jain samaj news : शिवाजी विद्यापीठात भ.महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमीपूजन : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
jain samaj news : शिवाजी विद्यापीठात भ.महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमीपूजन
शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. भूमीपूजनानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री आबिटकर यांच्या हस्ते कुदळ मारुन तसेच कोनशिलेचे अनावरण करून भूमीपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी त्यांना यावेळी इमारतीच्या कामाविषयी तसेच अध्यासनाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, एरव्ही शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो. तथापि, विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी आज प्रथमच अनेक दात्यांच्या हातून देणगीनिधी स्वीकारण्याची दुर्मिळ संधीही लाभली.
आपल्या कष्टाची मिळकत आपण अध्यानासाठी देत आहात, ही उल्लेखनीय बाब आहे. दातृत्वातून मिळणारा आनंद मोठा असतो. शिवाजी विद्यापीठाने समाजाशी नाते जोडल्याने या अध्यासनाच्या कामाची उंची वाढली आहे. हे कोल्हापुरातच होऊ शकते. विद्यापीठाने आपल्या विविध अध्यासनांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे भरीव कार्य केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचे एक भूषणच ठरले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मूल्यशिक्षणावर भर आहे. भगवान महावीर यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान हे मानवी मूल्यशिक्षणच आहे. अपरिग्रह, अहिंसा आणि ब्रह्मचर्य या जैन तत्त्वज्ञानावर आधारित असणारे भगवान महावीर अध्यासन हीच भूमिका घेऊन वाटचाल करीत आहे. अध्यासनाची इमारत आणि परिसर हा जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असेल, याची दक्षता वास्तुरचनेपासूनच घेण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. विलास संगवे, अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी या अध्यासनाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी केले. संजय शेटे यांनी अध्यासनासाठी शासनाने जाहीर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी मंत्री आबिटकर यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. डी.ए. पाटील यांनी अध्यासनाची भूमिका स्पष्ट केली. शुभम पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
याप्रसंगी उपस्थित असणार्या मान्यवरांनी अध्यासनाला उत्स्फूर्तपणे देणगी जाहीर केल्या. त्यामध्ये रावसाहेब देशपांडे- आणेगिरीकर, सुरेश रोटे, प्रफुल्ल भालचंद्र चमकले, अॅड. महावीर बिंदगे, जयसिंगपूरचे प्रा. आण्णासो इसराणा, उद्योजक नेमचंद संगवी यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. जैन सेवा संघाचे डॉ. मिठारी आणि त्यांच्या सहकार्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांची तर कुंतीनाथ हानगंडे आणि अनिल ढेकणे यांनी 51 हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
jain-samaj-news-groundbreaking-ceremony-of-the-mahavira-adhyasana-building-at-shivaji-university
कार्यक्रमास पूर्वीचे देणगीदार डॉ. बी.डी. खणे, डॉ. एन. एम. पाटील, जीवंधर चौगुले, वसंत नाडे, अरुण माणगावे, अरुणाताई पाटील आदी उपस्थित होते. प्रकल्पपूर्तीसाठी मदत करणारे राजोबा आणि त्यांचे सहकारी, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, विजय पोवार आणि त्यांचे सर्व सहकारी, डॉ. गिरीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीमती जोशी व श्रीमती कुंभार यांच्यासह जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक कोटी 11 लाखांचा निधी जमा
भगवान महावीर अध्यासन हे लोकवर्गणीतून उभे करण्याचे शिवाजी विद्यापीठाने ठरवले आणि त्यानुसार लोकवर्गणीसाठी आवाहन करण्यात आले. त्यामधून सुमारे 1 कोटी 11 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामधूनच पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी 84 लाख 5 हजार 401 रुपये इतका खर्च प्रस्तावित असून 12 महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. सांगलीचे प्रमोद चौगले हे या कामाचे वास्तुविशारद आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.