rajkiyalive

SANGLI POLITICAL NEWS : काँग्रेस इच्छुकांच्या होणार मुलाखती, सांगलीसाठी खा. प्रणिती शिंदेंची नियुक्ती

जनप्रवास । सांगली
SANGLI POLITICAL NEWS : काँग्रेस इच्छुकांच्या होणार मुलाखती, सांगलीसाठी खा. प्रणिती शिंदेंची नियुक्ती : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. दि. 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुलाखती होणार असून दहा ऑक्टोबरला खा. शिंदे पक्षश्रेष्ठीला गोपनीय अहवाल सादर करणार आहेत.

SANGLI POLITICAL NEWS : काँग्रेस इच्छुकांच्या होणार मुलाखती, सांगलीसाठी खा. प्रणिती शिंदेंची नियुक्ती

राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख येत्या दहा दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दि. 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने विविध पक्षाकडून आखणी केली जात आहे. काँग्रेसच्या राज्यस्तरीय पक्षश्रेष्ठींनीही, या निवडणुकीसाठी उमेदवार कसा निवडला जावा, यासाठी खास मास्टरप्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती एक ते आठ ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सांगली व सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोलापुरच्या खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे दिली आहे. सांगलीतून जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी, इस्लामपूर, शिराळा या आठ मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. यामध्ये तासगाव-कवठेमहांकाळ व खानापूर-आटपाडी मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघातून अकरा इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती आता खा. प्रणिती शिंदे यांच्याकडून घेण्यात येणार आहेत. मात्र अद्याप मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आली नाही.

दि. 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान या मुलाखती होणार आहेत. संबंधित इच्छूक उमेदवारांचा गोपनीय अहवाल खा. प्रणिती शिंदे या दि. 10 ऑक्टोबरला राज्य व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सोपवणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता हालचाली गतीमान झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात जोरदार चुरस आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विश्वजीत कदमांकडे नांदेड जिल्ह्याची जबाबदारी
सांगली जिल्ह्याचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती आ. कदम घेणार आहेत. खा.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज