rajkiyalive

khanapur atpadi vidhansabha 2024 : खानापुरात सुहासभैय्या ट्रेडिंगमध्ये

महाविकास आघाडीचे नेतेही करू लागले जवळीकता; बाबर आवडे सर्वांना

 प्रताप मेटकरी

khanapur atpadi vidhansabha 2024 : खानापुरात सुहासभैय्या ट्रेडिंगमध्ये : खानापूर विधानसभा मतदारसंघातील विरोधक कोणत्या पक्षातून लढणार ? महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा कोणाला जाणार? बंडखोरी होणार काय ? सर्वजण एकत्र येवून एकच उमेदवार देणार काय ? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या गर्तेत खानापूरातील बाबर विरोधक अडकले असताना महायुतीचे संभाव्य उमेदवार माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास बाबर हे खास ट्रेंडींगमध्ये आले आहेत. आता तर महायुतीच नाही तर महाविकास आघाडीचे नेतेही त्यांना जवळ करू पाहत आहेत. त्यामुळे बाबर आवडे सर्वांनाच हे चित्र सध्या तरी खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर निर्माण झाले आहे.

khanapur atpadi vidhansabha 2024 : खानापुरात सुहासभैय्या ट्रेडिंगमध्ये

खासदार विशाल पाटील यांनी शिंदे गटाच्या सुहास बाबरांना पाठींबा देवून राज्यात धमाका उडवून दिला. मी सोडवणूक करून घेतली, अपक्ष असल्याने कोणाला घाबरत नाही, अशी वक्तव्य खासदारांनी केली त्याच वेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केला. खासदारांच्या बोलण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी जो मेसेज जायचा होता तो तोपर्यंत तळागाळात पोहचला होता.

काँग्रेस पक्षातील काही तुटपुंजा विरोध सोडला तर बहुतांशी काँग्रेस समर्थक सध्या या निवडणुकीपुरते तरी बाबरांना सोडायच्या तयारीत नाहीत.

काँग्रेस पक्षाचे एक नेते उघड बोलले तर याच पक्षातील कार्यरत असणारे कदम गटातील या मतदारसंघातील जवळपास सर्वच कदम समर्थक यापूर्वीच बाबर यांच्याशी संधान साधून आहेत. एकजण बोलले तर दुसरे न बोलता काम करतात. युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी या जागेवरचा विषय सोडला त्याचवेळी तसे हे स्पष्ट झाले होते. काँग्रेस पक्षातील काही तुटपुंजा विरोध सोडला तर बहुतांशी काँग्रेस समर्थक सध्या या निवडणुकीपुरते तरी बाबरांना सोडायच्या तयारीत नाहीत. विशेष म्हणजे खानापूरचे गजानन भगत सोडले तर या मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसकडे कोणीही अर्ज केलेला नाही.

राष्ट्रवादीच्या आर. आर. गटाचं काय ठरलंय ते आता सर्वांना कळून चुकलयं.

एका बाजूस काँग्रेस पक्षाची अशी अवस्था असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे स्टारप्रचारक तासगावचे रोहीत पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच चक्क त्यांच्याच समर्थकांनी रोहीत यांच्याबरोबर सुहास बाबर यांचेही पोष्टर झळकावले. विशेष म्हणजे त्यावर आमचं ठरलंय असं लिहलं होतं. म्हणजे राष्ट्रवादीच्या आर. आर. गटाचं काय ठरलंय ते आता सर्वांना कळून चुकलयं. आता याठिकाणी दुसरा जो राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांना मानणारा गट आहे. त्यांचं अजुन काही ठरलं नाही असं बोललं जात असलं तरी त्यांच्याही वरिष्ठ बैठकीत हा मतदारसंघ मिळावा अशी चर्चाच झाली नसल्याचे समजते आणि आज जयंत पाटील हे शरद पवार गटाचे राज्यातले उमेदवार जाहीर करत असताना त्यांच्याच खानापूर मतदारसंघाबाबत ते अजून का बोलले नाहीत हा चिंतनाचा विषय आहे.

महाविकास आघाडीतील दोन पक्षांची अशी भुमिका दिसत असताना महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे राज्य पातळीवरील नेते बाबर कुटूंबियांना सतत मदत करताना दिसत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन या देवेंद्र फडणवीस यांच्या डाव्या उजव्या मंत्र्यांनी बाबर यांना दिलेला प्रचंड निधी हा त्यांची भूमिका कोणत्या दिशेला जात आहे हे दर्शविणारा आहे.

प्रतापनानांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे उघड वक्तव्य केले.

भाजपा कमी म्हणून की काय अजितदादा पाटील प्रवेश केलेले शिरगावचे नेते जिल्हा बँकेचे संचालक प्रतापनाना पाटील यांनी कहरच केला. अजितदादा गटाकडून त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे या मतदारसंघात इच्छुक असताना प्रतापनानांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे उघड वक्तव्य केले. महायुतीत उरला सुरला शिंदे गट म्हणजे बाबरांचे होमपीचच झाले आहे. मुंबईला जायचे मुख्यमंत्र्यांना सांगायचे आणि सढळ हस्ते निधी मंजूर करून घ्यायचा. बाबरांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाही तर मंत्री शंभुराज देसाई, दिपक केसरकर, उदय सामंत आणि सगळेच मंत्री मदतीला धावून जात आहेत. त्यामुळे सुहास बाबर हे चांगलेच ट्रेंडींगमध्ये आले आहेत.

शिवसेना उध्दव ठाकरे गट मात्र एकाकी बाबरांशी लढताना दिसत आहे.

त्यातही या पक्षाचे नवे नेते पै. चंद्रहार पाटील यांनीही बाबर यांच्या विरोधात अजून तरी काही शब्द काढला नाही. जुने शिवसैनिक संजय विभुते हे एकमेव खिंड लढवत आहेत. आता हे जरी खरे असले तरी आणि वरिष्ठ पातळीवरून बाबरांना चांगली मदत होत असली तरी या मतदारसंघात निर्णायक ठरणारी आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख या युतीतीलच घटकपक्षातील नेत्यांचा बाबरांना तसा विरोधच दिसतो. यापैकी अनेकांची भूमिका ही अजून गुलदस्त्यात आहे.

त्यामुळे आज तरी खानापूरच्या राजकीय शेअरबाजारात बाबर यांची तेजी आहे.

त्यांचा आलेख चढता दिसत आहे. उद्या विरोधकांनी पत्ते उघडल्यावर अशीच तेजी राहते की मार्केट खाली येते हे पाहणे रंजक ठरेल. याचे भान अतिउत्साही बाबर समर्थकांना आहे की नाही कोण जाणे.
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सर्वच पक्षात काम केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला विरोध नको असा सुप्तसूर दोन्ही काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात आहे.

कधीकाळी बाबरांनी दोन्ही काँग्रेसमध्ये काम केले आहे. आणि जरी शिंदे गटात राहिले तरी दोन्ही काँग्रेसशी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी सलोखा ठेवला होता. सुहास बाबर यांचा भाव वधारण्यामागे त्यांच्या वडीलांची पुण्याई हाही एक भाग असल्याचे बोलले जाते आहे. अनिलभाऊंच्या निधनानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या कुटूंबाला विरोध नको, भविष्यातील जिल्हयाच्या राजकारणात हा मेसेज जाता कामा नये याची दक्षता घेताना काही नेतेमंडळी दिसत आहे.

अनेक नेते आकस्मिक गेल्यानंतर आमदार बाबर यांनी त्यांच्या वारसांना निवडणूकीत मदत व्हावी म्हणून पक्षविरहीत मदत केली होती असेही काहीजण बोलून दाखवतात. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हयातील सर्वपक्षीय नेते खानापूरबाबत सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. तर वडीलांच्या माघारी केवळ सहानुभुतीवर सगळ्या गोष्टी होणार नाहीत हे जाणून सुहास बाबर जी धडपड करत आहेत ती देखील दखल घेण्यासारखी आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज