rajkiyalive

काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत

जनप्रवास । सांगली
काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जिल्ह्यातील पाच नेत्यांनी एकीचे बळ दाखवून दिले. त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालावर दिसून येईल. पण ही ऐकी अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात पलूस-कडेगाव, जत या विधानसभा मतदारसंघाबरोबर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेस झेंडा फडकेल, अशी आशा आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील इच्छूक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत

काँग्रेसच्या एकीने सांगली व मिरज विधानसभेच्या आशा पल्लवीत : सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गटबाजी होती. दादा-कदम गटाच्या वादाबरोबर भाऊ गटाची देखील स्वतंत्र चूल होती. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या गटबाजीला कंटाळले. अनेकांनी पक्ष सोडून भाजपमध्ये आपली जागा तयार केली. यामुळे काँग्रेसला देखील घरघर लागले होते. ही बाब वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी जिल्ह्यातील गटबाजी संपवावी, अशी विनंती सतत जिल्ह्यातील नेत्यांना केली होती. तरी देखील जिल्ह्यातील नेत्यांची गटबाजी निवडणुकीत उफाळून येत होती. पण आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेत्यांनी एक चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या एकीचा आदर्श राज्यात देखील पोहचला आहे.

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील इच्छूक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळत नव्हती.

त्यासाठी आ.विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारीचा शब्द दिला. मुंबई, दिल्ली दरबारी विश्वजीत कदम यांनी ताकद देखील वापरली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी मुंबईत तळ ठोकून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. प्रथमच अशी एकी दिसून आली. शिवसेना (उबाठा) गटाच्या अतीहट्टामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. पण विशाल पाटील अपक्ष लढले आणि पुढे काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले हे सर्वांना ज्ञात आहे.

नेत्यांच्या या एकीमुळे काँग्रेस कार्यकर्ते देखील सुखावले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता काँग्रेसची ताकद वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तीन, भाजपचे दोन आमदार आहेत. एक जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाकडे होती. जिल्ह्यात आता काँग्रेस ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत. पलूस-कडेगाव या मतदारसंघात आ. विश्वजीत कदमांची ताकद आहे. तर जत विधानसभा मतदारसंघ आ. विक्रम सावंत यांनी मजबूत केला आहे. त्यामुळे सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघावर जास्तीत जास्त काँग्रेसने लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मिरज व सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने चांगला प्रचार केला आहे.

या दोन्ही मतदारसंघात भविष्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. स्व. हाफिजभाई धत्तुरे आमदार असताना पक्षावर अनेक हल्ले झाले पण हे हल्ले परतवून लावण्यात काँग्रेसला यश मिळाले. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर भाजपने ताब्यात घेतला आहे. या मतदारसंघात पालकमंत्री सुरेश खाडे प्रतिनिधीत्व करत आहेत. या मतदारसंघातील अनेक भाजपचे दुसर्‍या फळीतील नेते विशाल पाटील यांनी गळाला लावले आहेत. त्यामुळे हे नेते विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे राहिल्यास काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अलीकडच्या काळात फारसे यश मिळाल्याचे चित्र दिसत नाही.

या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. पण काँग्रेस अंतर्गत होत असलेल्या गटबाजीमुळे हा मतदारसंघ भाजपकडे जात आहे. या निवडणुकीत ही चूक सुधारण्याची संधी आहे. लोकसभा निवडणुकीत काँगे्रेसच्या जयश्रीताई पाटील यांनी प्रत्येक प्रभाग व गावात जाऊन 250 हून अधिक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे वातावरण तयार झाले आहे. त्यापूर्वी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विविध आंदोलन व उपक्रमाव्दारे काँग्रेस घराघरात पोहचवली आहे. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांनी लोकसभेला केलेली एकी अशीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठेवली तर निश्चितच सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फायदा होणार आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज