rajkiyalive

islampur vidhansabha election 2024 : इस्लामपूर, शिराळ्यात मविआ सुसाट, महायुतीत पेच

अनिल कदम
islampur vidhansabha election 2024 : इस्लामपूर, शिराळ्यात मविआ सुसाट, महायुतीत पेच : विधानसभा निवडणुकीचा आखाडा जवळ येऊ लागल्याने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांची चाचपणी सुरू असताना इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्लामपुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीत जागा शिंदे गट शिवसेनेकडे असल्याने तेथून नेमके कोण लढणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. येथे शिवसेनेचा दावा कायम असताना भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जोरदार तयारी करीत आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपकडून तयारी केली जात आहे. गतवेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले सम्राट महाडिक यांनी दावेदारी सांगितल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख हेही चाचपणी करु लागले आहेत.

islampur vidhansabha election 2024 : इस्लामपूर, शिराळ्यात मविआ सुसाट, महायुतीत पेच

विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे, तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. लोकसभेच्या यशाने महाविकास आघाडी सुसाट आहे. आता विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकींना अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी लोकसभेला अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. आता हेच वारे विधानसभेला कायम रहावे, असा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. परंतु वातावरण तापू लागताच महायुतीत निवडणुकीवरून चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जयंत पाटील यांचा इस्लामपूर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शिराळा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे चित्र क्लिअर आहे, परंतु माहितीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून मतदारसंघाला ओळखले जाते. या मतदारसंघात महाविकास आघाडीतून प्रदेशाध्यक्ष पाटीलच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेकडून गौरव नायकवडी यांनी निवडणूक लढवली. भाजप नेते निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लढले होते. दोघांनाही यश आले नाही. निशिकांत पाटील हे सध्या भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. महायुतीत जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. या जागेवर सेना आणि भाजप यांच्याकडून दावा करण्यात येत आहे.

गतवेळी लढलेले गौरव नायकवडी यांनी अद्याप निवडणूक लढण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. वाळव्याच्या क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी साखर कारखान्याला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांची ताकद इस्लापमपूर शहरापुरती मर्यादित असल्याचे दिसून आले आहे, जिल्हाप्रमुख पद याशिवाय थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संबंध असतानाही जिल्ह्यात गट वाढविण्यासाठी त्यांच्याकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही.

निशिकांत पाटील हे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जागा सेनेकडे असली तरी त्यांच्याकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. मात्र जागा सेनेकडे राहिल्यास त्यांच्यासाठी विधानसभा गाठण्याची वाट खडतर राहणार आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्ष पाटील हे बंडखोरी करणार का? हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

शिराळा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनाच तिकीट मिळणार असल्याचे अटळ आहे, याशिवाय त्यांच्याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असल्याने मतदारसंघातील लोकांना दुहेरी फायदा होत आहे. राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार म्हणून आ. नाईकच असल्याने महाविकास आघाडीत विषय मार्गी लागला आहे. महायुतीमध्येे उमेदवारीवरुन पेच निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येते. शिराळ्यात 1978 ते 1995 पर्यंत शिवाजीराव देशमुख घराण्याकडे सलग 17 वर्षे आमदारकी राहिली. यानंतर 1995 ते 2009 सलग तीन वेळा शिवाजीराव नाईक आमदार राहिले. पुढे पुन्हा आलटून पालटून शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांच्याकडे आमदारकी राहिली. त्यामुळे तीन दशके नाईक घराण्याकडे शिराळ्याची आमदारकी राहिली.

वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक मैदानात नवीन चेहरा आला आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्याची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. शिराळा हा वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यांचा मतदारसंघ आहे. वाळवा तालुक्यातील 48 गावे शिराळा मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्यामुळे या तालुक्यातून उमेदवारीसाठी नेतृत्व पुढे येवू लागले. वाळव्याचा आमदार हवा म्हणून महाडिक यांनी विधानसभेच्या मैदानात दंड थोपटले आहेत. गत निवडणुकीतही त्यांनी मिळवलेली मते नक्कीच प्रस्थापितांना विचार करायला लावणारी होती. महाडिक यांनी भाजपच्या तिकीटावर दावेदारी सांगितल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख हेही चाचपणी करु लागले आहेत. दोन्ही तालुक्यात देशमुख यांचा गट आहे. ऐनवेळी पक्षाने उमेदवारी दिली तर देशमुख हे नाईक यांच्या विरोधात रिंगणात येवू शकतात.

शिवाजीराव नाईक-विनोद तावडे यांच्या भेटीने तर्कवितर्क

आ. मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक अनेकवेळा निवडणुकांना आमने-सामने राहिले. आता या दोन्ही नेत्याची युती झाली असून शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय विरोध मावळला आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी माजी आमदार नाईक यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली आहे, त्यामुळे शिवाजीराव नाईक ऐनवेळी भाजपमध्ये जावून घरवापसी करणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज