rajkiyalive

SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’

जनप्रवास । सांगली

SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’ : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बाजी मारली, त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघातून तब्बल 18 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये जोरदार सोशल वॉर सुरू झाले आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली असून, ‘भावी आमदार’ अशा पोस्ट शेअर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे विधानसभेला काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’

सांगली लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप पक्षाकडून संजयकाका पाटील तर शिवसेना (उबाठा) गटाकडून चंद्रहार पाटील मैदानात होते. काँग्रेसची उमेदवारी न मिळालेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी भाजपचे संजयकाका पाटील यांचा एक लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. जत विधानसभा मतदारसंघ वगळता विशाल पाटील यांनी सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव व खानापूर-आटपाडी या मतदारसंघात विशाल पाटील यांनी मताधिक्य घेतले. त्यामुळे सांगली विधानसभेची गणित आता बदलत चालली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी सुमारे 18 हजाराचे मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.

Screenshot

SANGLI : विधानसभेपूर्वीच पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई समर्थकांचा ‘सोशल वॉर’ : 2019 च्या निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मैदानात होते. या निवडणुकीत पाटील यांचा सात हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्षे मतदारसंघात संपर्क सुरूच ठेवला. विविध आंदोलने व कार्यक्रमांमुळे ते चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा विधानसभेचा नारा दिला आहे. विशाल पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत विधानसभेचा नारा दिला. तर लोकसभेेचा फक्त ट्रेलर झालाय पिक्चर तर विधानसभेला दाखवायचा आहे. ‘आता एकच लक्ष पृथ्वीराज फिक्स’ अशा पोस्ट त्यांच्या समर्थकांकडून शेअर केल्या जात आहेत.

तर दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत पक्षाकडून सूचना आल्यानंतर थांबलेल्या जयश्रीताई पाटील यांनी यावेळी विधानसभा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी विशाल पाटील यांचा सांगली विधानसभा क्षेत्रात झंझावत प्रचार केला. सांगली, कुपवाड शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराचे दौरे केले. विशाल पाटील यांनी सांगली विधानसभा

मतदारसंघात प्रचाराला वेळ मिळाला नव्हता. मात्र त्यांची धुरा जयश्रीताई पाटील यांनी सांभाळली. 276 बैठका, 20 कॉर्नर सभा व सहा पदफेरी त्यांनी विधानसभा मतदारसंघात काढल्या. त्यामुळे जनतेने दादा घराण्यांवर प्रेम दाखवत 18 हजाराचे मताधिक्य दिले. आता भावी आमदार वहिनीसाहेब, अशा पोस्ट शेअर होत आहेत.

विशाल पाटील यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये भावी आमदार म्हणून जयश्रीताई पाटील यांचे पोस्टर भाऊ समर्थकांकडून झळकवले जात होते. आता सोशल मिडियावर दोन्ही समर्थकांकडून भावी आमदार म्हणून पोस्टर झळकत आहेत. विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर आहेत. तोपूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

आ. विश्वजीत कदमांच्या निर्णयाकडे लक्ष

आ. विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजन करून काँग्रेसची जागा निवडून आणली. आता जिल्ह्यात दोनचे चार आमदार करण्यासाठी त्यांची नवी खेळी असणार आहे. त्यामध्ये सांगली व मिरजेचे अधिक लक्ष आहे. मात्र सांगलीतून पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यापैकी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय आ. कदम घेतील. तर नूतन खासदार विशाल पाटील दहा दिवस-रात्र प्रचार करणार्‍या जयश्रीताई पाटील यांच्या पारड्यात आपले वजन टाकणार की छुप्या पध्दतीने प्रचार करणारे पृथ्वीराज पाटील यांचे नाव रेटणार? हा आता येणारा काळच ठरवणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज