rajkiyalive

SANGLI LOKSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त

MIRAJ VIDHANSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त

अनिल कदम
MIRAJ VIDHANSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त : सलग दहा वर्षे खासदार राहिलेले संजयकाका पाटील यांना हॅट्रिक हुकल्याचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागल्यानंतर उर्वरित कामांचा पाठपुरावा करून अस्तित्वासाठी धडपड असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे संजयकाकांचा पराभव करून काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली आहे.

MIRAJ VIDHANSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त

मागील आठवड्यात विशाल यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा आढावा घेऊन कामाला सुरुवात केल्याचे दाखवून दिले. शहरातील वारणा पाणी योजनेचा प्रश्न असेल अथवा पुलाचा प्रश्न, याशिवाय अपूर्ण सिंचन योजना या कामांना गती मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र नवे खासदार आभार दौर्‍यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकसभा निवडणूक होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना सलग तिसर्‍यांदा मैदानात उतरुन हॅटट्रिक करण्याचा चंग बांधला होता.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये विशाल पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र शिवसेनेचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले. नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने डावलल्याने विशाल यांना मतदारांची सहानुभुती मिळाली अन् भाजपला पराभवाचा धक्का बसला. संजयकाका पाटील हे दहा वर्षे खासदार होते. परंतु त्या कालावधीत खासदारांकडून उठावदार कामगिरी झाली नाही.

जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वकांक्षी असलेल्या रांजणी ड्रायपोर्ट, सलगरे लॉजिस्टीक पार्क आणि कवलापुरातील विमानतळाचा प्रश्नही प्रलंबितच राहिला. केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपच्या खासदारांना मोठा प्रकल्पही आणता आलेला नाही. उद्योग, व्यवसाय वाढीसाठीही त्यांच्याकडून प्रयत्न असफल झाला, त्याचा परिणाम निवडणुकीवरही झाल्याने फटका बसला. पराभवानंतर हताश झालेल्या संजयकाकांनी मरगळ झटकूून कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात 1594 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येणार्‍या तीन महिन्यात या पथदर्शी उपक्रमाची सुरुवात होणार आहे. म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली.

देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे.

म्हैसाळनंतर टेंभू, ताकारी आणि विस्तारित म्हैसाळ योजनाही सौर ऊर्जेवर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचा फायदा मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. रेल्वेच्या अपूर्ण कामांसाठी त्यांच्याकडून धडपड सुरु आहे. याशिवाय बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस ही साप्ताहिक रेल्वे मिरज रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारीत करण्याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यालाच सकारात्मक प्रतिसाद देत बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस ही मिरज जंक्शनपर्यंत विस्तरित करण्यास मंजूरी दिली आहे.

नूतन खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत शपथ घेवून परतल्यानंतर कामाला सुरुवात केली.

खासदारकीचा कार्यकाल सुरु झाल्याने जिल्ह्यातील विकासकामांची सद्यस्थिती माहिती घेत शासकीय अधिकार्‍यांशी संवाद सुरु केला. प्रलंबित प्रश्न मार्गी लावून अधिकाधिक निधी आणण्याचा चंग बांधला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने अधिकार्‍यांच्या हातात संपूर्ण कारभार आहे. त्यामुळे खासदारांनी स्वतःच लक्ष घातले आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील विकास कामांबाबतची माहिती घेतली होती.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील वारणा पाणी योजनेचा प्रश्न पुढे आला आहे. प्रशासनाने वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, त्याबाबतचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. या योजनेला काही लोकांनी विरोध दर्शवला आहे, त्याबाबत कोणती भूमिका घेणार हे पहावे लागेल. तासगाव, आटपाडी, विटाकडे जाणार्‍या माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ते काम पूर्ण मुख्य रस्ता रहदारीसाठी सुरु ठेवणे लोकांच्या सोयीचे आहे. त्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयातील आढावा घेतल्यानंतर नवे खासदार पाटील यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरु केला आहे.

यापूर्वी काही तालुक्यात जावून मतदारांशी संवाद साधला आहे. उर्वरित गावांना भेटी देण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यामुळे माजी खासदार संजयकाका अ‍ॅक्टिव्ह झाले असताना नवे खासदार विशाल पाटील हे आभार दौर्‍यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील प्रश्नांसह सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी पाठपुराव्याची गरज

सांगलीचे नवे खासदार विशाल पाटील यांनी केवळ आढावा घेवून चालणार नाही. शहरातील पाणीप्रश्नासह शेरी नाल्याचा प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेला नाही, याबाबत काही ठोस उपाययोजना करता येतील का? यासाठी प्रयत्नांची गरज आहे. जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा लागेल. या प्रलंबित कामांना गती देण्याची नव्या खासदारांकडून अपेक्षा आहेत. याशिवाय सध्या सुस्त झालेले प्रशासन गतीमान करण्यासाठी कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
***

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज