rajkiyalive

ISLAMPUR VIDHANSABHA : इस्लामपूर शिवसेनेला कि भाजपला

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

ISLAMPUR VIDHANSABHA : इस्लामपूर शिवसेनेला कि भाजपला : विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकाही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार आहे. इस्लामपूर मतदार संघात महाविकासआघाडीकडून जयंत पाटील यांची उमेदवारी फायनल असून, महायुतीकडून हा मतदार संघ भाजपला जाणार की शिवसेना शिंदे गटाला जाणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

ISLAMPUR VIDHANSABHA : इस्लामपूर शिवसेनेला कि भाजपला : आजपर्यंत इस्लामपूर मतदार संघात सत्ता असूनही भाजप, शिवसेनेने या मतदार संघात म्हणावे तसे काम केले नाही. आता तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे येथे केवळ शिंदे गटाचे थोडेफार हालचाल दिसून येत आहे. इस्लामपूरमध्ये जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि मिरज पश्चिम भागात कवठेपिरानचे भीमराव माने हे शिंदे गटाचे काम करीत आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील असूनही त्यांचा गट वेगळा आहे. भाजपमध्ये विक्रम पाटील, राहूल महाडिक यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. अजित पवार गटाचे अस्तित्व नगण्य आहे.

महायुतीमध्ये हा मतदार संघ कोणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे.

भाजपकडे गेल्यास निशिकांत पाटील, राहूल महाडिक, विक्रम पाटील हे प्रमुख दावेदार असतील तर शिवसेनेकडे गेल्यास आनंदराव पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. गौरव नायकवडीही सध्या पुन्हा एकदा रेसमध्ये आहेत.

या मतदार संघात 1990 पासून जयंत पाटील यांनी बस्तान बसविले आहे.

1995 मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आली. शिवसेनेच्या बोटाला धरून राज्यात बस्तान बसविलेला भाजप आज राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. त्याबरोबर शिवसेनाही वाढली आहे. परंतु आता शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. असे असले तरी इस्लामपूर मतदार संघात अजूनही शिवसेना आणि भाजपला असा स्ट्राँग उमेदवार मिळाला नाही.

1990 च्या पहिल्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपने बाबा सूर्यवंशी यांना उभे केले होते. परंतु त्यांना केवळ 1522 मते मिळाली होती. यावेळी अपक्ष उमेदवार विलासराव शिंदे दुसर्‍या स्थानावर होतेे.

also read
SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर

1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपने जयंत पाटील यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते अशोक पाटील यांना उमेदवारी दिली. राज्यात यावेळी भाजपची सत्ता आली परंतु इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना 94 हजार 605 तर अशोक पाटील यांना 31 हजार 394 मते मिळाली.

1999 मध्ये भाजपने पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या विरोधात सी. बी. पाटील यांना उभे केले. यावेळी जयंत पाटील यांना 83 हजार 112 तर सी. बी. पाटील यांना 29 हजार 162 मते मिळाली.

2004 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला नाही. येथे पारंपरिक विरोधक रघुनाथदादा पाटील यांची उमेदवार कायम राहिली. एकतर्फी ही निवडणूक झाली. यावेळी जयंत पाटील यांना 1 लाख 20 हजार 830 तर रघुनाथ पाटील यांना केवळ 35 हजार 740 मते मिळाली.

2009 च्या निवडणुकीतही भाजप, शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला नाही. यावेळी सर्व विरोधकांनी मिळून वाळव्याच्या वैभव नायकवडींना उभे केले. परंतु याही निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 10 हजार 673 मते मिळाली तर वैभव नायकवडींना केवळ 56 हजार 165 मते मिळाली. जयंत पाटील पुन्हा एकदा 54 हजार 508 मतांनी निवडून आले.

2014 च्या निवडणुकीत राज्यात सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात भिडले.

जयंत पाटील राष्ट्रवादीकडून तर बोरगावचे जितेंद्र पाटील काँग्रेसकडून उभे राहिले. यानिवडणुकीतही भाजप, शिवसेनेने आपला उमेदवार दिला नाही. या निवडणुकीत 10 उमेदवार अपक्ष होते. परंतु भाजप किंवा शिवसेनेच्या चिन्हावर एकटाही लढला नाही. राज्यात यावेळी भाजप शिवसेनेची अवस्था चांगली असूनही त्यांना उमेदवार मिळाला नाही. या निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 13 हजार 45 मते मिळाली तर अभिजित पाटील यांना 37 हजार 859 मते मिळाली जितेंद्र पाटील यांना केवळ 18 हजार 187 मते मिळाली. यावेळी जयंत पाटील 75 हजार 186 मतांनी निवडून आले.

गेल्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला जाग आली. त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात वाळव्याच्या गौरव नायकवडींना उमेदवारी दिली. परंतु निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. येथे पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष असणार्‍या निशिकांत पाटील यांना जादा मते मिळाली. जयंत पाटील यांना 1 लाख 15 हजार 563 मते मिळाली तर निशिकांत पाटील यांना 43 हजार 396 मते मिळाली. गौरव नायकवडींना 35 हजार 668 मते मिळाली. जयंत पाटील 72 हजार 169 मतांनी निवडून आले.

भाजप, सेनेचे आजपर्यंतचे उमेदवार

1990 पासून सात निवडणुकीत बाबा सूर्यवंशी, अशोक पाटील, सी.बी.पाटील यांनी भाजपकडून जयंत पाटील यांच्या विरोधात लढा दिला. तर गौरव नायकवडी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लढा दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज