rajkiyalive

खानापूर विधानसभेसाठी नेत्यांमध्ये संभ्रम अन् कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ….

 प्रताप मेटकरी,  जनप्रवास

खानापूर विधानसभेसाठी घोडा मैदान दूर असतानाच अनेक नेतेमंडळी आखाड्यात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परंतु उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणारे नेते कसे आणि कोणाकडून लढणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र मतदार चांगलेच भांबावून गेले आहेत.

खानापूर विधानसभा मतदार संघात 2024 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार अनिल बाबर हे महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. आमदार बाबर हे महायुतीचे उमेदवार असताना त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीतरी लढत देईल, असे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीकडून निवडणुकीत उतरण्यासाठी चेहराच समोर येत नाही. त्याचवेळी बाबर यांना मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून तगडे आव्हान दिले जात आहे. महायुतीतच तीन – तीन उमेदवार होत असताना या निवडणुका होणार तरी कशा. कोण कसे लढणार? याचा गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा

वैभव पाटलांच्या पाठीशी माझी सर्व ताकद उभी करणार

ॲड. वैभव पाटील यांचा अजितदादा गटात प्रवेश

आटपाडी खानापूरचा पेच कसा सुटणार?

गोपीचंद पडळकर खानापूरमधून लढणार

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या मित्र पक्षाचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याविरूध्द दंड थोपटले आहे. विशेष: म्हणजे या मतदार संघातील मोठी ताकद असणारे भाजपचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी गोपीचंद पडळकर यांना उघड पाठिंबा दिला आहे. आता याही घडामोडीत मोठा राजकीय ट्विस्ट आहे. कारण मागील काही महिन्यापूर्वी देशमुख गटाच्या झालेल्या मेळाव्यात देशमुख गटाचे राजकीय निर्णय हे अमरसिंह देशमुख घेतील, असे दस्तुरखुद्द राजेंद्रआण्णा देशमुख यांनी जाहीर केले होते.

राजेंद्रआण्णांनी राजकीय निर्णय जाहीर घेण्याची भूमिका ज्यांच्यावर सोपविलेली होती ते अमरसिंह देशमुख हे गेल्या काही दिवसापासून आमदार अनिल बाबर यांच्यासोबत उठबस करताना दिसत असताना राजेंद्रआण्णांनी इकडे आमदार पडळकर यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा देवून कार्यकर्त्यांच्यात संभ्रम ठेवला आहे.

गोपीचंद पडळकर हे खरोखरच विधानसभेची निवडणूक लढणार असतील तर मग महायुतीत फाटाफूट होणार आहे का ? मित्रपक्षाला जागा असताना भाजपचे नेते तेही विधानपरिषदेचे आमदार म्हणून कार्यरत असताना विधानसभा लढविण्याची घोषणा करत असतील तर नक्कीच राजकारणात वरिष्ठ पातळीवरून मोठी घडामोड घडत असावी, असा संशय निर्माण होत आहे. पडळकर यांच्या या बंडाला भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त असावा, असेही राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

एका बाजूला शिंदे फडणवीस हे एकजीव असल्याचे दाखवत असतानाच फडणवीसांच्याच गळ्यातील ताईत बनलेल्या पडळकरांनी शिंदेच्या जेष्ठ आमदारांना उघड आव्हान देणे हे तसे संभ्रम निर्माण करणारे आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना हे दोन पक्ष एकमेंकात लढत असताना आता तिसरा मित्र पक्ष म्हणजेच अजितदादांचा राष्ट्रवादी गट ही या लढाईत उतरला आहे. अजितदादांच्या पक्षाची संपूर्ण सांगली जिल्ह्याची धुरा ज्यांच्यावर आहे. ते विट्याचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील हेही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधून आहेत.

पुढे काय व्हायचं ते होईल. सध्या तुम्ही कामाला लागा, तयारीला लागा, असा आदेश वैभव पाटील यांना दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे उमेदवार गृहित असताना पडळकरांपाठोपाठ अ‍ॅड. वैभव पाटील यांनीही दंड थोपटणे हे संभ्रमित करणारे आहे.

ते कुणाकडून लढणार ? ते कसे लढणार ? त्यांना कुणाचे पाठबळ असणार ? हे सर्व गुलदस्त्यात असताना 2024 ची विधानसभा निवडणूक अ‍ॅड. वैभव पाटील लढणार एवढेच त्यांचे समर्थक छातीठोक सांगत आहेत. अर्थात या निकराच्या लढाईत ज्यांनी वल्गना केल्या आहेत. त्यांनी ऐनवेळी रिंगणातून पळ काढून किंवा वरिष्ठांचा आदेश आला असे सोयीस्कर कारण देवून माघार घेतली तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाला घरघर लागू शकते. त्यामुळे अभि नही तो कभी नही या इर्षेने महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. मतदार व कार्यकर्ते मात्र पुरते गोंधळून गेले आहेत.

अर्थात ज्यांनी महायुतीला टक्कर द्यायची त्या महाविकास आघाडीकडून कसलीच हालचाल नाही. उलट काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनंतर त्यांच्याच पक्षाचे नेत्यांनी महायुतीच्याच नेत्यांबरोबर पुन्हा एकदा उठबस सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांना राजकीय भवितव्य राहील, असे वाटत नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज