rajkiyalive

स्वाभिमानीची जनआक्रोश पदयात्रा स्थगित

राजू शेट्टी  मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा ः साखर कारखान्यास जाणारा ऊस गनिमी काव्याने रोखू

 

जनप्रवास, इस्लामपूर

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित केल्याची घोषणा माजी खा.राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. परंतू गतवर्षीचे 400 रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरु होवू देणार नाही. साखर कारखान्यास जाणारा ऊस गनिमी काव्याने रोखू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

माजी खा.राजू शेट्टी म्हणाले, गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये प्रतिटन मिळावेत. कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करावे या मागणीसाठी 17 ऑक्टोबरपासून जनआक्रोश यात्रा सुरु केली होती. स्वाभिमानीच्या जनआक्रोस पदयात्रेस सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फुलांची उधळण करत स्वागत आहे. परंतू आमचे सहकारी मनोज पाटील उपोषणाला बसले आहेत. अशा परिस्थितीत स्वागत स्विकारणे माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पटणारे नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील करमाळे येथे 300 किमीनंतर पदयात्रा स्थगित केली आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनाशी दिशा पाहून जेथून यात्रा स्थगित केली तेथूनच यात्रेला सुरुवात केली जाईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आमरण उपोषण सुरु करुन 6 दिवस झाले. अजूनही राज्य सरकार ठोस निर्णय घ्यायला तयार नसल्याने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारचे धोरण शेतीला मारक आहे. आर्थिक दुरावस्था झाल्यानेच शेतकरी आत्महत्या करित आहेत. 85 टक्के मराठा समाज शेती व्यवसायाशी निगडीत आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. तरीही राज्याने जबाबदारी न झटकता केंद्राला कागदोपत्री पुर्तता करावी.

महेश खराडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. डिसेंबर 2011 साली लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी माजी खा.राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम केली होती. स्वाभिमानीतर्फे सांगली जिल्ह्यातून 12 ऑक्टोबरपासून सुरु झालेली यात्राही स्थगित केली आहे. कॉ.दिग्वीजय पाटील म्हणाले, मा.खा.राजू शेट्टी यांनी मराठा समाजाची भावना लक्षात घेवून जनआक्रोश पदयात्रा स्थगित केली. स्वाभिमानीची यात्रा सुरु होईल त्यावेळी मराठा क्रांती मोर्चा यात्रेत सहभागी होईल.

शेतकरी व मराठा वेगळा नाही. राज्यसरकार जाणीवपुर्वक मराठा आरक्षण आंदोलन चिघळवत आहे. वाळवा तालुक्यातील आजी-माजी पदा धिकार्‍यांना फिरु देणार नाही. आगामी काळात क्रांतीभूमीतून अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन होणार असून सरकारला ते जड जाईल. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, अ‍ॅड.एस.यु.संदे, संदीप राजोबा, पोपट मोरे, प्रकाश देसाई, संजय बेले, कॉ.दिग्वीजय पाटील, उमेश कुरळपकर, विजय महाडीक यांच्यासह शेतकरी संघटना व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा
शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू
आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शेतकरी संघटनांना फुटीचा शाप
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

शेतकर्‍यांचे 1200 कोटी कारखानदारांकडे अडकले

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकर्‍यांचे गतवर्षीच्या 400 रुपयाप्रमाणे 1200 कोटी रुपये कारखानदारांकडे अडकले आहेत. ते कारखानदारांना गिळंकृत करु देणार नाही. काही कारखान्यांनी 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरु करण्याची घोषणा केली आहे. जनआक्रोस पदयात्रा स्थगित केली तरीही गनिमी काव्याने साखर कारखान्यास जाणारा ऊस रोखू. अशा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज