sangli vishrambag news :विश्रामबाग बनतेय ‘लक्झरी सिटी’ : बिल्डरांकडून 850 कोटींची गुंतवणूक : महापुराचा धोका नाही, प्रशस्त रस्ते, शासकीय कार्यालये, नवीन होत असलेले मॉल यामुळे सांगली शहराचा विस्तार आता विश्रामबाग, विजयनगर, वारणाली व धामणी रस्त्यावर होत चालला आहे. शहरातील बिल्डरांनी या परिसरात 850 कोटींची गुंतवणूक करून वनबीएचके, टूबीएचके, लक्झरी फ्लॅट, बंगलो स्कीम तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या भागातील दर देखील टाऊन सिटीसारखे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ‘लक्झरी सिटी’ म्हणून विश्रामबागची ओळख निर्माण होत आहे.
sangli vishrambag news :विश्रामबाग बनतेय ‘लक्झरी सिटी’ : बिल्डरांकडून 850 कोटींची गुंतवणूक
सहा गल्ल्यांची ओळख असलेल्या सांगलीचा विस्तार आता खूप वाढला आहे. पूर्वीची नगरपालिका आता सांगली, मिरज व कुपवाड अशी महापालिका झाली आहे. या महापालिका क्षेत्रात विजयनगर, वान्लेसवाडीसारखी गावे देखील आली आहेत. त्यामुळे शहरांचा विस्तार आता झपाट्याने वाढत चालला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांगली शहर पूर्वेकडे म्हणजे विश्रामबाग, विजयनगर, वारणाली, वान्लेसवाडी व धामणी रस्त्याकडे विकसीत होत चालले आहे. याला कारण म्हणजे शहराला बसत असलेला महापुराचा विळखा हेच आहे. महापुराचा फटका सांगली शहराला मोठ्या प्रमाणात बसतो. कृष्णा नदीचे पाणी हरभटरोड, गणपती पेठ, कापडपेठ, मारूती रोड, स्टेशन चौक, झुलेलाल चौक आदीपर्यंत पसरतेे.
त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा फटका बसतो.
त्यामुळे अनेकांनी राहण्यासाठी विश्रामबाग, विजयनगर, वारणाली परिसराची निवड केली आहे. अनेकांनी नवे उद्योगधंदे मुख्य शहरापासून तीन किलामिटरच्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग परिसरात थाटले आहेत. उद्योगधंद्यामुळे स्थायिक होण्याचे प्रमाणदेखील या परिसरात वाढले आहे. या शिवाय जिल्हा प्रशासकीय कार्यालये विजयनगर परिसरात झाली. जिल्हा न्यायालयाचे संपूर्ण कामकाजदेखील या परिसरातून होऊ लागले आहे. भारती हॉस्पिटलसारखे मोठे हॉस्पिटल देखील याच परिसरात आहे. भविष्यात महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. अनेक उद्योगधंदे देखील या परिसरात वाढत आहेत. विश्रामबागच्या मुख्य रस्त्यावर सराफांची तीन मोठे व्यवसाय सुरू आहेत.
sangli-vishrambag-news-vishrambag-is-becoming-a-luxury-city-850-crore-investment-by-builders
विश्रामबाग येथील गणपती मंदिराजवळ आता बाजारपेठ वसू लागली आहे. त्यामुळे सांगली शहरातील मार्केट कमी होत चालले आहे.
या परिस्थिीत ग्राहकांकडून आता सांगली शहराऐवजी विश्रामबाग, विजयनगर, वारणाली या परिसरात फ्लॅटची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील बिल्डरांकडून देखील या भागातील जागांचा शोध घेऊन मोठा प्रकल्प उभारणीवर भर दिला आहे. विश्रामबाग गर्व्हमेंट कॉलनीसह परिसरात सहाशेहून अधिक फ्लॅट आहेत, तर धामणी रस्ता परिसरात आठशे, वारणाली, कुपवाड परिसरात सातशेहून अधिक फ्लॅट आहेत. या संपूर्ण परिसरात सुमारे अडीच हजार फ्लॅटचे काम सुरू आहे. काही प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत. त्याचे वितरण देखील सुरू आहे. सात, पाच मजली टोलेजंग इमारती या परिसरात उभ्या राहत आहेत.
विश्रामबाग परिसर ते धामणी रस्त्यावर मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये ग्राहकांना वन बीएचके, टूबीएचके, लक्झरी फ्लॅट मिळणार आहेत.
अनेक बिल्डरांनी बंगलो प्रकल्प राबविले आहेत. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी बिल्डरांच्या प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बिल्डरांनी सुमारे 850 कोटींची गुंतवणूक या परिसरात केली आहे. अनेक कापोरेट ऑफीसेस, कंपन्यांची कार्यालये, हॉटेल, मोठे मॉल देखील याच परिसरात आहेत. या परिसरात फ्लॅटचे बुकिंग करून गुंतवणूक केली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. भविष्यात या परिसरात मार्केट वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. बिल्डरदेखील मोठ्या प्रमाणात या परिसरात प्रकल्प उभे करत आहेत.
विश्रामबागकडे नागरिकांची गर्दी: दीपक सूर्यवंशी
सांगली शहराचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे. हा विस्तार विश्रामबाग, धामणी रस्ता, वारणाली परिसरात जास्त आहे. अनेक ग्राहकांकडून या परिसरात फ्लॅट, बंगलो, कंपन्यांसाठी कार्यालयाची मागणी होऊ लागली आहे. या परिसर सुरक्षित आहे. शिवाय खोकी, झोपडपट्ट्यांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे नागरिक या परिसराला पंसती देतात. बिल्डरांनी देखील या परिसरात मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. साधारणपणे तीन हजार ते साडेपाच हजारापर्यंतचे दर या परिसरात आहे. मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यातील पन्नास टक्के फ्लॅटचे बुकिंग होत असल्याची माहिती क्रेडाईचे माजी उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



