rajkiyalive

हरवलेले खासदार…धैर्यशील माने

 

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

दोन दिवसापूर्वी हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथे ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा कुठल्या संघटनेचा नव्हता, शेतकर्‍यांचा नव्हता की कोणत्या कामगारांचा नव्हता. हा मोर्चा होता तो हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील माने यांच्या हरवलेल्याचा. खासदार हरवले आहेत, असे हातात बोर्ड घेवून हजारो ग्रामस्थांनी वडगावमध्ये मोर्चा काढला. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेचे रणांगण पेटत असताना विद्यमान खासदार असणार्‍या धैर्यशील मानेंवर ही वेळ यावी हे धोकादायक आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच उपोषण आणि आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. परंतु खासदार धर्यशिल माने कुठेच दिसले नाहीत, असा आरोप करीत तरूणांनी वडगावमध्ये मोठा मोर्चा काढला. वास्तविक धैर्यशील माने हे मराठा समाजाचे मोठे नेते त्यांच्याच समाजाने त्यांच्या विरोधात मोर्चा काढणे हे मानेंना आगामी काळात परवडणारे नाही. धैर्यशील मानेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मोर्चेकरांची मागणी होती.

लोकसभेच्या निवडणुका केव्हांही लागू शकतात. विद्यमान खासदारांना आपले तिकीट पक्के असल्याची खात्री आहे. परंतु कोणत्या पक्षाकडून हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारण राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये फूट, काँग्रेसमध्ये गटबाजी आणि भाजप बँकफूटवर अशी अवस्था सध्याची आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण लढेल हे काही आत्ताच सांगता येत नाही.

आगामी लोकसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित महायुतीतर्फे एकत्रित लढण्यिाचा निर्णय झाला आहे. राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदार धैर्यशील माने यांनी राजकीय उलाथापालथीनंतर शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीकही आहेत. सध्याच्या परिस्थिती या दोघांची उमेदवारी धोक्यात आहे. कारण त्यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेमध्ये बंडाळी निर्माण झाली आहे. हातकणंगलेमध्ये कोणत्याची परिस्थितीत भाजपचाच खासदार निवडून आणायचा चंग हाळवणकर, राहूल आवाडे यांनी बांधला आहे. त्यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

त्यातच धैर्यशील माने यांनी दर्शन दुर्मिळ झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कारखानदारांच्या मुळावर उठलेल्या राजू शेटटी यांना धैर्यशिल माने यांनी पराभवाची धूळ चारली. शेतकर्‍यांच्या जिवावर दोनवेळा खासदार झालेल्या राजू शेट्टी यांचा पराभव कोणीही करू शकणार नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु हे विधान तरूण तगड्या धैर्यशील माने यांनी खोडून काढले. 2009 मध्ये राजू शेट्टी यांनी निवेदिता माने यांचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा धैर्यशील माने यांनी 2019 मध्ये काढला.

ऐनवेळी हातात शिवबंधन बांधून धैर्यशील माने यांनी शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी मिळवली. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांचा वारू जोरात उधळला. यामध्ये राजू शेट्टी यांचा पराभव झाला. उध्दव ठाकरे यांनी त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान दिले. त्यानंतर गेल्या दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेची छकले झाली. त्यामध्ये धैर्यशील माने यांनी सत्ताधार्‍यांच्या बाजूने म्हणजेच शिंदे गटाला हिरवा कंदील दाखवला आणि त्यामध्ये सामिल झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडीच्या बाळासाहेब माने घराण्याला मोठा राजकीय इतिहास आहे. काँग्रेसच्या उभारीच्या काळात माने घराण्याने काँग्रेसला मोठी साथ दिली. 1977 मध्ये बाळासाहेब माने काँग्रेसचे खासदार होते. त्यांच्यानंतर निवेदीता माने यांनीही काही काळ खासदारकी भोगली. त्यानंतर इचलकरंजी मतदार संघ बदलले आणि हातकणंगले मतदार संघाची निर्मिती झाली. 2009 च्या निवडणुकीत निवेदिता माने यांना पराभवाचा धक्का बसला परंतु 2019 मध्ये पुन्हा धैर्यशील माने यांनी मतदार संघ ताब्यात घेतले.

हेही वाचा

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

सुरूवातीच्या काळात धैर्यशील माने यांचा आक्रमक मराठा अशी ओळख होते. एम अक्षर हे त्यांचे सिम्बॉल होते. व्यासपीठ गाजविणार्‍या धैर्यशील मानेंकडून मतदार संघाला भरपूर अपेक्षा होत्या. परंतु गेल्या पाच वर्षात नाव घ्यावे असे कोणतेच विकासाचे काम झाले आहे. ड्रायपोर्ट्र आणि लॉजिस्टिक पार्कचाही पोपट झाला. सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघाततर मानेंचे दर्शन केव्हा झाले हे तपासावे लागेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदार संघात प्रचंड नाराजी आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण समाज पेटून उठला असताना धैर्यशील माने यांना मोठी संधी होती.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हढे धाडस कोणत्याच खासदाराला दाखविता आले. राजीनामा सोडाच मैदानात उतरण्याची त्यांना फार मोठी संधी होती. परंतु त्यांनी अज्ञातवासात जाणे पसंत केले. त्याचाच परिणाम वडगावच्या मोर्चात झाले. वडगावच्या मोर्चात अनेक तरूणांनी आपल्या भावना व्यक्त करून मानेंवर आगपाखाड केली. मोर्चा निघाल्यानंतर मानेंनी प्रसिध्दी पत्रक काढून खुलासा केला आणि समाजासाठी करत असलेल्या कामाचाही उल्लेख केला परंतु तोपयर्र्त बराच वेळ गेला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असले प्रसंग विद्यमानांना धोक्यात आणू शकतात याची जाणीव मानेंनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

एकंदरीत सध्याचे वातावरण मानेंच्या विरोधात असून भाजप रिंगणात उतरणार काय, शिंदे गट मानेंना तिकीट देणार का, याकडेचा सर्वांचे लक्ष लागले आहे.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न

माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून, आक्षेपार्ह घोषणा- टिप्पणी केली आहे. वास्तविक सर्व मराठा समाजबांधव एकीकडे आरक्षणासाठी लढा देत आहेत, तर काहीजण स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार हरवले आहेत, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. याविषयी पोलिसात तक्रारी देत आहेत. यामुळे मुख्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे खासदार माने म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज