rajkiyalive

SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर

SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर

जनप्रवास । शरद पवळ

SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर  : देशात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीची विधानसभेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला होता. या मतदार संघातील जत विधानसभा वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात जरी महायुतीचा विजय झाला असला तरी इस्लामपूर व शिराळा या दोन्ही विधानसभा मतसंघात महायुतीचा उमेदवार पिछाडीवर आहे. त्यामुळे आगामी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठी ताकद लावावी लागणार आहे.

SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर

SANGLI  सांगली व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीतील चित्र बदलले आहे. सांगली भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा अपक्ष उमेदवार (सध्या काँग्रेसला पाठिंबा) खा. विशाल पाटील यांनी पराभव केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जत वगळता सर्व मतदारसंघातून खा. विशाल पाटील आघाडीवर आहेत.

सांगलीत काट्याची टक्कर होणार

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला बनत आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यावेळी या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीची काट्याची टक्कर होणार आहेे. गेल्या निवडणुकीत जातीय समीकरणे घडली होती. त्यामुळे काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. मतदारसंघात आ. गाडगीळ यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, पण जातीय समीकरणातून निवडणूक रंगली तर त्यांच्या उमेदवारीला देखील धोका असणार आहे. मराठा समाजाचा उमेदवार देण्याचा भाजपने निर्णय घेतला तर माजी आमदार स्व. संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांची नावे देखील पुढे येऊ शकतात.

मिरजेत वाद न मिटल्यास भाजमध्ये बंडखोरी होणार

मिरज विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून पालकमंत्री सुरेश खाडे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे यावर्षी भाजपने उमेदवारी बदलावी, अशा मागणीचा सूर भाजपमधील काही मंडळी करत आहेत. त्यांना महायुतीतील अनेक घटक पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. भाजपकडून एकेकाळचे ना. सुरेश खाडे यांचे सहकारी असलेले मोहन वनखंडे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी मतदारसंघात तयारी देखील सुरू केली आहे. विविध कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावत आहेत. त्यामुळे विधानसभेला या दोघांमधील वाद भाजपने न मिटविल्यास बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

तासगावमध्ये काकांची कसोटी

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा बालेकिल्ला आहे. लोकसभेत भाजपचे संजयकाका पाटील यांचा पराभव झाल्याने या मतदारसंघात ते स्वत: किंवा त्यांचे पूत्र प्रभाकर ताकद आजमावू शकतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत स्वत:च्या बालेकिल्ल्यात संजयकाका पाटील पिछाडीवर होते.
त्यामुळे या मतदारसंघात भाजपची कसोटी लागणार आहे.

आ. विश्वजीत कदम यांना कोण टक्कर देणार? याकडे लक्ष

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भाजपने उमेदवारी डावलल्याने मतदारसंघात नाराजी आहे. तरी देखील विधानसभेची गणिते आखण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपचे ताकदीने काम केले होते. मात्र विशाल पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य या मतदारसंघात मिळाले. त्यामुळे बलाढ्य काँग्रेसचे उमेदवार आ. विश्वजीत कदम यांना पृथ्वीराज देशमुख टक्कर देणार की संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी चाल देणार? याकडे लक्ष लागले आहे.
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात उमेदवारीवरून खेळ रंगला

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून वाद रंगला आहे.

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची ही जागा आहे. या ठिकाणी स्व. अनिल बाबर आमदार होते. त्यांचे पूत्र सुहास बाबर आता लढणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीत सामील झालेल्या राष्ट्रवादी (अजितदादा) गटाकडून जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभेच्या उमेदवारीचा दावा केला आहे. तर भाजपकडून आ. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे देखील शड्डू मारून तयार आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात उमेदवारीवरून खेळ रंगला आहे. भविष्यात जागा कोणाला जाणार? आणि इतरांची नाराजी दूर होणार का? हे महत्वाचे आहे.

जतमध्ये उपरा व स्थानिक असा वाद महायुतीत रंगण्याची शक्यता

जत विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळाले होते. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडे ताकदवान उमेदवार नाही. आ. गोपीचंद पडळकर भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पण उपरा उमेदवार नको, असा वाद रंगत आहे. तर तम्मनगोंडा रवी पाटील, डॉ. रविंद्र आरळी यांची नावे देखील भाजपकडून चर्चेत आहेत. पण उपरा व स्थानिक असा वाद महायुतीत रंगण्याची शक्यता आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा जरी विजय झाला असला तरी जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूर व शिराळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य आहे. त्यामुळे महायुतीला मोठी ताकद विधानसभेला लावावी लागणार आहे.

जयंत पाटीलांसमारे विरोधकांची मूठ बांधणे हे आव्हानच

इस्लामपुरात मातब्बर नेते आ. जयंत पाटील यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे भाजपचे स्वत: जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. तर ही जागा महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेला मिळाली तर जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचे नाव देखील ऐनवेळी पुढे येऊ शकते. मात्र महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांच्या विरोधात असलेल्या सर्व विरोधकांची एकत्रित मूठ बांधणे हे महायुतीला मोठे आव्हान असणार आहे.

शिराळ्यात देशमुख कि सम्राट?

शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आ. मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक एकत्र आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. या मतदारसंघात देखील भाजपकडून सम्राट महाडिक यांनी तयारी केली आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख देखील इच्छूक आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार? महायुतीची ताकद किती लागणार? यावर गणिते असणार आहेत. मात्र एकंदरीत जिल्ह्यात सर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज