rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : हातकणंगलेत यंदा वंचितचा फटका कोणाला?

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदा कधी नव्हे ती चुरस पहायला मिळणार आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डि. सी. पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे. अजून आवाडे घराण्याने पत्ते ख्ाुले केले नाहीत. त्यांच्या निर्णयावरही बरेच काही अवलंबून असले तर यंदा खरी चर्चा सुरू झाली आहे ती वंचितच्या उमेदवाराची. गेल्या निवडणुकीत वंचितने राजू शेटृींची विकेट काढली होती. यंदा वंचितच्या जाळ्यात कोण कोण अडकेत याचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

HATKANANGLE LOKSABHA : हातकणंगलेत यंदा वंचितचा फटका कोणाला?

 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघ. पूर्वीचा इचलकरंजी मतदार संघ. या मतदार संघावर रूकडीच्या माने घराण्यांनी बरीच वर्षे सत्ता उपभोगली. बाळासाहेब माने पाच वेळा खासदार, त्यांच्या सूनबाई निवेदिता माने दोन वेळा खासदार आणि बाळासाहेबांचे नातू विद्यमान खासदार धैर्यशील माने एक वेळा असे तब्बल 8 टर्म लोकसभा माने घराण्याकडे राहिली आहे. दरम्यानच्या काळात कल्लापाण्णा आवाडे दोन वेळा आणि राजू शेट्टी दोन वेळा निवडून आले आहेत. निवेदिता माने यांची हट्रीक राजू शेट्टी यांनी चुकवली आणि राजू शेट्टीं यांच्या खासदारकीची हॅट्रीक धैर्यशील माने यांनी चुकवली. यामध्ये वंचितच्या उमेदवाराचा मोठा वाटा आहे.

गेल्या निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 17 उमेदवारांना पराभूत होण्यास कारणीभूत ठरले. हातकणंगले आणि सांगलीचाही त्यामध्ये समावेश होता. हातकणंगलेमध्ये वंचितने अस्लम बादशहा सय्यद यांना उभे केले होते. राष्ट्रवादीतून तिकीट न मिळाल्याने धैर्यशील माने यांनी मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधून घेतले आणि लोकसभेचे तिकीट मिळवले. शिवसेनेकडून धैर्यशील माने, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून राजू शेट्टी आणि वंचित महाविकास आघाडीकडून अस्लम बादशहा सय्यद यांच्यात खरी लढत झाली. एकूण 17 उमेदवार रिंगणात होते.

धैर्यशील माने यांना 5 लाख 85 हजार 776 मते मिळाली. राजू शेट्टी यांना 4 लाख 89 हजार 737 मते मिळाली तर अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 419 मते मिळाली. 96 हजार मतांनी राजू शेट्ींचा पराभव झाली. वंचितच्या उमेदवारामुळे त्यांना फटका बसला हे निश्चित.
यंदाही तीच अवस्था झाली आहे. यंदा चौरंगी, पंचरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथील दादासाहेब पाटील उर्फ डि. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जैन समाजाचे असलेल्या डि. सी. पाटील यांनी या अगोदर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

कुंभोज येथील बाहुबली आश्रमचे ते विद्यमान महामंत्री आहेत. कुंभोज परिसरात त्यांचे मोठे नेटवर्क तर आहेच. परंतु इस्लामपूर मतदार संघातही त्यांचे पै पाहुण्यांचे सर्कल आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात जैन समाजाचे दीड लाख मतदार असून, आंबेडकर विचारांचे सुमारे अडीच लाख मतदान आहे. गेल्या पाच वर्षात आंबेडकर चळवळ जागृत झाली आहे. या भागात रामदास आठवले यांच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. डि. सी. पाटील आणि प्रकाश आवाडे यांचेही घरगुती संबंध आहे. त्यामुळे ऐनवेळी जर आवाडे रिंगणात नसले तर त्यांची मोठी ताकद डि. सी. पाटील अर्थात वंचितच्या मागे राहण्याची शक्यता आहे.

कारण आवाडेंना राजू शेट्टी आणि धैर्यशील माने दोघेही नको आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तळ ठोकला आहे. हातकणंगलेमधील उमेदवार बदला अशी त्यांची मागणी आहे. परंतु शिंदे गट धैर्यशील माने यांचे जर तिकीट बदलले तर त्यांच्या आई निवेदिता माने यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाडेंच्या हाताला फार काही लागेल असे वाटत नाही. त्यामुळे ते आपली मते डि. सी. पाटील यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वंचितचे डि. सी. पाटील यांचा फटका कोणाला बसणार यांचीच चर्चा सध्या हातकणंगले मतदार संघात सुरू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज