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
हातकणंगलेत 40 टक्के मते मिळाल्यास विजय शक्य
इचलकरंजी मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, पन्हाळा शाहूवाडी तर सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या विधानसभा मतदार संघांचा समावेश होता. यापैकी शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघात कायमच काँग्रेस, राष्ट्रवादी विचाराचे आमदार निवडून आले आहेत. तर शिरोळमध्ये शेतकरी संघटना, यड्रावकर यांच्या गटाची निर्णायक मते आहेत. इचलकरंजीमध्ये आवाडे कुटुंबीय भाजपचे सहयोगी सदस्य झाल्यामुळे येथील काँग्रेस विचाराचे मतदार कमी झाले असून, धैर्यशील माने आणि आवाडे यांच्यामुळे हिंदुत्वादी मतदार वाढले आहेत. हातकणंगले विधानसभा मतदार संघात मिणचेकरांचा अपवाद वगळता कायमच येथे काँगे्रेस विचाराचा आमदार निवडून आला आहे. पन्हाळा शाहूवाडीमध्ये यशवंत एकनाथ यांच्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार 7 वेळा विधानसभेला निवडून आले होते. विनय कोरे यांच्या राजकारणातील पदापर्णानंतर आळीपाळीने येथे कधी कोरे तर कधी सत्यजित आबा यांच्या रूपाने आमदार निवडून येत आहेत. त्यामुळे येथे काँग्रेस आणि विरोधी विचाराचे मतदार समसमान आहेत.
2009 च्या निवडणुकीत राज्ाू शेट्टी त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे राहिले.
त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीने त्यावेळी खासदार असलेल्या निवेदिता मानेंना मैदानात उतरवले. त्यावेळी एकूण मतदार 14 लाख 58 हजार 560 मतदार होते. त्यापैकी 67.1 टक्के मतदान झाले. त्यापैकी राजू शेट्टींना 49.2 टक्के म्हणजे 4 लाख 81 हजार 225 मते मिळाली. तर विरोधी निवेदिता मानेंना 39.4 टक्के म्हणजे 3 लाख 85 हजार 565 मते मिळाली.

2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. याचा फायदा राजू शेट्टींनी घेतला. भाजप आघाडीत ते सामिल झाले.
यावेळी एकूण मतदान 16 लाख 30 हजार 598 मतदार होते. यापैकी 72.9 टक्के मतदान झाले. त्यापैकी राजू शेट्टींनी 54.3 टक्के मते घेतली. त्यांना 6 लाख 40 हजार 428 मते मिळाली. विरोधी काँग्रेस आघाडीच्या मतात काहीच फरक पडला नाही. काँग्रेसच्या कल्लापाण्णा आवाडे यांना 39.2 टक्के म्हणजे 4 लाख 62 हजार 618 मते मिळाली. यावेळी मराठा संघांचे सुरेशदादा पाटील यांनी 2. 2 टक्के म्हणजे 25 हजार 649 मते घेतली.
2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टींना भाजपशी फारकत घेतली आणि काँग्रेस आघाडीत आले.
यावेळी मतदार होते. 16 लाख 93 हजार 449. यापैकी 74.4 टक्के मतदान झाले. काँग्रेस आघाडीत राजू शेटटी येवूनही मतात काहीच फरक पडले नाही. त्यांना 39.3 टक्के म्हणजे 4 लाख 89 हजार 737 मते मिळाली. तर शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना 47.1 टक्के म्हणजे 5 लाख 85 हजार 776 मते मिळाली. यावेळी मात्र वंचितच्या अस्लम बादशहा सय्यद यांनी 9.9 टक्के मते घेतली. त्यांना 1 लाख 23 हजार 419 मते मिळाली. म्हणजे त्यांनी काँगे्रेसच्या नव्हे तर विरोधी भाजप सेनेच्या मतावर डल्ला मारला.
काँग्रेसची मते फिक्स
गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या मतात काहीच फरक पडले नाही. 2009 मध्ये त्यांना 39.5 टक्के, 2014 मध्ये 39.2 टक्के तर 2019 मध्ये वंचित असूनही 39.3 टक्के मिळाली. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसची 39 टक्के मते फिक्स आहेत.
वंचितचा फटका काँग्रेस विरोधी गटाला
2009 पासूनची आकडेवारी पाहिली असता काँग्रेसच्या मतात काहीच फरक पडलेला दिसत नाही. तर 2009 मध्ये विरोधी गटाला 49.2 टक्के, 2014 मध्ये 54.3 टक्के तर 2019 मध्ये 47.1 टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 9.9 टक्के मते मिळाली. त्यांचा फटका काँग्रेसला नव्हे तर विरोधी गटाला बसला आहे.
40 टक्के मते मिळाल्यास विजय शक्य
या मतदार संघात काँग्रेस आघाडीची 39 टक्के मते फिक्स आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबाा सरूडकर यांची 39 टक्के मते फिक्स आहेत. धैर्यशील माने किंवा राजू शेट्टी यांना निवडून यायचे असेल राहिलेल्या 60 टक्के मध्ये वंचित बहुजन आघाडीचाही वाटा आहे. त्यांनी गेल्यावेळीसारखीच 9 ते 10 टक्के मते घेतल्यास त्यांचा फटका सत्ताधार्यांना बसणार आहे. राहिलेल्या 50 टक्केमधील किमान 40 टक्के मते घ्यावी लागतील. गेल्यावेळी राजू शेट्टींना 39.3 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस होती. तर धैर्यशील माने यांना 47.3 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते. दुरंगी लढत होती. यंदा तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



