अॅड. बाबासाहेब मुळीक यांची मुख्यंत्र्यांकडे मागणी
sangli news : सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा सुवर्णनगरी जिल्हा करा : महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांचे विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते. विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या सहा तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि त्यास सुवर्णनगरी हे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी केली.
sangli news : सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा सुवर्णनगरी जिल्हा करा
यावेळी बोलताना अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा समावेश होता. तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगांव ही संस्थाने होती. 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन जिल्हे निर्माण झाले.
21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे सांगली जिल्हा असे नामकरण करण्यात आले.
सातारा आणि सांगली जिल्हयांचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता, या जिल्ह्यांची पुर्नर्चना करणे गरजेची वाटते. सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा. या जिल्ह्याचे केंद्र विटा या ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाणी असावे.
पुढे बोलताना अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, सध्या विटा येथे खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अस्तित्वात आहे. वडूज येथे माण व खटाव तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय अस्तित्वात आहे. त्याचबरोबर विटा, कडेगाव व वडूज येथे उपविभागीय अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे या सहा तालुक्यांचा जिल्हा निर्मिती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत कोणतीही अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण न करता जिल्ह्याचे कामकाज सुरु करता येणे शक्य आहे.
संपूर्ण भारतासह नेपाळ, श्रीलंका या ठिकाणी कार्यरत असणारे गलाई व्यावसायिक हे खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या तालुक्यातील आहेत. ते अभिमानाने सांगतात, की आम्ही या तालुक्यातील आहोत. त्यांच्यामुळे या परिसराचा एक वेगळा नावलौकिक आहे. या सहा तालुक्यांचा जिल्हा निर्माण करून त्याचे जिल्हा केंद्र विटा करून या जिल्ह्यास सुवर्णनगरी नाव दिल्यास या गलाई व्यवसायिकांचा सन्मान होणार असल्याचे अॅड. मुळीक यांनी सांगितले

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



