पुलाखालून बरेच पाणी गेले पण शहराचा पाणीप्रश्न सुटला नाही
दिनेशकुमार ऐतवडे
हॉटस्पॉट बनलेल्या इचलकरंजीकडेच सर्वांचे लक्ष: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असणार्या राजू शेट्टींना एकाच मतदार संघाने जमिनीवर आणले ते म्हणजे इचलकरंजी विधानसभा मतदार संघ. लाखमोलाचे मतदार संघ असणारे इचलकरंजी विधानसभा हॉटस्पॉट झाले असून, झाडून सर्व मंत्री, नेते इचलकरंजीत तळ ठोकून आहेत. यंदा इचलकरंजी कोणाला साथ देणार याचीच सर्वत्र चर्चा आहे.
हॉटस्पॉट बनलेल्या इचलकरंजीकडेच सर्वांचे लक्ष
इचलकरंजी शहर आणि चंदूर, तारदाळ, खोतवाडी कबनूर आणि कोरोची या दोनच गावांचा समावेश या मतदार संघांत होतो. सुमारे 90 टक्के मतदान इचलकरंजी शहरात आहे. राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघांने आजपर्यंत अनेकांना साथ दिली आहे तर अनेकांना घरी बसवले आहे. गेल्या निवडणुकीपासून या मतदार संघांची अनेकांनी धास्ती खाली आहे. कारण 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींना डोक्यावर घेतलेल्या या मतदार संघाने गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 75 हजाराचे मताधिक्य धैर्यशील मानेंना दिले होतेे.
राजू शेट्टी तीन मतदार संघात आघाडीवर होते परंतु ही त्यांची आघाडी एकट्या इचलकरंजीने खाउन टाकली.
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नामुळे सध्या शहराचे वातावरण तापत आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. येणार्या काळात मीच पाणीप्रश्न सोडविणार असे प्रत्येकाचे मत आहे.
यावर्षीची राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळचे धैर्यशील माने आणि राज्ाू शेट्टी मैदानात तर आहेतच परंतु महाविकास आघाडीचे सत्यजित आबा सरूकडही रिंगणात आहेत. यावर्षीची राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेनेकडून खासदार झालेले धैर्यशील एकनाथ शिंदे गटात आहेत. काँग्रेस आघाडीकडून लढलेेले राज्ाू शेट्टी स्वतंत्र आहेत. तर सत्यजित आबा पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात आहेत.
पहिल्याच निवडणुकीत नवख्या राज्ाू शेट्टींनी खासदार असणार्या निवेदिता मानेंचा पराभव केला.
2009 पासून इचलकरंजी लोकसभा रद्द होवून हातकणंगलेची निर्मिती झाली. पहिल्याच निवडणुकीत नवख्या राज्ाू शेट्टींनी खासदार असणार्या निवेदिता मानेंचा पराभव केला. त्यावेळी या मतदार संघात राजू शेट्टींना 65 हजार 930 मते मिळाली तर निवेदिता मानेंना 58 हजार 193 मते मिळाली. स्थानिक असणार्या मानेंना सात हजार मतांनी पिछाडीवर रहावे लागले.
आवाडे दादांचे वर्चस्व असूनही त्यांना पिछाढीवर रहावे लागले.
2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजू शेटटी मैदानात उतरले त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लापाण्णा आवाडे यांची उमेदवारी पक्की झाली. इचलकरंची विधानसभा मतदार संघात आवाडे दादांचे वर्चस्व असूनही त्यांना पिछाढीवर रहावे लागले. यावेळी राजू शेट्टींना 97 हजार 691 मते मिळाली तर कल्लापाण्णा आवाडेेंना 77 हजार 879 मते मिळाली. गेल्या निवडणुकीत राजू शेट्टींना सात हजाराचे मतधिक्य मिळाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत त्यांना सुमारे 20 हजाराचे मताधिक्य मिळाले.
दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टींची हॅटट्रीक यंदा चुकली.
2019 ची निवडणूक मात्र ऐतिहासिक ठरली. दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टींची हॅटट्रीक यंदा चुकली. धैर्यशील माने यांनी त्यांची हॅट्रटीक चुकवली. याच मतदार संघांने सुमारे 75 हजाराचे मताधिक्य माने यांना दिली. यावेळी शेट्टींना केवळ 49 हजार 907 मतांवर समाधान मानावे लागले तर धैर्यशील मानेंना 1 लाख 24 हजार 824 मते मिळाली. इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर ही निवडणूक गाजली होती. त्याचा फटका राजू शेट्टींना बसला होता.
गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले पण इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटला नाही.
वारणा योजना, सुळकूड योजना की स्वतंत्र इचलकरंजीला पाणी योजना यामध्ये अजून घोंगडे भिजत पडले आहेत. कोणत्याही नेत्याला हा प्रश्न सोडविता आला नाही. यंदाही हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदा दुरंगी नसून तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे यंदा इचलकरंजीकर कोणाला साथ देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आवाडेंच्या माघारीचे गुपित काय?
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढणारच अशी सिंहगर्जना करणारे आमदार प्रकाश आवाडे यांची तलवार अचानक म्यान का झाली. कोणत्या गोष्टीवर तडजोड झाली असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर नाराज असलेले आवाडे घराने एकदमच मानेंचे गुणगाण करण्यास सुरूवात केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.