महायुती, महाविकास आघाडीच्या याद्यांकडे लक्ष
जनप्रवास । सांगली
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल मंगळवारी वाजले असून सात रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे उमेदवार देखील जाहीर झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये मिरज व खानापूर-आटपाडीच्या जागेवरून तर महायुतीत शिराळा, इस्लामपूर व जतच्या जागेवरून ताणाताणी सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता इच्छूक उमेदवारांचे लक्ष जागा वाटप व पक्षाच्या उमेदवारी यादीकडे लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे. त्यानुसार रणधुमाळीला म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढच्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. अद्याप महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटप निश्चित झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. महाविकास आघाडीमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर व शिराळा हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अंतिम झाले आहेत. तर पलूस-कडेगाव, व जत काँग्रेसला मिळाला आहे. सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही.
खानापूर-आटपाडी मतदारसंघावर शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तर मिरज विधानसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षाने दावा सांगितला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाचा फैसला अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. महायुतीमध्ये मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, जत हे मतदारसंघ भाजपला मिळाले आहेत. तर खानापूर-आटपाडी शिंदे गटाला मिळाला आहे. राष्ट्रवादीला अद्याप कोणताही मतदारसंघ नाही. पण त्यांनी इस्लामपूर व शिराळा या तिन्ही मतदारसंघांची मागणी केली आहे. वास्तविक या ठिकाणी भाजपचे तुल्यबल उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप या जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघाच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुका या एकाच टप्प्यात होणार आहेत. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास मंगळवार दि. 22 रोजी सुरूवात होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटप हे येत्या दोन-तीन दिवसात होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्ष व उमेदवारांकडे कमी वेळ राहिला आहे.
जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांची स्थिती…
सांगली- महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपकडे आहे. या ठिकाणी आ. सुधीर गाडगीळ विद्यमान आमदार आहेत. पण त्यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. ते लढणार की थांबणार? याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील किंवा जयश्रीताई पाटील उमेदवार असतील.
मिरज- महायुतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे निश्चित आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना ( उबाठा) या तिन्ही पक्षाने जागा मागितल्याने यावर अद्याप निर्णय झाला नाही. मोहन वनखंडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेकडे लक्ष लागले आहे.
जत- महायुतीमध्ये या मतदारसंघात जोरदार टशन आहे. भाजपकडून विलासराव जगपात, आ. गोपीचंद पडळकर, तम्मणगोंडा रवी पाटील इच्छूक आहेत. राष्ट्रवादीने देखील या जागेची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला असून विद्यमान आ. विक्रमसिंह सावंत हे उमेदवार असतील.
तासगाव-कवठेमहांकाळ- महायुतीकडून भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे.
खानापूर-आटपाडी- महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (शिंदे गट) यांना मिळली असून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटप व उमेदवार अद्याप ठरला नाही. या ठिकाणी ठाकरे गट व शरद पवार गट जागेची मागणी करत आहेत. पण वैभव पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख हे शरद पवार पक्षाकडून लढण्यास इच्छूक आहेत.
पलूस-कडेगाव- महायुतीकडून भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम यांनी उमेदवारी निश्चित आहे.
इस्लामपूर- महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गौरव नायकवडी इच्छूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील जागेची मागणी करत आहे. त्यामुळे अद्याप हा निर्णय झालेला नाही. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे.
शिराळा- महायुतीकडून भाजपचे सम्राट महाडिक व सत्यजीत देशमुख इच्छूक आहेत. राष्ट्रवादीकडून देखील या जागेची मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



