rajkiyalive

MAHAUTI : घटक पक्ष वाजंत्रीपुरतेच…

MAHAUTI : घटक पक्ष वाजंत्रीपुरतेच… आम्ही काय बेंडवाले आहोत काय, आम्हाला लग्न सराई सुरू झाल्यावरच बोलावले जाते, हे उद्गार काढले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाउ खोत यांनी. नुकतेच महायुतीचा मेळावा राज्यात सर्वत्र एकाच दिवसा उत्साहात झाला. महायुतीमधील सर्वच घटक पक्ष या मेळाव्याला उपस्थित होते. सांगलीत झालेल्या मेळाव्यात सदाभाउ खोत यांनी वरील उद्गार काढले. त्यांच्या वक्तव्यावरून केवळ त्यांच्या रयत आघाडीची ही अवस्था नसून, महायुतीतील सर्वच घटक पक्षांची जराकमी तशी अवस्था झाली आहे.

 

 

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली

येणार्‍या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. जो तो पक्ष आपआपल्या तयारीला लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलाच पक्ष येणार असे प्रत्येक पक्षाला वाटत असले तरी भाजप मात्र देशात आणि राज्यात वेगळाच अजेंडा राबवत आहेत.

देशात लोकसभेला आणि राज्यात विधानसभेला सत्ताधारी महायुतीच्या विरोधात महाआघाडी अशी लढत होणार आहे.

महायुतीमध्ये जवळपास 16 घटकपक्षांचा समावेश आहे. यामध्ये आरपीआय आठवले गट, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती शेतकी संघटना या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. 1995 पासून भाजप आपले हात पाय राज्यात पसरायला सुरूवात केली. शिवसेनेला सोबत घेवून 1995 मध्ये भाजप शिवसेना सरकार राज्यात पहिल्यांदा सत्तेत आले. त्यावेळी भाजपने शिवसेनेचा उपयोग शिडीसारखा करून घेतला. आज शिवसेनेची अवस्था काय आहे, हे संपूर्ण राज्याला माहित आहे. भाजपला ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्यावेळी त्यांनी राज्यातील घटक पक्षांना चुचकारले. प्रसंगी त्यांना विधानपरिषदेवर घेवून आमदारकी दिली. केवळ आमदारकी दिली नाही तर मंत्रीपदही दिले.

 

2014 च्या मोदी लाटेत. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर गेली.

याचा फायदा राजू शेट्टींना झाला. लोकसभेवर ते प्रचंड मतांनी निवडून आले. पुढे विधानसभेलाही स्वाभिमानीचा फायदा भाजपने करून घेतले. स्वाभिमानीचे स्टार प्रचारक सदाभाउ खोत यांनी राज्यात भाजपचे वातावरण चांगलेच तापवले. त्याचा फायदा सदाभाउंना आमदारकी मिळण्यात झाली. पुढे सदाभाउंना मंत्रीपदही मिळाले. त्यांच्याबरोबर महादेव जानकर, विनायक मेटे यांनाही आमदारकी आणि मंत्रीपदाची लॉटरी लागली. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले. त्यावेळी भाजपसोबत केवळ शिवसेना हाच मोठा पक्ष होता.

सध्याची अवस्था वेगळी आहे. आज शिवसेनेची ताकद उरली आही.

शिवसेनेचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपलच्या गोटात आला आहे. राष्ट्रवादीचीही तीच अवस्था झाली आहे. अजित पवार यांनी पक्ष फोडून भाजपशी सलगी केली आहे. काँग्रेसची अवस्था राज्यात फारच केविलवानी झाली आहे. आजच्या घडीला राज्यात एकही काँग्रेचा खासदार नाही. बाकीच्या घटक पक्षांचीही तीच अवस्था आहे. भाजपला केवळ लोकसभेला घटक पक्षांची गरज आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी त्यांनी राज्यात 40 प्लसचा नारा दिला आहे. राज्यात लोकसभेच्या एकून 48 जाग आहेत. त्यापैकी कोणत्याही परिस्थितीत 40 जागा जिंकायच्याच असा त्याचा प्लॅन आहे. त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे 16 घटक पक्षांची महायुती त्यांनी स्थापन केली आहे.

 

आता मूळ प्रश्न आहे तो या घटक पक्षांना खरोखर न्याय मिळणार काय?

कारण शिंदे गट आणि अजित पवार गट आणि भाजप हे गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. आता पहिली पंचाईत आहे ती, उमेदवारी देण्याची कारण शिंदे गट आणि अजित पवार गट यांना त्यांच्या ताकदीच्या जोरावर लोकसभे तिकीट द्यावे लागणार आहे. यामध्ये भाजपमध्ये मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. उदाहरण द्यायचे झाले तर हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाच्या वाटणीला आहे. येथे विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत जागा सोडावे लागणार आहे. परंतु येथे भाजपतर्फे प्रकाश आवाडे यांचे पूत्र राहूल आवाडे, माजी आमदार हाळवणकर, रयत आघाडीचे सदाभाउ खोत यांनी उमेदवारी मागितली आहे. यांचे कमी की काय विरोधी राजू शेट्ट्ी यांनाही भाजपने चुचकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ घटक पक्षच नाही तर भाजपमधील नेतेही नाराज होण्याची शक्यता आहे.

हीच अवस्था शेजारच्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची आहे.

येथेही विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक आहे. येथेही भाजपच्यावतीने खा. धनंजय महाडिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत. येथेही भाजप जागा मागण्याच्या तयारीत आहे. कोल्हापूर किंवा हातकणंगले या दोन जागेपैकी कोणत्याही परिस्थितीत एक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायचेच, असा चंग भाजपने बांधला आहे.

 

काही भागापुरतेका असेना पण ताकद आहे.

पश्चिम महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी मंत्री सदाभाउ खोत यांची रयत क्रांती शेतकरी संघटना, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विनय कोरे यांची जनसुराज्य शक्ती यांचे स्वत:चे काही भागापुरतेका असेना पण ताकद आहे. त्यांच्या ताकदीचा वापर भाजपने वेळोवेळी करून घेतला आहे. सध्या राजू शेट्टी या महायुतीपासून दूर आहेत. परंतु त्यांनाही भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून उमेदवारीसाठी फोन जात आहेत. शेट्टींनी याचा इन्कार केला असला तरी अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. सदाभाउंनाही खासदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत. त्यामुळे त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

आता यामध्ये भर पडली आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची. या दोन्ही गटांनाही आमदार, खासदारकीचे स्वप्ने पडू लागली आहेत. या घटकपक्षांनी गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यात आपली व्यथा बोलून दाखवली आहे. सदाभाउंनी तर आम्ही काय बँडवाले आहोत, काय. केवळ लग्नसराईतच आम्हाला बोलावले जाते, मुंगीही हत्तीचा पराभव करू शकतो, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे घटकपक्षांची अवस्था महायुतीमध्ये काय आहे, हे दिसून येते.
लहान पक्षांची गरज संपली

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष भाजपच्या दावणीला गेल्याने लहान पक्षांचे काय असा प्रश्न आहे.?

सदाभाउंची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, आरपीआय आठवले गट हे एकेकाळी भाजपच्या खास मर्जीतले होते. त्यांना सत्तेत सामावून घेउन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न झाला होता कारण त्यावेळी भाजपला लहान लहान पक्षांची गरज होती. परंतु आता ही गरज संपली आहे. सत्तेत सहभागी होवून या पक्षांनी आपले उपद्रव्य मूल्य गमावून बसले आहेत. त्यांची भिती आता कोणालाच उरली नाही. मोठ्या पक्षांवर दरोडा पडत असताना लहान पक्षांना विचारतो कोण अशी अवस्था त्यांची सध्या झाली आहे.

एकंदरीत महायुतीमधील घटक पक्षांची अवस्था केवळ वाजत्रीसारखीच झाली आहे. त्यांच्या वाटणीला लोकसभेची उमेदवारी आली तर आश्चर्यच म्हणावे लागले, हे मात्र नक्की.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज