rajkiyalive

SANGLI JILHA : विद्यमान आमदारांना नाही सोपा मार्ग…

डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील, सुहास बाबर यांच्यापुढे पेच

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI JILHA : विद्यमान आमदारांना नाही सोपा मार्ग… : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या पंधरा दिवसांत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमंकाळ आणि खानापूर-आटपाडी या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांसमोर पक्षांतर्गत आणि विरोधकांकडून आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक विद्यमान आमदारांना सहज सोपी नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे हे आमदार कशा पद्धतीने मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

SANGLI JILHA : विद्यमान आमदारांना नाही सोपा मार्ग…

विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत स्पर्धा निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. महायुती सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. सांगली मतदारसंघात आ. सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नसल्याची भूमिका जाहीर केली. पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे स्पष्ट केले.

त्यांच्या निर्णयाने त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यामुळे आमदार गाडगीळ सक्रिय होवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार की तलवार म्यान करणार हे पहावे लागेल. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनीही भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गतवेळी झालेल्या पराभवाचे शल्य पुसून काढण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यांनीही काँग्रेसच्या तिकीटासाठी भक्कम दावेदारी सांगितली आहे. माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीत उडी मारली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या रिंगणातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्येही उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

मिरज मतदारसंघात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे भाजपकडून यांचेच तिकीट निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

मात्र त्यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे त्यांनी पालकमंत्री खाडे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी भाजपकडे दावेदारी सांगितली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे वनखंडे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मिरज मतदारसंघावर दावेदारी केली जात आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षानेही मिरजेची जागा सोडण्याची मागणी केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने ही मिरजेची जागा देण्याची मागणी केली आहे, यावरुन विद्यमान आमदार खाडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुमनताई पाटील यांचे वारसदार म्हणून रोहित पाटील यांचे नाव पुढे आले आहे.

यंदाची विधानसभा रोहित हेच निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेे. येथे भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवलेली नाही, मात्र लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते पुत्र प्रभाकर यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. खासदार विशाल पाटील यांनी मध्यंतरी अजितराव घोरपडे हेच तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार असतील असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे.

खानापूर-आटपाडी मतदारसंघ शिंदे गट शिवसेनेकडे आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे,

मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे. तेथून बाबर यांचे पुत्र सुहास यांनी विधानसभा लढणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजप नेते व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. महायुतीत बाबर, देशमुख आणि पाटील हे तिघे इच्छुक झाल्याने अडचण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून दावा केला जात आहे, मात्र ही जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचे चर्चा आहे. अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादीकडून लढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महायुतीत फूट पडणार असल्याचे स्पष्ट दिसते.

जत मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. विद्यमान आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनाच उमेदवारी अटळ आहे.

त्यांच्याकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. माजी आमदार विलासराव जगताप विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर तेथून इच्छुक आहेत. जगताप यांनी जतमध्ये बाहेरील उमेदवार चालणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपकडूनही तालुक्यातीलच उमेदवार दिला तर विद्यमान आमदार सावंत यांना जोरदार संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज