jayant patil news : गाताडवाडी निचरा प्रणाली प्रकल्प जमिनी सुधारणेमधील महत्वाचा टप्पा ठरेल : जयंत पाटील: जमिनीची सुपिकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्यांनी पुढे यायला हवे,अशी अपेक्षा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी गाताडवाडी येथील समारंभात बोलताना व्यक्त केली. भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्प क्षारपड जमिनी सुधारणेमधील महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
jayant patil news : गाताडवाडी निचरा प्रणाली प्रकल्प जमिनी सुधारणेमधील महत्वाचा टप्पा ठरेल : जयंत पाटील
गाताडवाडी येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,राजारामबापू सह. बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,माजी उपसभापती नेताजीराव पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,भैरव नाथ संस्थेचे अध्यक्ष रमेश खोत,उपाध्यक्ष मधुकर खोत,सचिव सचिन खोत प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आपण सरकारमध्ये असताना क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी शासनाच्या वतीने आपल्या काही गावामध्ये 80-20 ची योजना आणली होती. यामध्ये शासनाने 80 टक्के,तर लाभार्थी शेतकर्यांनी 20 टक्के रक्कम घालायची होती. मात्र 20 टक्के रक्कम गोळा होऊ शकली नाही. राज्य शासनाने 100 टक्के अनुदानावर क्षारपड जमिनी सुधारणा कार्यक्रम हाती घ्यावा,असे पत्र मी सरकारला दिले आहे. मात्र यामध्ये काही काळ जाऊ शकतो.
त्यामुळे शेतकर्यां नी स्वतःच्या हिंमतीवर क्षारपड जमिनी सुधारणा करण्यासाठी पुढे यायला हवे. भैरव नाथ या छोट्या संस्थेने संस्था उभारणीच्या कर्जाची परतफेड करून हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प क्षारपड जमिनी सुधारणेमध्ये दिशादर्शक ठरेल. भविष्यात या परिसरातील ऊसाचे सरासरी उत्पादनात वाढ होऊन या परिसराच्या प्रगती स मोठी चालना मिळू शकते. आता आपणास कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी उपयोग करून घ्यावा लागेल. त्यासाठी प्रतिक पाटील व कारखाना प्रयत्न करीत आहे. यामध्ये शेतकर्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,काही वर्षांपूर्वी आपल्या शेतीस पाणी नाही,हा एक प्रश्न होता. मात्र सध्या शेतातील पाणी बाहेर कसे काढायचे? हा गंभीर प्रश्न बनला आहे. आम्ही गेल्या वर्षापासून राजारामबापू सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना राबवित आहोत. शेतकर्यांनी रुपये 10 हजार भरल्यास,त्यांना रुपये 70 हजाराचे कर्ज उपलब्ध करून देत आहोत. या रक्कमेची परतफेड निश्चितपणे वाढीव उत्पादनातून होऊ शकते. आम्ही शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल,याची अद्यावत माहिती देणारी शेतकरी मार्गदर्शक पुस्तिका दिली आहे.
पी.आर.पाटील म्हणाले,भैरवनाथ संस्था उभी राहणे,ती कर्जमुक्त होणे,या संस्थेला शासनाचे अनुदान मिळणे याचे सारे श्रेय आ.जयंतराव पाटील यांचे आहे. आम्ही साखर संघाच्या वतीने राज्यातील शेतकर्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
अध्यक्ष रमेश खोत म्हणाले,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था उभा राहिली आणि आज कर्जमुक्तही होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने आम्ही तालुक्यातील पहिला प्रकल्प आज हाती घेतला आहे,तो निश्चित यशस्वी करू. आ. जयंतराव पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाचे 63 लाखाचे अनुदान आम्हास मिळाले आहे.
कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील यांनी समृध्द भूमी अभियान व सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीबद्दल शेतकर्यांना सविस्तर माहिती दिली. ऍस्ट्रल कंपनीचे मल्हारी पाटोळे यांनीही शेतकर्यांशी संवाद साधला.
यावेळी आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी उन्नीगोरीला अशोक यांच्याकडे 50 लाख रुपयांचा शासन अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,पाटकरी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजारामबापू बँकेचे संचालक संजय पाटील, डॉ.प्रकाश पाटील,माजी सभापती वैभव पाटील,सुस्मिता जाधव, संग्राम जाधव, कारखान्याचे संचालक राजकुमार कांबळे,रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,विठ्ठल पाटील, प्रताप पाटील,शैलेश पाटील,अमरसिंह साळुंखे,डॉ.योजना शिंदे- पाटील,हणमंत माळी,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,डी.एम.पाटील,मनोहर सन्मुख,सरपंच आनंदी खोत,शिवाजीराव कदम,किर्तीवर्धन मरजे,बजरंग खोत यांच्या सह गाताडवाडी व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सचिव सचिन खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुहास खोत यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.