rajkiyalive

मनपाकडून पाणीपुरवठ्याचा विषप्रयोग

सांगली : माळबंगला येथील 70 एमएलडी जलशुद्धीकरणाच्या कारभाराची पाहणी करताना नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, गजानन साळुंखे, प्रदीप कांबळे, रोहीत कबाडे आदी. दुसर्‍या छायाचित्रात 70 एमएलडी प्रकल्पातील गंजलेली यंत्रणा.
नागरीक जागृती मंचकडून पोस्टमार्टेम : टीडीएस तब्बल 313; पाणी पिण्यास अयोग्य : जलशुध्दीकरण केंद्राचा बोगस कारभार

जनप्रवास : सांगली 

 कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मनपाच्या अत्याधुनिक जलशुद्धिकरण केंद्राच्या बोगस कारभारामुळे नागरिकांवर पाणीपुरवठ्याच्या नावे विषप्रयोग सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले. नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ढिसाळ व कुचकामी यंत्रणेचे शनिवारी पोस्टमार्टेम केले. यातील 56 एमएलडी प्रकल्प कालबाह्य झाल्याचे तर 70 एमएलडी जलशुद्धिकरणाची प्रक्रियाच दोषयुक्त असल्याचा आरोप साखळकर यांनी केला. शुद्ध करून नागरिकां ना जे पाणी पाजले जाते त्याचा टीडीएस तब्बल 312 असून, तो आरोग्यास घातक असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. हा कारभार प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी सुधारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात साखळकर म्हणाले, कृष्णा नदी उशाला आणि कोरड घशाला अशी शहराची अवस्था आहे. सांगली, कुपवाडला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासा ठी माळबंगला येथे 70 एमएलडी नवीन जलशुद्धिकरण उभारण्यात आला. तसेच जुन्या 36 एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्पाचे क्षमता वाढवून अत्याधुनिक 56 एमएलडी प्रकल्प करण्यात आला. या दोन्हीतून मिळून 126 एमएलडी प्रकल्प उभारला आहे.

त्यासाठी सुमारे दीडशे

कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. त्याच्या देखभाल आणि नियमित प्रकल्प चालविण्यावरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु दोन्ही प्रकल्प कधीच पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. दुसरीकडे त्याकडे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी कधी लक्ष दिले नाही. त्यामुळे सर्व अनागोंदी कारभार सुरू असून, शुद्धिकरणाचा फार्सच पार पाडला जात आहे. यामुळे सांगली, कुपवाडला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होतच नाही. जो होतो तो दूषित आहे.

ते म्हणाले, एकूणच या कारभाराचा पंचनामा करण्यासााठी आम्ही माळ बंगला येथील 70 एमएलडी व 56 एमएलडी जल शुध्दीकरण प्रकल्पाची पाहणी केली. ते म्हणाले, यावेळी आम्हाला मिळालेली माहितीनुसार 70 एमएलडी प्रकल्पातून दररोज साधारणतः 50 ते 52 एमएलडी पाणी शुध्दीकरण केले जाते. या प्रकल्पामध्ये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि महानगरपालिका यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार केमिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनअर तसेच अन्य कुशल आणि अकुशल कामगार यांची कमतरता आहे. एकाच केमिकल इंजिनिअरवर सर्व कारभार असल्याचे आहे. तसेच त्याठिकाणी गरजेचे तज्ज्ञ कर्मचारी, इंजिनियर नाहीत त्याऐवजी अकुशल कर्मचार्‍यांची खोगीरभरती असल्याचे दिसून आले.

हेही वाचा

सलगरे लॉजिस्टिक पार्कचा ‘पोपट मेला’

दहा वर्षांत जिल्ह्यात नवीन काय?

विकासाचे पूल ठरत आहेत महापुराला कारणीभूत

साखळकर म्हणाले, तेथील पाण्याचा टीडीएस, पीएच, हार्डनेस तपासला. यामध्ये 70 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प थोडाफार व्यवस्थित असल्याचे दिसून आले. परंतु शुद्धिकरण प्रकल्पाचा फार्सच ठरून टीडीएस 312 असल्याचे आढळून आले. म्हणजे हे पाणी पिण्यास अयोग्यच असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान आम्ही 56 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट दिली. यामध्ये 56 एमएलडी प्रकल्पातून दररोज सरासरी फक्त 25 एमएलडी पाणी शुध्दीकरण केले जाते.

हा प्रकल्प ही पुर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून येथील पाणी फिल्टर बेडमधील वाळूच बदलेली नाही. तसेच हा 56 एमएलडी प्रकल्पामध्ये कोणताही जबाबदार अधिकारी याठिकाणी उपलब्ध नव्हता. या ठिकाणची सर्व व्यवस्था ही आधुनिक पद्धतीने न करता माणसाकडून हाताळली जाते. यामध्ये कोणतेही आधुनिकीकरण झालेले नाही. येथे सन नोव्हेबर 2006 पासून पाणीपुरवठा विभागात केमिकल इंजिनियर याची नियुक्ती झालेली नाही.

तसेच धोकादायक असलेल्या क्लोरिनच्या टाक्या या धोकादायकपणे असुरक्षितपणे उघड्यावर ठेवल्याचे दिसून येते. यामध्ये जर काही दुर्घटना घडली त्यास जबाबदार? ते म्हणाले, 70 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पामधून सांगलीवाडी, आकाशवाणी, हिराबाग, विश्रामबाग, जलभवन, कापसे प्लॉट आणि कुपवाडमधील 10 टाक्यांना बर्‍यापैकी शुद्ध पाणी नागरिकांना मिळते. परंतु 56 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पामधून माळ बंगला, वाल्मिकी, चौकोनी टाकी, आरटीओ ऑफिस, यशवंतनगर, जयहिंद कॉलनी, वसंत कॉलनी, अभयनगर या भागास अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो.

महापालिका प्रशासन नागरिकांच्या बाबतीत असा दुजाभाव का करतात? एकूणच सांगली व कुपवाडमध्ये कोट्यवधी रुपये खर्चूनही दूषित आणि पिण्यास अयोग्य पाण्याचा नागरिकांवर विकतचा विषप्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या कारभाराकडे आता प्रशासक सुनिल पवार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात. अन्यथा जनआंदोलन उभारू. यावेळी गजानन साळुंखे, आनंद देसाई, प्रदीप कांबळे, रोहित कबाडे उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज