rajkiyalive

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली

येणार्‍या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. जो तो पक्ष आपआपल्या तयारीला लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलाच पक्ष येणार असे प्रत्येक पक्षाला वाटत असले तरी भाजपने मात्र देशात आणि राज्यात वेगळाच अजेंडा राबवत आहेत. प्रादे शिक पक्षाचे  निर्मुलन करून देशात केवळ भाजप हाच एकमेव पक्ष ठेवायचे असा जणू निर्धारच त्यांनी केला आहे.

देशात एकेकाळी काँग्रेसचे राज्य होते.

देशात एकेकाळी काँग्रेस चे राज्य होते. सुमारे साडेचारशे खासदार निवडून आणण्याचा विक्रम काँग्रेसने केला होता. तो विक्रम अजून तसाच असला तरी तो विक्रम आम्ही  एक  दिवस मोडू असा चंग मोदी आणि शहांनी बांधला आहे. राज्यातील सर्वच पक्षांना आपल्या सोबत घेण्याचा जणू सपाटाच त्यांनी लावला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकार ते अवलंबीत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, सत्तेसाठी भाजपचे निमंत्रण यायच्या अगोदर त्यांच्या पक्तींला कोण अगोदर जाणार याची स्पर्धा लागली आहे.

शिवसेना भाजप या युतीमध्ये अनेक लहानसहान पक्षांचा समावेश होता.

1995 मध्ये भाजपने राज्यात शिवसेना बरोबर युती करून पहिल्यांदा सत्ता भोगली. स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व. प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने ही युती तयार झाली होती. शिवसेना थोरला आणि भाजप धाकटा भाउ असेच सर्वत्र चर्चा असायची. शिवसेना भाजप या युतीमध्ये अनेक लहानसहान पक्षांचा समावेश होता. पुढे जावून आरपीआय आठवले गट, महादेव जानकर यांचा पक्ष, सदाभाउ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा मराठा संघ असे अनेक लहान मोठे पक्ष भाजपच्या दावणी गेले आणि सत्तेत सामिल झाले. भाजपने या सर्वांचा शिडीसारखा उपयोग केला आणि पध्दतशीरपणे सर्वच पक्षाला संपवून टाकले.

हेही वाचा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

शिवसेनेचे पानिपत

सर्वच लहान मोठ्या पक्षाचे उपयुक्त मूल्य त्यांनी घेतले आणि उपद्रव्य मूल्य कमी करून टाकले. सुरूवातीला या लहान पक्षांना त्यांची किंमत दाखवून दिल्यानंतर भाजपने मोठा बॉम्ब टाकला तो आपल्या सहकारी पक्ष असलेलेल्या शिवसेनेवर. जोपयंर्ंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तो पर्यंत शिवसेनेकडे वाकड्या नजरेने कोणेही पाहू शकत नव्हते. भाजपही त्यांना बिलगूनच होता. परंतु त्यांच्या पश्चात भाजपने आपले रूप दाखवायला सुरूवात केली. त्यांनी अखंड शिवसेना पक्षच खावून टाकला. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने नवा गडी भाजपला मिळाला.

शिवसेनेचा एक प्रकारचा धाक भाजपला होता.

शिवसेनेचा एक प्रकारचा धाक भाजपला होता. परंतु आता तो धाक उरला नाही. आता आपले अस्तित्व कसे टिकवायचे हाच प्रश्न शिवसेना उध्दव ठाकरे गटाला पडला आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची डरकाळी घुमत होती. पण आता शिवसेनेचा वाघ झोपी गेला आहे. दुसरीकडे भाजपबरोबर गेलेल्या एकनाथ शिंदेंची अवस्थाही काही वेगळी नाही. सध्या ते मुख्यमंत्री असले तरी राज्याचा मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी बदलू शकतो हे भाजपने दाखवून दिले आहे. भाजपबरोबर जावून एकनाथ शिंदेंनाही अस्त्विासाठी भविष्यात फार मोठा सामना करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीत भूकंप

शिवसेना पाठोपाठ भाजपने राष्ट्रवादीवर घाला घातला. शरद पवारांना बाजूला टाकून भाजपने अजित पवार यांच्यावर डाव टाकला आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे सत्तेत आहेत. काँगे्रस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट विरोधी पक्षात आहेत. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षावर गंडातर आल्याने आता काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष राहिला आहे. कारण शरद पवारांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. शरद पवारांनी आपला पक्ष फुटलाच नाही, असे जाहीर केले असले तरी मग राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत कसा असाच प्रश्न पडतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षावर वार करूनही अजून भाजपची भूक भागली नाही. शत प्रतिशत भाजप असाच नारा त्यांचा अजूनही आहे.

लहान पक्षांची गरज संपली

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष भाजपच्या दावणीला गेल्याने लहान पक्षांचे काय असा प्रश्न आहे. सदाभाउंची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, आरपीआय आठवले गट हे एकेकाळी भाजपच्या खास मर्जीतले होते. त्यांना सत्तेत सामावून घेउन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न झाला होता कारण त्यावेळी भाजपला लहान लहान पक्षांची गरज होती. परंतु आता ही गरज संपली आहे. सत्तेत सहभागी होवून या पक्षांनी आपले उपद्रव्य मूल्य गमावून बसले आहेत. त्यांची भिती आता कोणालाच उरली नाही. मोठ्या पक्षांवर दरोडा पडत असताना लहान पक्षांना विचारतो कोण अशी अवस्था त्यांची सध्या झाली आहे.

आरपीआप म्हणजे केवळ रामदास आठवले

देशात आणि राज्यात एकेकाळी आरपीआयचा मोठा दबदबा होता. आरपीआपला सोबत घेतल्याशिवाय कोणीही राजकारण करून शकत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला हवे, असे म्हटले होते. त्यांचा दराराही मोठा होता. परंतु आरपीआयची शकले झाली आणि प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला झाली. सध्या रामदास आठवले यांचा आरपीआय भाजपसोबत आहे. आरपआयची अवस्थाही सध्या सत्तेसाठी मवाळ झाली आहे. रामदास आठवले यांनाही लोकसभेसाठी जागा मिळणे अवघड झाले आहे.

स्वाभिमानीही फोडण्याचा प्रयत्न

सध्या पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्ींचा स्वाभिमानी पक्ष तग धरून असला तरी त्यांना त्यांच्या खासदारकीची चिंता लागली आहे. सध्याच्या घडीला स्वाभिमानीचा कोणीही आमदार अथवा खासदार नाही. आमदार असलेल्या देवेंद्र भुयार यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी केली आहे. स्वाभिमानीचे मुलुख मैदान म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांच्यावरही भाजपने गळ टाकला आहे. सध्या तुपकरांनी मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, संघटनेत राहूनच काम करणार असे जाहीर केले असले तरी येणार्‍या निवडणुकीपर्यंत त्यांच्या भूमिकेत बदल होवू शकतो, अशी शक्यता आहे.

भाजपचे लक्ष्य लोकसभा

सध्या भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे ते लोकसभा निवडणुकांवर. कारण येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करून पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची त्यांना बरोबरी करायची आहे. देशात उत्तर प्रदेशनंतर जास्त खासदार निवडून जातात ते महाराष्ट्रातून. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहे. किमान 45 जागा निवडणूक आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी चार, काँग्रेस शून्य असे बलाबल आहे. अजित पवारांना साथीला घेवून भाजपने मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसला खातेही उघडू द्यायचे नाही आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांना सोबत घेवून 45 जागा जिंकायच्या असा प्रयत्न भाजपचा आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे.

निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद काढून घ्यायची शक्यता

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता आहे. लोकसभेला मैदान मारल्यानंतर भाजपला या सर्व घटक पक्षांची गरज लागणार नाही. कारण आता या सर्वच घटक पक्षांचा विरोध मावळला आहे. भाजपच्या विरोधात सध्या केवळ काँग्रेसच प्रचार करीत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा ढालीसारखा उपयोग होवू शकतो. एकदा का लोकसभा झाल्यानंतर भाजप पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्या 105 आमदार आहेत. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे नेमके किती आमदार आहेत हे सांगता येत नाही. 105 आमदार असलेला पक्ष फार दिवस मुख्यमंत्रीपदापासून दूर राहू शकत नाही. लोकसभेचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर भाजप आपले खरे रूप दाखवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार हे निश्चित.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज