sangli ncp news : राष्ट्रवादी एकीकरण झाल्यास फुटीर माजी आमदारांची गोची : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे व आ. जयंत पाटील यांनी याबाबतचा निर्णय घेतल्यास सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडी बदलणार आहेत. जिल्ह्यात आ. जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीची सूत्रे येतील. त्यामुळे आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारांबरोबर माजी नगरसेवकांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे.
sangli ncp news : राष्ट्रवादी एकीकरण झाल्यास फुटीर माजी आमदारांची गोची
जयंत पाटलांकडे पुन्हा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सूत्रे?
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित येऊन 2019 ला महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची व शिवसेनेची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली आणि थेट मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर सत्तेत सामील व्हावे, अशी अपेक्षा विरोधी पक्षात असताना व्यक्त केली होती. मात्र खा. शरद पवार यांनी विरोधी पक्षात राहणे पसंत केले होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी भूकंप घडवत राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले.
त्यानंतर शरद पवार व अजित पवार यांचा लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकीत संघर्ष कायम राहिला.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व चिन्ह मिळाले. तर शरद पवार यांना नवीन पक्ष व नवीन चिन्ह घ्यावे लागले. पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीचे एकीकरण करावे, या मागणीला जोर धरला आहे. या संदर्भात शरद पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी एकीकरण करण्याचा अधिकार खा. सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत देखील दिले जात आहेत. तसे झाल्यास सांगली जिल्ह्यातील राजकारणावर देखील परिणाम होणार आहे.
महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे वर्चस्व होते.
शेवटच्या अडीच वर्षांसाठी त्यांच्या पक्षाचा महापौर देखील झाला होता. मात्र नंतरच्या काळात पक्षात संघर्ष तीव्र झाल्याने माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, अतहर नायकवडी यांच्यासह सांगली व मिरज शहरातील अनेक नगरसेवकांनी आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापाठोपाठ अनेक माजी नगरसेवक व पदाधिकार्यांनी देखील आ. जयंत पाटील यांची साथ सोडली. त्यामुळे महापालिका क्षेत्रात त्यांना धक्का बसला होता.
तर दुसरीकडे गेल्या महिन्यातच जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे. या माजी आमदारांना सत्तेत डोहाळे लागले होते. भाजपबरोबर त्यांचा बिनसले होते. त्यामुळे या माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात होते. तर माजी आमदार विलासराव जगपात यांना भाजपमधून निलंबित केले होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. वास्तविक या नेत्यांचे आ. जयंत पाटील यांच्याबरोबर देखील पटत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
sangli-ncp-news-if-nationalist-unification-happens-the-former-mlas-will-be-divided
राष्ट्रवादीचे एकीकरण झाल्यास सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे आ. जयंत पाटील यांच्या हातात येण्याची शक्यता आहे.
अनेक माजी नगरसेवकांनी अडचणीच्या काळात आ. जयंत पाटील यांची साथ सोडली होती. तर माजी आमदारांचे देखील तेच आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीची सूत्रे आली तर या फुटीरांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा आ. जयंत पाटील यांचेच नेतृत्व मान्य करावे लागणार आहे. तर दुसरीकडे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत आ. जयंत पाटील अंतर्गत डाव या फुटीवरांवर टाकतील, अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकीकरणावर काय निर्णय होणार? याकडे दोन्ही पक्षाचे लक्ष लागले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.