rajkiyalive

काँग्रेसच्या जनसंवादला भाजप शह देणार का?

काँग्रेस नेत्यांत ऐकी, भाजपमध्ये दुफळी

 अनिल कदम, जनप्रवास

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरणही तापू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात काँग्रेसने जनसंवाद पदयात्रा काढली. मरगळलेल्या काँग्रेसच्या पदयात्रेला जनतेतूनही साथ मिळाली. जनसंवादच्या माध्यमातून माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी एकत्र येवून काँगेसमध्ये ऐक्य असल्याचे दाखवून दिले. दुसरीकडे भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी केली असली तरी विद्यमान खा. संजयकाका पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खासदार आणि माजी जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी चूल मांडत बैठका घेत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सरळसरळ दुफळी निर्माण झाली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या जनसंवादला भाजपमधील मतभेद संपवून आव्हान देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप विरोधी असलेल्या पक्षांची एकत्रित मुठ बांधली जात आहे. भाजप विरोधातील पक्ष इंडिया आघाडीत सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे देशात काँग्रेसचे बळ वाढत असल्याचे चित्र दिसून येते. देशात काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढली. मिरज तालुक्यातून यात्रेला सुरवात झाली. त्याची सांगता सांगली शहरात गुरुवारी झाली.मिरज, जत, आटपाडी खानापूर, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातील काँगे्रस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तर विटा व सांगली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सभा यांची सभा घेवून शक्तीप्रदर्शन केले. या सभाव्दारे निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या दुसर्‍या फळीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाभर संपर्क साधला. सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे पाटील गेल्या काही महिन्यापासून लोकसभा मतदारसंघात दौरे करीत आहेत. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. मागील काही वर्षात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पहायला मिळाले होते. कदम गट आणि दादा गट असा वादही काही वेळा उफाळून आला. दादा गट आणि स्वर्गीय मदनभाऊ यांच्यातील वाद अनेकदा टोकाला पोहोचला होता.

हेही वाचा

जनसंवाद पदयात्रेने काँग्रेसला मिळणार बळ

सांगलीतील उमेदवारीचा घोळ संपला

राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस

संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..

एप्रिल महिन्यात झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दादा-मदनभाऊ गटातील वादावर पडदा टाकून विशाल पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. विश्वजीत कदम यांनीही जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये एक्य असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय जनसंवाद यात्राही काँग्रेससाठी फायद्याची राहणार असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात भाजपकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे, परंतु भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन सातत्याने वाद उफाळून येतात. पक्षविरोधात कारवाया खासदार गटाकडून सुरु आहेत, पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा माजी जिल्हाध्यक्षांनी केला होता. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. गत विधानसभा निवडणुकीत खासदारांनी भाजपचे उमेदवार जगताप यांना पराभवास कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. सध्याही त्यांचे अशाच प्रकारचे काम सुरुच आहे. त्यामुळे जगताप गट खासदारविरोधात आक्रमक आहे.

हेही वाचा

खानापूरची काँग्रेस कुणाच्याही दावणीला बांधणार नाही

वारसा असूनही… न झालेले आमदार…

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

खा. पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खासदार आणि माजी जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी चूल मांडत बैठका घेत आहेत. पक्षाचे जुने-नव्या कार्यकर्त्यांची त्यांच्याकडून भेटी-गाठी सुरु आहेत. देशमुख संपर्क वाढत असल्याचे चित्र दिसून येते. आगामी निवडणुकीत पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवून बांधणी करावी लागणार आहे. काँग्रेसने जनसंवादच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला भाजपकडून शह देणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाजनसंपर्क अभियानानंतर नेत्यांची पाठ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले हेाते. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी सांगली जिल्ह्यात आले होते. त्यांच्याकडून निवडणुकीबाबत आढावा घेण्यात आला. परंतु दीड महिन्यांपासून निवडणुकीबाबत भाजपकडून कोणताही नेता सांगलीत आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला भाजपकडून रणनिती आखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज