rajkiyalive

diliptatya patil : सहकारातील नव्या पर्वाचे गुरू दिलीपतात्या पाटील

diliptatya patil : सहकारातील नव्या पर्वाचे गुरू दिलीपतात्या पाटील : ग्रामीण भागाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती घडवून आणण्याचा सहकारी चळवळीचा मुख्य हेतू आहे. मात्र संस्था सक्षमपणाने आणि शिस्तपूर्वक चालवाव्या लागतात. त्यासाठी कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून व्यावसायिक यशाची पथ्ये पाळावी लागतात. सर्व कार्यपद्धतीचा आदर्श दिलीपतात्यांनी कौशल्यपूर्ण व्यवस्थापनातून राज्याला दाखवून दिला आहे. साखर, वस्त्रोद्योग आणि बँकिंग क्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्थापनाच्या व्यावसायिक कौशल्याची पायाभरणी करीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्रात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यामुळे आजच्या घडीला सहकारातील नव्या पर्वाचे गुरू म्हणून दिलीपतात्या पाटील यांचेच नाव घ्यावे लागेल. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त…

diliptatya patil : सहकारातील नव्या पर्वाचे गुरू दिलीपतात्या पाटील

वाळव्यातून सांगलीपर्यंत येण्यासाठी तात्यांना तब्बल 37 वर्षे वाट पहावी लागली. या मार्गावरील अनेक खड्डे पार करीत 2015 मध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनले. बँकेच्या इतिहासात सर्वाधिक 6 वर्षे चेअरमनपद, ऐवढेच नव्हे तर बँकेला 100 कोटी रुपयांचा नफा मिळवून देणारे अध्यक्ष म्हणून दिलीपतात्यांचे नावे कोरले गेले. राज्यातील ज्या सहकारी सूतगिरण्या नेत्रदीपक प्रगती करून दाखवत आहेत. त्यामध्ये राजारामबापू उद्योग समूहातील इस्लामपूरची शेतकरी सहकारी सूतगिरणी पहिल्या क्रमांकावर राहिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, इंद्रप्रस्थ पतसंस्था, काजूवरील प्रक्रिया उद्योग, दूधसंस्था, पाणीपुरवठा संस्था, शैक्षणिक संस्था या पातळीवरही तात्यांनी आदर्श काम उभी करून स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.

त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे. याचे श्रेय उद्योगाच्या विकासासाठी अहोरात्र धडपडणार्‍या दिलीपतात्यांना आहे. लोकनेते राजारामबापू पाटील आणि त्यांच्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या विचारधारेशी तात्या नेहमीच एकनिष्ठ राहिले. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, माणसे जोडणे आणि जोडलेल्या माणसांकडून काम वाढवणे ही राजारामबापूंच्या नेतृत्वाची शैली जीवनात उतरवणारे कार्यकर्ते म्हणून दिलीपतात्यांच्या जीवनाची जडणघडण झाली आहे. सामान्य माणसांच्या, गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

त्यामुळे सामान्य माणसालाही तात्यांबद्दल आपुलकी वाटत आली आहे. लोकसभा, विधानसभेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकांत नेहमीच सक्रिय राहणार्‍या दिलीपतात्यांनी व्यापक जनसंपर्काच्या आधारावर अनेक अवघड जबाबदार्‍या स्वीकारून यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविल्या आहेत. सत्य, सरळ आणि निर्भिड बोलणे हा तात्यांचा स्वभाव आहे. कोणत्याही प्रश्नाकडे निर्लेप मनाने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. हेही त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल. एखादे काम हाती घेतल्यानंतर त्याच्या मुळाशी जाऊन बारकाईने अभ्यास करण्याचा त्यांचा पिंड आहे.

तात्यांना जीवनात अनेकवेळा प्रतिकूल परिस्थितीशी, संकटांशी सामना करावा लागला पण राजारामबापूंच्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या या कार्यकर्त्याने जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती कायम ठेवली. राजारामबापूंना ग्रामीण भागाच्या विकासाची प्रखर आस होती. त्यांचा हा विचार समोर ठेवून सार्वजनिक काम करण्याचा अनुभव असल्यामुळे साखर कारखान्याचे संचालक असूनही अडचणीतील सूतगिरणीच्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तात्यांनी समर्थपणाने पेलली. अध्यक्षपद हे मानाचं, शक्तीचं स्थान मानले जाते. दिलीप पाटील या साखर उद्योगातील ध्येयवादी आणि निष्ठावान नेत्याने या खुर्चीचा स्वीकार केला. खूप परिश्रम करून जिल्हा बँक नावारूपाला आणली.

आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली वाटचाल करीत महाराष्ट्रातील आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. दिलीपतात्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात दिमाखरदारपणे वाटचाल करणार्‍या इंद्रप्रस्थ पतसंस्थेने गरुडभरारी घेतली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज