rajkiyalive

HATKANAGLE LOKSABHA : शेट्टींचा प्रचार करणार्‍या निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करा

इस्लामपुरात महायुतीच्या नेत्यांची मागणी ः

लोकसभा निवडणुकीत माजी खा.शेट्टींचा प्रचार केल्याचा आरोप

HATKANAGLE LOKSABHA : शेट्टींचा प्रचार करणार्‍या निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करा : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार करण्याऐवजी माजी खा.राजू शेट्टींच्या प्रचारात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत इस्लामपुरात केला. महायुतीच्या विरोधात काम करणारे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. भाजपाचे नेते विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपा राज्य कार्यसमितीचे सदस्य राहुल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार बैठक झाली.

HATKANAGLE LOKSABHA : शेट्टींचा प्रचार करणार्‍या निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करा

शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे नेते विक्रम पाटील म्हणाले, भाजपा पक्षामध्ये तत्व, निष्ठा, संघटन प्रखर राष्ट्रवादाने प्रेरित होऊन कार्यकर्ते काम करीत आहेत. निशिकांत पाटील यांनी गेल्या साडेसात वर्षात भाजपमध्ये येऊन सत्तेचा दुरुपयोग करुन सर्वाधिक लाभ मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामावर निशिकांत पाटील यांनी पाणी फिरवले आहे. पक्ष विरोधी भूमिकेबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षात राहून पक्षाला विरोध करायचा या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे.

जॅकेट घालून कोणी आमदार होत नाही.

राहुल महाडिक म्हणाले, इस्लामपूर नगरपालिका निवडणुक आम्ही एकत्रित लढवली त्यात यश मिळवले. मात्र एका महिन्याभरात निशिकांत पाटील यांनी वेगळी चूल मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाषण करताना मी फडणवीस यांच्यासाठी जीव द्यायला तयार असल्याचे सांगणार्‍या निशिकांत पाटलांची भूमिका मात्र पक्ष विरोधी आहे. जॅकेट घालून कोणी आमदार होत नाही. निशिकांत पाटील थापा मारून आपले महत्त्व वाढवित आहेत. त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

महायुतीचा उमेदवार ठरण्यापूर्वीच निशिकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते राजू शेट्टींच्या प्रचारात होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपकी बार 400 पार असा नारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र निशिकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांचा प्रचार केला आहे. महायुतीचा उमेदवार ठरण्यापूर्वीच निशिकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते राजू शेट्टींच्या प्रचारात होते. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणण्यासाठी निशिकांत पाटील यांच्या शैक्षणिक संकुलात मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलो होतो. असे असताना त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही.

निशिकांत पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत बंडखोरी केली होती.

निशिकांत पाटील यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी यासाठी आम्ही एकत्रितरित्या मागणी करीत आहोत. राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मन्सूर मोमीन, चंद्रशेखर तांदळे, माजी नगरसेवक अमित ओसवाल, अमर पडळकर यांनी मनोगते व्यक्त केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर निळकंठ, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, प्रदीप लोहार, सत्यवान रासकर, जलाल मुल्ला, सुजित थोरात, राजेंद्र पवार, सतीश पाटील, पार्थ शेटे, राष्ट्रवादीचे वीरेंद्र राजमाने, प्रमोद खुडे, मनसेचे सनी खराडे, सतिश पवार, वीर कुदळे, घनशाम जाधव उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज