rajkiyalive

vishwajit kadam congress : विश्वजीत कदमांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार

जनप्रवास । प्रतिनिधी
vishwajit kadam congress : विश्वजीत कदमांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार : लोकसभा निवडणुकीत अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून आणून आ. विश्वजीत कदम यांनी राज्यभर ‘सांगली पॅटर्न’चा डंका वाजवला. दिल्ली व मुंबईत आ. कदमांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. आता स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीचे नेते कडेगावमध्ये येणार आहेत. सुमारे दोन लाख कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यामुळे आ. विश्वजीत कदम यांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार आहे.

vishwajit kadam congress : विश्वजीत कदमांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार

लोकसभेच्या निवडणुका तीन महिन्यांपूर्वी पार पडल्या. सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाची असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व नेते खा. संजय राऊत यांनी सांगली लोकसभेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली होती. तर दुसरीकडे सांगली लोकसभेसाठी खा. विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याचा शब्द काँग्रेसचे युवा नेते, आ. विश्वजीत कदम यांनी दिला होता. पण शिवसेना (उबाठा) गटाने परस्पर उमेदवारी जाहीर करून अडचण निर्माण केली होती. तरी देखील आ. विश्वजीत कदम यांनी खा. पाटील यांना दिलेला शब्द पाळला. उमेदवारी मिळाली नसली तरी खा. विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरले. पडद्याआड सर्व सूत्रे आ. विश्वजीत कदम यांच्याकडे होती.

खा. संजय राऊत यांनी याबाबत आ. विश्वजीत कदमांवर अनेकवेळा निशाणा देखील साधला होता. तरी देखील आ. विश्वजीत कदम यांनी करेक्ट कार्यक्रम करत खा. विशाल पाटील यांना निवडून आणले. निवडून आल्यानंतर थेट दिल्लीदरबारी जाऊन खा. विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून टाकला. देशात व राज्यात काँग्रेसला देखील चांगले यश मिळाले, काँग्रेसचे 99 खासदार झाले होते. मात्र शतक पार करण्याची कामगिरी खा. विशाल पाटील यांच्या विजयाने आ. विश्वजीत कदम यांनी केली. त्यामुळे दिल्लीतील व राज्यातील नेत्यांची मर्जी आ. विश्वजीत कदम यांच्यावर बसली आहे. विधानसभेला देखील मोठी जबाबदारी त्यांना देण्यात येणार आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस युवा चेहरा नाही. कोल्हापुरचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व आ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाहिले जात आहे. बंटी पाटील यांच्याकडे राज्यात काही जबाबदार्‍या आहेत. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाहिले जाते. स्व. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे लोकार्पण व पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे नेते, संसदेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होते. खा. गांधी यांनी देखील तातडीने निमंत्रण स्वीकारले. पाच सप्टेंबरला ते कार्यक्रमाला उपस्थित देखील राहणार आहेत. त्यांच्याबरोबर अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिाकार्जुन खर्गे, महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार, राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मेळाव्याचे देखील आयोजन केले आहे. या मेळाव्याला सुमारे दोन लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी आ. विश्वजीत कदम सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. विधानभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाचे प्रयत्न असणार आहेत. त्याची सर्व जबाबदारी आ. विश्वजीत कदम यांच्यावर असणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस नव्हे तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षात आ. विश्वजीत कदमांचे वजन वाढणार आहे.

विधानसभेला येऊ शकते मोठी जबाबदारी….

विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी आ. विश्वजीत कदम प्रयत्न करणार आहेत. पक्ष देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ शकते, अशी शक्यता वरिष्ठ पातळीवर व्यक्त केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज