rajkiyalive

हरिपूरमध्ये एकहाती भाजपला मतविभागणीचा धोका

हरिपूर ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी पहिल्यांच चौरंगी लढत

जनप्रवास : सांगली :

हरिपूर ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी मात्र चुरस वाढली आहे. यात परंपरागत संगूदादा बोंद्रे गट विरुद्ध मोहिते गटात परंपरिक लढत आहेच. पण प्रामुख्याने महिला खुला प्रवर्ग थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून बोंद्रे पॅनेलचे नेते अरविंद तांबवेकर यांच्या पत्नी राजश्री तांबवेकर तर मोहिते पॅनेलचे नेते अशोक मोहिते यांच्या पत्नी शोभा मोहिते मैदानात आहेत. दुसरीकडे मागील टर्ममध्ये भाजपसोबत असलेल्या माजी सरपंच कविता बोंद्रे अन् मदनभाऊ गटाचे युवानेते संजय सावंत यांच्या पत्नी अश्विनी सावंत याही अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यामुळे या लढतीत भाजपला मतविभागणीचा धोका आहे. दुसरीकडे मोहिते गटही सत्तेपासून दूर असल्याने त्यांचीही अस्तित्वाची लढाई आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असली तरी सत्तेसोबतच सरपंचपदात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

कृष्णा-वारणा संगमावरील हरिपूर (ता. मिरज) या तसे पाहिले तर सर्वाधिक सधन अन् सुखसमृद्ध गाव. येथे वर्षानुवर्षे काँगेस-राष्ट्रवादी, भाजप अशी पक्षांची एंट्री आलटून-पालटून होत असली तरी अन् त्याचे नेतृत्व करणार्‍या बोंद्रे विरुद्ध मोहिते गटातच वर्षानुवर्षे लढत होत आली आहे. प्रामुख्याने 2014 पूर्वी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेवराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सभापती अशोक मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वरचष्मा होता. पण मोदी लाटेबरोबरच 2013 मध्ये बोंद्रे गटाने बाजी मारत सत्तांतर घडविले. त्यावेळी बोंद्रे गटाच्या दहा तर मोहिते गटाचे सात सदस्य होते. त्यानंतर 2018 मध्ये विकासकामांच्या आणि केंद्र-राज्यातील भाजपच्या सत्तेच्या पाठबळावर मोहिते गटाचा सुफडासाफ करीत थेट सरपंचपदासह 18-0 अशी बाजी मारली. त्यामुळे मोहिते गट कोमात तर बोंद्रे गट जोमात होता. यातून गावच्या विस्ताराबरोबरच विकासकामेही झाली आहेत.

या निवडणुकीतही थेट बोंद्रे विरुद्ध मोहिते गट अशी दुरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार 17 सदस्यपदासाठी प्रामुख्याने दुरंगीच लढत आहे.
पण सरपंचपदात मात्र बोंद्रे गटाला बंडखोरी टाळण्यात अपयश आले. बोंद्रे गटाकडून यावेळी अरविंद तांबवेकर यांनी यांनाच पत्नी राजश्री यांनाच मैदानात उतरविले. अशोक मोहिते यांनीही पत्नी शोभा यांना मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे माजी सरपंच कविता बोंद्रे व अश्विनी सावंत यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. गेल्या पंचवार्षिक टर्ममध्ये बरेच पाणी पुलाखालून गेले. यात बोंद्रे गटाच्या माजी सरपंच कविता बोंद्रे यांच्यासह समर्थक गट नेते अरविंद तांबवेकर यांच्यापासून दुरावला आहे. दुसरीकडे सावंत यांनाही गेल्यावेळच्या पंचायत समितीच्या निवडणुकीतही पराभवाची सल आहे.

शिवाय ग्रामपंचायतीच्या कारभारातही डावलल्याची सल असल्याने बोंद्रे गटापासून सवतासुभा ठेवत त्यांनी आपल्या गटाचे अस्तित्व कायम ठेवले आहे. यातूनच दोघांनीही सरपंचपदासाठी बंडखोरीचा पवित्रा घेतला. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही पॅनेलकडून अन्य सदस्यांबरोबरच सरपंचपदाच्या प्रचारासाठी मदतीचा हातभार आहे. मात्र अपक्ष अश्विनी सावंत व कविता बोंद्रे यांच्यासह समर्थकांना पूर्ण गावभर अन् आपल्यासाठीच मतदारांपर्यंत पोहोचावे लागत आहे. यावेळी तिसरा सक्षम पर्याय म्हणून आम्हाला संधी अशी त्यांनी साद घातली आहे.

हेही वाचा

नांद्रेत सत्ताधार्‍यांची प्रचारात आघाडी
हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज
ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203

त्यामुळे बोंद्रे गटाकडून किमान सरपंचपदासाठी तरी तीनजणात मतविभागणी होणार आहे. दुसरीकडे दोन टर्मच्या बोंद्रे गटाच्या सत्तेतील नाराजीची ‘अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी’ पत्थ्यावर पडू शकते. एकूणच त्याचा फायदा आपल्याला होईल असे आडाखे मोहिते गटाच्या शोभा मोहिते यांनी आखले आहेत.
बोंद्रे गटाला मात्र मागील सत्तेचे बळ आहे. विशेषत: खासदार, आमदारांची ताकद पाठीशी आहे. सोबतच मोहिते गटाचाही मागील पाच वर्षांतील प्रभाव कमी झाला आहे. पक्षीय ताकदही त्यांच्यामागे त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही उणीव आणि विकासकामांच्या जोरावर चौरंगी लढतीतही आम्ही बाजू मारू असा बोंद्रे गटाचा प्रचारादरम्यान दावा आहे.

एकूणच पॅनेल टू पॅेनेल लढतीत बोंद्रे गटाकडून सत्ता कायम ठेवण्याची तर मोहिते गटाला पुन्हा सत्तेसह ग्रामपंचायतीत एंट्रीची झुंज आहेच. शिवाय हरिपूरच्या इतिहासात सरपंचपदासाठी चौरंगी लढतीत दोन्हीकडून मतविभागणीत मतदार कोणाला संधी देणार याची मात्र उत्सुकता आहे.

दोन्ही पॅनेलचे प्लस-मायनस

बोंद्रे गटाला केंद्र, राज्यातील सत्तेबरोबरच जिल्हा परिषदेतील सत्तेचे दोन टर्म पाठबळ मिळाले होते. त्या जोरावर विकासकामे झाली आहेत. त्या तुलनेत मोहिते गटाचे ग्रामपंचायतीत अस्तित्वच नसल्याने जनसंपर्कासह विकासकामांची मोठी उणीव आहे. दुसरीकडे बोंद्रे गटाला दोन टर्म सत्तेतून विस्तारीत भागात काही ठिकाणी विकासकामे झाली नाहीत. हरिपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात अपयश आले आहे. ही मोहिते गटाच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. शिवाय बोंद्रे गटातील सरपंचपदाच्या बंडखोरीचाही मोहिते गटाला फायदा होऊ शकतो.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज